लेखिका – नीलिमा क्षत्रिय
ग्रंथाली प्रकाशन
या वर्षी ‘फादर डे’ च्या दिवशी नीलिमा क्षत्रिय यांचा त्यांच्या वडीलांवार लिहिलेला लेख वाचला. खूप आवडला … साहाजिकच नीलिमा क्षत्रिय यांचं लिखाण मी वाचायला लागलो. अमेरिकेवर त्यांनी लिहिलेलं… आणि इतरही. आणि मी त्यांचं ‘दिवस आलापल्लीचे’ हे पुस्तक वाचलं (तो त्या दिवशी लिहिलेला लेख हे या पुस्तकातलं एक प्रकरण आहे).
मी साधारण बावीसएक वर्षापूर्वी चंद्रपूरहून पैनगंगा पार करून भामरागड जवळच्या ‘हेमलकसा’ इथला डॉ प्रकाश आमटे यांचा लोकबिरादरी प्रकल्प बघायला गेलो असल्याने आलापल्ली एटापल्ली आणि एकूणच या सगळ्याच अतिदुर्गम आणि नक्षलवादी असलेल्या भागाबद्दल मनात कायमच वेगळं आकर्षण आहे. त्यात लेखिका लिहितात की थोडयाथोडक्या नाही तर ४५-४७ वर्षांपूर्वी त्यांच्या बाबांची बदली या भागातल्या आलापल्ली झाली आणि हे सगळं कुटुंब तिथे राहायला गेलं. त्यावेळी समाजात बँकेचा ब्रांच मॅनेजर मोठा प्रतिष्ठित .. सन्माननीय मानला जाई. साहजिकच ते एका मोठया … प्रशस्त आवार असलेल्या बंगल्यात राहायला सुरवात करतात …. जसे ते त्या बंगल्यात पहिल्या दिवसापासून राहायला सुरवात करतात … त्या दिवसापासूनच आपण देखील आपला मुक्काम आलापल्लीतच व्हायला लागतो. लेखिका त्या वेळी चौथीत असते … ती चार भावंडं … त्यांच्या सुफिया … परमजित कौर …. शाहिना … शोभा …हे सोबतचे सवंगडी .. आणि अशा अनेक माणसांबरोबर आपली देखील दृढ ओळख होत जाते … अगदी बाबा आमटे देखील येतात … जवळच्या त्यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाची देखील आपली ओळख होते …
पुस्तकाच्या सुरवातीलाच एक शीर्षक आपल्याला आलापल्लीच्या दिवसांची चुणूक दाखवतं … ‘आत्म्याची बाज’ … ते राहात असलेला तो मोठा बंगला … त्यातून रात्री बेरात्री येणारे चित्र विचित्र आवाज … तिथे असलेलं बाईचं घुबडाचं रूप घेतलेलं भूत … अशा अनेक वावडया आणि त्या बंगल्यात असलेली ही बाज … आपल्याला खऱ्या अर्थाने आलापल्लीत नेते आणि तिथे ‘मगजी’ कुटुंबाबरोबर जखडून ठेवते … आजही तसं दुर्गम असलेल्या त्यावेळच्या आलापल्लीतल्या अनेक गोष्टी आपण बघतो … गोंड-माडिया आपल्या ओळखीचे होतात … बंगल्यात त्यावेळी लाईट नसल्याने रोज तिन्हीसांजेला कंदील … दिवाबत्ती होते … बंगल्याच्या आवारात विंचवांबरोबरच नागोबाचं फुस … कधीही ऐकायला येत असे. तिथल्या शाळेतलं वातावरण … त्यावेळचे शिक्षक … सोबतच्या मुलांबरोबरची मैत्री याचे अनेक संदर्भ आपण देखील अनुभवतो …….त्यांच्या सुट्टीतल्या खेळात आपण देखील मश्गुल होतो. यात अनेक शब्द येतात … मारगोल …… टेंभुरणीची टेंभरे …. बिब्याची फुले काढणे …. चल्लस खेळणे … झाडबंदर हा खेळ … खिरन्या .. शिमटीने मोहाची दारू चाखवणे …. मोहाच्या झाडाला आदिवासी लोक देव मानतात … पवित्र मानतात … अन्नदाता मानतात … जन्म मृत्यू लग्न सण अशा सगळ्याच महत्वाच्या घटनात मोहाच्या झाडाचं अतोनात महत्व असतं … मोहाच्या फुलाचे पुरण असे अनेक शब्द …गोष्टी येतात … ज्या आपल्या मनाला मोह घालतात .. त्या शब्दांचे अर्थ आपण लावायचा प्रयत्न करत राहातो … डिंग्र्या ताकात भिजवून वळवायच्या … भोपळ्याचा किस भरून मिरच्या वाळवणे … डिंग्र्या म्हणजे नेमके काय याची खूप उत्सुकता लागते … लोणी काढताना … ‘टोक लावणे’ हा शब्द देखील ती कृती डोळ्यांसमोर उभी करतो.
पुस्तक आणि त्यातल्या या अशा काळाच्या ओघात लुप्त झालेल्या अनेक साध्या सुंदर गोष्टीत आपल्याला चक्क तीन वर्ष बांधून ठेवतं … लेखिकेच्या आईला या बदल्या आणि संसार नवीन जागी हलवणे याची इतकी सवय असते की … त्यांनी लिहिलंय … पॅकिंग करताना पोपटी रंगाच्या वेगळ्या ट्रँकेत दोन वेळचा स्वंयपाक होतील असा शिधा … डाळ, तांदूळ , मीठ मसाला .. कुकर स्टोव्ह लाटणं पोळपाट … म्हणजे बदलीच्या गावी पोचलं की लगेच ही बॅग उघडून मुगाची खिचडी तरी लगेच करता यावी. तोंडी लावण्यासाठी चटणीची बाटली देखील या बॅगेत न विसरता आई ठेवत असे. त्या आपल्या मनोगतात शेवटी म्हणतात …. बालपण म्हटलं की मला आलापल्लीची आठवण न येणं, कृतघ्नपणा ठरेल. आलापल्ली नेहेमी माझ्या नजरेसमोर येतं, ती एका सोशिक आदिवासी स्त्रीच्या रूपात, जिने दारिद्र्याची काळी किनार असलेले, हिरव्यागार जंगलाचे रेशमी वस्त्र पांघरलेले आहे ….
पुस्तक अतिशय मनस्वीपणे लिहिलंय … नक्की आवर्जून वाचावं असं आहे … मला नक्कीच खूप आवडलं … परत चंद्रपूरहून हेमलकश्याला जावं आणि वाटेतलं आलापल्ली नीट बघावं … पुस्तकात कळलेल्या वाटांवरून मोठा फेरफटका मारावा, अशी देखील प्रबळ इच्छा झाली…
– प्रकाश पिटकर
Leave a Reply