काही केल्या रात्री डोळ्याला डोळा लागत नव्हता. डोक्याला थोडेसे तेल लावून झाले. एक जपाची माळही करून झाली पण डोळा काही मिटत नव्हता. कधी ह्या कुशीवर तर कधी त्या कुशीवर करत करत रात्र कुठे संपली हेच समजले नाही. सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे रोजंदा व्यवहार सुरु झाले. आपले शरीर आणि मन ह्या आपल्या रोजच्या जीवन-व्यवहाराशी इतके एकरूप झालेले असते कि यंत्र चालावे तसे काही लक्षात येण्यापूर्वीच चहा झाला, सकाळची कामे आटोपली आणि आश्रमात जाण्याची वेळ झाली.
इथे मात्र मी थोडी अडखळले. इतर वेळेस पटकन विकेट गेट उघडून पलीकडच्या आश्रमामध्ये गेले असते. पण आज तिकडे जाण्यासाठी पायच उचलत नव्हते. कशीबशी ऑफीसमध्ये पोहचले. कालचा प्रसंग डोळ्यासमोरून जातच नव्हता. तशीच मनाची समजूत घालीत रोजच्या कामाला सुरुवात केली. देवाची पूजा केली आणि आश्रमात सकाळची ‘round’ मारायला निघाले.
ह्या आश्रमात जवळ जवळ ३५ वृद्ध महिला आहेत. प्रत्येक खोलीत दोघी-दोघी रहातात. काही महिला वयाने जरी वृद्ध असल्या तरी शारीरिक रित्या व्यवस्थित आहेत. त्यांना रिकामटेकडे बसून रहायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे त्या सकाळी सकाळी गार्डन मध्ये पाणी टाक, गार्डनची सफाई देखरेख असली कामे त्या करत असतात. तिघी-चौघीजणी किचन मध्ये स्वयंपाकाला मदत करत असतात दोन वृद्ध महिला तर अश्या आहेत, त्यांना आजारी माणसांची सेवा करायला आवडते. तरुणपणी त्या दोघीजणी नर्स होत्या एकीने लग्न केलेले नाही तर दुसरीला मुलांनी टाकून दिले आहे. एकाच पेशातल्या असल्यामुळे त्या एकाच खोलीत राहतात आणि आजारी वृद्ध महिलांची काळजी घेतात. त्यांची आम्हाला खूप मदत होत असते. असा हा “वृद्धाश्रम” महिलांना सहारा देणारा असला तरी त्यातील वृद्ध महिला देखील आश्रम चालवण्यास सहकार्य देत असतात. नेहमीच खेळीमेळीचे सुंदर वातावरण हे ह्या आश्रमाचे वैशिष्ट्य आहे.
सकाळी प्रार्थना झाल्यानंतर प्रत्येक खोलीची तपासणी करणे हे माझे मुख्य काम असते. खास करून रोजच्या रोज चादरी बदलल्या जातात कि नाही आणि इतर स्वच्छता ह्या सगळ्या गोष्टीवर जातीने नजर फिरवणे जरुरी असते. आणि हे सगळे करत असताना त्या सगळ्यांची थोडीशी विचारपूस हा माझा नित्यनियम आहे. ह्या उतारवयात आपली कोणी विचारपूस करत आहे किंवा कोणी उभे राहून आपल्याबरोबर गप्पागोष्टी करते आहे ह्या विचारानेच त्यांचे मन प्रफुल्लित होत असते. अशीच मधुबेन बरोबर गप्पा मारता मारता समोरच्या ७ नंबरच्या खोलीकडे लक्ष गेले. ही खोली आणि बाजूची ८ नंबर ही आमची मेडिकल रूम आहे. कोणी जास्त आजारी असले तर ह्या खोलात त्यांना हलवले जाते आणि त्यांची विशेष काळजी घेतली जाते. इथे हलवण्याचा हेतू असा असतो की बाकीच्या महिलांना त्रास होऊ नये आणि डॉक्टरांना सुद्धा त्यांच्या सवडीनुसार येणे शक्य होते आणि शांतपणे तपासणी करणे शक्य होते.
ह्या ७ नंबरच्या खोलीत गेले दोन महिने ‘केसरबा’ होत्या. ‘केसारबा’ राजकोटच्या होत्या. खात्यापित्या घरच्या चांगल्या बाई होत्या खरे तर. वय जवळजवळ ऐंशीच्या आसपास होते. पण तब्येतीने धडधाकट होत्या. तीन-चार महिन्यापूर्वी खूप ताप आला होता आणि त्यानंतर हळूहळू त्यांची तब्येत ढासळतच गेली होती.
दोन वर्षापूर्वी त्यांच्या शेजारील दोन-तीन बायका त्यांना इथे घेऊन आल्या होत्या. उंचीने थोड्याशा ठेंगण्या, जाडसर बांधा, डोळ्यावर काळ्या फ्रेमचा गोल काचांचा जाडजूड चष्मा, नीटनेटकी नेसलेली साडी, गळ्यात लांब तुळशीची माळ, चेहऱ्यावर अतिशय चिंतेचे भाव आणि खांद्यावर अडकवलेली एक मोठी लांब झोळीवजा पिशवी अशा ह्या; त्या वेळच्या केसरबा आजही मला आठवत आहेत. पायात स्लिपर्स, त्या पण फाटक्या होत्या आणि डोळ्यावरचे संपूर्ण पांढरे केस, त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक अनुभवाचे साक्षीदार, त्यांना शोभून दिसत होते.
आमच्या नियमाप्रमाणे मी त्यांना तुम्हाला इथे का यावे लागले असा प्रश्न विचारला होता. साधारणपणे ह्या प्रश्नाचे उत्तर देताना बायका हळव्या होतात, रडायला लागतात. कित्येकवेळा तर महिन्यानंतर ह्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. परंतु ह्यांनी मला थोडक्यात पण स्पष्टपणे सांगितले होते, “एक दिकरो बाहर अमेरिका जतो रह्यो. बिजो एकलोच मने केम साचवे?” (एक मुलगा अमेरिकेला गेला तर दुसऱ्याने एकट्यानेच मला का सांभाळायचे?) आणि हळूच गालातल्या गालात हसल्या होत्या. त्यांच्या त्या चिंतीत चेहऱ्यावरचे हसू; त्या नाईलाजाने इथे आल्या आहेत हे सहज सांगून गेले होते. ज्या आशाळभूत नजरेने त्या माझ्याकडे बघत होत्या, त्या नजरेत इथे जागा मिळते कि नाही हा प्रश्न मी सहज वाचू शकत होते. सगळ्या formalities झाल्यावर त्यांना बारा नंबरच्या खोलीत कुसुमबेन बरोबर जागा दिली होती. ह्या नवीन वातावरणात थोड्याशा बिचकत बिचकतच त्यांनी खोलीत प्रवेश केला होता. खरे तर, बायकांना घरातल्या आठवणी विसरून इथल्या वातावरणाशी जुळवून घ्यायला पण खूप वेळ लागतो. कित्येक वेळा त्यांची मानसिक स्थिती सुद्धा दोलायमान होत असते. परंतु केसरबा बघता-बघता इथल्या वतावरणात खूपच रमून गेल्या होत्या. हे पण कौतुकास्पदच होते.
स्वयंपाकाची तर त्यांना अतिशय आवड होती. त्या स्वयंपाकखोलीत शिरल्या कि दोन्ही स्वयंपाकवाल्या मावश्या तर त्यांच्या assistant होऊन जायच्या. संध्याकाळची खिचडी तर त्यांच्याच हातची खाण्याची आम्हाला सगळ्यांना सवयच लागून गेली होती.
ढोकळा, हांडवा ही तर त्यांची खासियत होती.
साधारणपणे बायका इथे रुळल्या की कधीतरी गप्पा मारताना त्यांची इथे येण्याची कारणे सांगत असतात. सुनांना, मुलांना किंवा ज्यांच्यामुळे त्यांना इथे राहण्याची वेळ आली, त्यांच्याबद्दल चांगले वाईट बोलत असतात. साहजिकच आहे, “वृद्धाश्रम” कितीही चांगला, सुंदर, सर्व सुखसोयींनी उपलब्ध असला तरी तो “घर” तर नसतोच, तो पाश्चात्य देशातून आपल्याकडे आलेला एक पर्याय आहे. इथे राहणाऱ्या प्रत्येकाला आपल्याला सगळ्यांनी सोडून दिले आहे ह्याची मनात खंत तर असतेच. आयुष्यभर स्वतः च्या कष्टाने, हिमतीने उभ्या राहिलेल्या माणसाला कोणाच्या तरी मदतीवर जगायला कधीही आवडत नसते. शेवटी वृद्धाश्रमात राहून मरणाची वाट बघत उरलेले आयुष्य जगणे ही उतारवयात नाईलाजाने केलेली adjustment असते. आणि संपुर्ण आयुष्यातला मोठा पराभव असतो.
Leave a Reply