ह्या केसरबाचे वैशिष्ट्य म्हणजे, त्या कधीही सुना-मुलांसंबंधी वाईट बोलल्या नाहीत. उलट मुलांचे तर भरभरून कौतुकच करत असत. कोणीतरी एकदा त्यांची थट्टा पण केली होती, “इतकी गुणी माणसे तुमच्याकडे असतांना तुम्हाला इथे का यावे लागले?” दोनच शब्दात त्यांनी उत्तर दिले होते, “माझे तकदीर” आणि परत गालातल्या गालात हसल्या होत्या. मार्मिक उत्तर देणे ही पण त्यांच्या वयाला शोभणारी खासियत होती. त्यांच्या अनेकविध गुणांमुळे आमच्या सगळ्यांच्याच त्या खूप लाडक्या झाल्या होत्या.
तीन-चार महिन्यापूर्वी ताप आला होता तेंव्हा तापात मुलांची खूप आठवण काढत होत्या. आम्ही त्यांच्या मुलाला तसे कळवले होते पण मुलाने “वेळ मिळाला की येतो” असे उत्तर तिले होते. दुर्दैवाने त्याला कधीच वेळ मिळाला नाही. आणि त्यांच्या अमेरिकेच्या मुलाने तर थोडे फार पैसे पाठवले आणि “माझ्या आईला चांगल्या डॉक्टरांकरवी चांगले उपचार करा” असा सुंदर सल्ला आम्हाला दिला होता. झाले संपले. हळूहळू त्या तब्येतीने खंगत गेल्या. खंगत जाणाऱ्या तब्येतीबरोबर त्या मुलांची खूप आठवण काढत होत्या. कित्येक वेळा आम्ही त्या मुलांना कळवले. पण दोघांपैकी एकजण सुद्धा आला नाही. राजकोटच्या मुलाने तर फोनवर बोलण्यासाठी सुद्धा नकार दिला. त्याने कारण असे दिले की, “ती मला घरी घेऊन जा असा हट्ट करेल आणि मी ते करू शकणार नाही ह्याची मला भीती वाटते.” त्याच्या त्या उत्तराने आम्ही सगळ्या बायका फारच चिडलो होतो.
शेवटच्या चार दिवस त्या कोमात होत्या. अगदी शेवटी थोड्या वेळासाठी शुद्धीवर आल्या होत्या. बाजूला उभ्या असलेल्या डॉक्टरच्या असिस्टंटलाच आपला मुलगा समजून त्याला हाक मारल्या होत्या आणि त्याचा हात आपल्या हातात घट्ट पकडून घेतला होता व पुढच्या एका क्षणात प्राण सोडला होता. आम्ही सगळे अवाक होऊन बघतच राहिलो होतो.
आई गेल्यावर मुलाला फोन केला. राजकोट-गांधीनगर चार तासाचा रस्ता होता. पण मुलाने येण्यासाठी साफ नकार दिला. आम्ही त्याला बरेच समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण रडवेल्या आवाजात, “मला लाज वाटते, मी नाही येऊ शकत.” असे सांगून फोन बंद करून टाकला.
खूप विचाराअंती अंत्यविधी उरकून टाकावा असा निर्णय घेतला. प्रत्येक बाई त्या मुलांना दोष देत होती. ‘केसरबा’ स्वर्गवासी झाल्या ह्याचे दुःख तर प्रत्येकाला होतेच पण मुलगा इतका वाईट वागू शकतो हे बघण्याचे दुःख जास्त होते. अनेक सेवाभावी संस्था अंत्यविधीसाठी पुढे आल्या होत्या. पण एका सेवाभावी संस्थेने असा निर्णय घेतला की दोन दिवस त्यांना Cold-room मध्ये ठेवायचे आणि तिच्या मुलाला पकडून घेऊन यायचे आणि त्याच्याच करवी अग्नीदाह द्यायचा. कारण शेवटपर्यंत त्या बाईंचा जीव त्या मुलात अडकलेला होता.
दुसऱ्याच दिवशी त्या संस्थेतील मंडळींनी राजकोटच्या लोकांबरोबर co-ordinate केले व त्या मुलाला समजावून घेऊन आले. त्याच्याबरोबर त्याचा दहा वर्षाचा मुलगा पण होता. आल्यापासून तो अगदी ओक्साबोक्शी रडत होता. त्याच्या प्रत्येक कृतीत त्याला खूपच वाईट वाटले आहे ते जाणवत होते.
आम्ही सगळेच त्याच्यावर खूप चिडलो होतो. ज्याच्या तोंडात जे येईल ते त्याला बोलत होते. त्याने एक नाही की दोन नाही गुपचूप सगळे ऐकून घेतले
अंत्यविधीनंतर आश्रमाच्या काही formalities पूर्ण करण्यासाठी तो आश्रमात आला होता, त्या वेळेस देखील मी त्याला अनेक प्रश्न विचारण्याचे प्रयत्न केले पण तो नुसताच रडत होता. काहीच बोलत नव्हता. न राहवून कुसुमबेन बोलून गेल्याच, “आता रडायचे नाटक कशाला करतोस”, दुसरी एक बाई म्हणाली, “असली मुले देवाने दिली त्यापेक्षा निपुत्रिक राहिली असती तरी बरे झाले असते”.
मधुबेन तर त्याच्या अंगावर जवळजवळ ओरडल्याच, “ह्या असल्या मुलांना जन्म देण्यापेक्षा बिचारीच्या पोटी एखादी मुलगी जन्माला आली असती तरी बरे झाले असते, निदान मायेने आईला भेटली तरी असती. जीव सोडताना तिच्याजवळ बसली तरी असती.” आणि रडायलाच लागल्या.
आता मात्र इतका वेळ गुपचूप ऐकून घेणाऱ्या त्या मुलाने शांतपणे डोळे पुसले आणि म्हणाला, “मावशी आता पुरे करा, कबूल आहे मी आईला ‘वृद्धाश्रमात’ पाठवण्याचे खूप मोठे पाप केले आहे. पण हे करण्यासाठी मला प्रवृत्त करण्यात कोणाच्या तरी मुलीचाच खूप मोठा वाटा आहे. हे विसरू नका. आणि तुम्हाला इथे राहावे लागते आहे त्याच्यासाठी पण कोणाची तरी मुलगीच जबाबदार असेल ह्याची मला पूर्ण खात्री आहे”.
केसारबाचाच मुलगा तो, त्यांच्याच सारखे थोडक्या शब्दात त्याने पूर्ण उत्तर दिले होते.
त्याच्या उत्तराने आम्ही क्षणभर स्तब्धच झालो. पण असे जाणवले की प्रत्येक मुलीने थोडा समजूतदारपणा दाखवला तर कोणाच्याच आईला वृद्धाश्रमाचा आसरा घेण्याची वेळ येणार नाही.
त्या रिकाम्या खोलीकडे बघताना सगळा प्रसंग अगदी जसाच्या तसा समोर उभा राहिला. रात्री पण त्या मुलाचे शब्द कानाच्या पडद्यावर आदळत होते आणि झोप आली नव्हती.
केवढे ‘विदारक सत्य’ तो बोलून गेला होता. खरोखरीच देवाने घडवलेली ही प्रेमळ, कोमल स्त्री इतकी भयंकर निष्ठुर असते का?………..
सौ वैजयंती गुप्ते
(9638393779)
Leave a Reply