अश्विन वद्य एकादशीच्या या पवित्र दिवसापासून सणांचा राजा दीपोत्सव आपल्या जीवनात प्रकाशाचा मंगलमय पर्व घेऊन येत आहे. हा सण आठवडाभर चालणारा आणि मनाच्या कप्प्यात वर्षभर रेंगाळणारा आहे. दीपावलीच्या या शुभप्रसंगी, आपणा सर्वांना हृदयापासून हार्दिक शुभेच्छा!
या दीपावलीची सुरूवात एकादशीपासून होते. एकादशीचा हा दिवशी आत्मशुद्धीचा योग साधतो, मन व शरीर निर्मळतेकडे नेतो. मग येते वसुबारस, ज्या दिवशी गोमातेचे पूजन करून तिच्या महतीचा जागर केला जातो. ही आहे निसर्गाशी आपली एकात्मता प्रकट करणारी दिवाळीची पहिली आघाडी.
धनत्रयोदशीचा सुवर्णदिन समृद्धी व आरोग्याचे प्रतीक म्हणून गौरवला जातो. या दिवशी धन्वंतरी भगवानाचा आशीर्वाद लाभावा म्हणून कुटुंबात सौख्य व स्नेह वृद्धिंगत होईल अशी कामना करतो.
नरकचतुर्दशीचा दिवा हा विजयानं भरलेला असतो. राक्षसविनाश, अंधकाराचा अंत करून प्रकाशाच्या विजयाची ज्योत चेतवतो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीचे स्वागत करून तिच्या चरणकमलांचा आशीर्वाद आपल्या संसारात स्नेहाने उजळतो.
बलीप्रतिपदेच्या शुभदिनी महाबली बळीराजाचे स्मरण करतो, जो यशस्वी राजा आणि पराक्रमाचा प्रतीक आहे. या दिवशी बळीराजाच्या स्वागतासाठी दीप लावून त्याच्या आशीर्वादांनी जीवन गुढतेने, स्नेहाने उजळावे ही प्रार्थना करतो.
आणि मग येते भाऊबीज, जेव्हा बहीण-भावांच्या अनोख्या नात्याचा गौरव होतो. प्रेम, विश्वास, वचन आणि सुरक्षिततेचा हा दिवस त्यांच्या नात्याचे महत्त्व अधोरेखित करतो.
या सात दिवसांचा हा प्रकाशमय दीपोत्सव आपल्या जीवनात स्थिर आनंद, संपन्नता आणि शांतीचा चिरंतन प्रकाश घेऊन येवो ही परमेश्वरचरणी प्रार्थना.
।। शुभं भवतु ।।
शुभ दीपावली!
-संजय देशमुख परिवार
Leave a Reply