(अ) ‘स्तनांचे आजार’ या विषयाला अगदी तान्ह्या बाळापासून सुरुवात करू. काही बाळांच्या स्तनांमधून दुधासारखा चिकट स्राव निघतो. याला चेटकिणीचं दूध-विचेस मिल्क म्हणतात; पण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती आपोआप कमी होते. मुद्दाम स्तनांना मालिश करून हे दूध पिळून काढण्याची प्रथा अत्यंत चुकीची आहे.
त्यामुळे सूज येऊन तिथे गळू होण्याची शक्यता असते. बिचाऱ्या बाळांना त्याचा अत्यंत त्रास होतो- ऑपरेशन करून तिथला पू नंतर काढून टाकावा लागतो. म्हणून हे दूध अजिबात पिळून काढू नये. (ब) अंगावर दूध पाजणाऱ्या मातांना गळवांचा काही वेळा त्रास होतो. स्तनाच्या काही भागांत दूध अडकून तिथे जंतूसंसर्ग होतो. त्यामुळे स्तनांमध्ये प्रचंड वेदना, थंडी भरून ताप येणे व स्तन लालसर व टणक होणे, अशी लक्षणे दिसतात. बाळंतिणीला केव्हाही ताप आला तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळीच प्रतिजैविके दिली तर क्वचित आजार आटोक्यात येतो; परंतु बऱ्याचदा हे खराब व पूमिश्रित दूध स्तनांवर छेद घेऊन बाहेर काढून टाकावे लागते. ही शस्त्रक्रिया भूल देऊन करावी लागते या सर्व प्रक्रियेमध्ये बाळाचे आणि आईचे खूपच हाल होतात.
म्हणून स्तनांमध्ये असे गळू होऊ नये, यासाठी काळजी घ्यावी लागते-
१) प्रत्येक वेळी बाळाला पाजायला घेण्याआधी आईने १ पेला पाणी प्यावे. त्याने दूध भरभर सुटते.
२) दोन्ही स्तनांमधून आलटून-पालटून पाजावे. त्याने एकाच बाजूला दूध कोंडून राहत नाही.
३) स्तनाग्रांना वरच्यावर मऊ तेलाने किंवा मलमाने हलके मालिश करून ती चिरणार नाहीत याची काळजी घ्यावी.
४) बाळ एखाद्या बाजूने पुरेसे दूध ओढत नसल्यास किंवा काही ठिकाणी टणकपणा, लालसरपणा जाणवल्यास लगेच डॉक्टरांना दाखवावे. काही कारणाने गळू कापण्याची ही शस्त्रक्रिया करावी लागली, दोन्ही तरी बाजूंनी अंगावर राषि पाजणे चालूच ठेवावे. कोणत्याही परिस्थितीत दूध वाजण्याचे थांबवू नये. दूध आटवण्यासाठी मुद्दाम गोळ्याही घेऊ नयेत-त्याने त्रास अजूनच वाढतो.
-डॉ. सविता जोशी- जावडेकर
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply