नवरात्र संपून दसरा उजाडायचा ,
आणि वेध लागायचे दिवाळीचे.
मधला काळ पंधरा दिवसांचा ,
पटकन संपून जावा वाटायचे.
चिवडा , लाडू , चकली ,शेव
सारेच तेव्हा घरी बनायचे.
विकतच्या घरगुती फराळाचे पेव ,
तेव्हा बाकी होते फुटायचे.
अप्रूप होतं नवीन कपड्यांचं ,
नवीन शर्ट आणि नवीन पॅंटचं .
आम्हाला मनासारखं सगळं मिळायचं ,
तुमच्यासाठी काय घेतलं विचारायचं –
आनंदात नेहमीच राहून जायचं.
फटाक्यांची भावंडात विभागणी व्हायची ,
मिळाले ना सारखे ? नजर असायची.
हवेत मस्त थंडी फुलायची ,
भल्या पहाटे जाग फटाक्यांनी यायची.
गोधडीत गुडुप्प झोपावं वाटायचं ,
कशाला इतक्या लवकर उठायचं ?
अचानक यायचा उटण्याचा सुवास ,
बंबात टाकलेल्या जळणाचा वास.
डोळ्यावरून झोप अलवार उडायची ,
झिरमिळ्या कांदिलाकडे सहज नजर जायची.
सुंदर रांगोळी काढलेली पाटाभोवती ,
पाटासमोर तेल उटण्याची वाटी.
आईचा हात उटण्याचा घमघमाट ,
मोरीत जाऊन उभं राहायचं ,
कडकडीत पाणी अंगावर घ्यायचं .
थंडी पळून कुठच्या कुठे जायची –
नजर नव्या कपड्यांकडे असायची.
गोविंदा गोविंदा !म्हणून कारीट फोडायचं ,
कडूढाण बोट जिभेला लावायचं.
धूम पळायचं फटाके वाजवायला ,
अनार , लवंगी , भुईचक्र लावायला.
भूक वाढलेली असायची पोटात ,
फराळाची चित्र तरळायची डोळ्यात.
पाटावर रांगेत सारी बसायची ,
ओवाळणी अन्नपूर्णेच्या हातून व्हायची.
पोहे ,फराळ हाणायचे मस्त ,
तुडुंब तृप्तीने पोट व्हायचे सुस्त .
सारेच एकत्र देवळात जायचे ,
जिथे पहावं तिथे प्रसन्न वाटायचे.
शेवटचा दिवस भाऊबीज यायची ,
दिवाळी संपल्याची जाणीव व्हायची.
आणि आठवायचा अभ्यास सुट्टीतला ,
दिवाळीच्या आनंदात विस्मृतीत गेलेला.
आता हे काहीच होत नाही ,
पहाटेचं अभ्यंगस्नान दिसतच नाही.
फराळ कंदील सारे विकतचे ,
साच्यातून काढलेले एकाच चवीचे.
व्हॉट्सॲप वर हॅपी दिवाळी म्हणतात ,
मेसेज फॉरवर्ड करत रहातात.
असो ! जीवनाच्या वाटेवर चालायलाच हवं ,
बदलत्या वातावरणाबरोबर बदलायला हवं.
तरी त्या दिवाळीची मित्रानो , आठवण होते अनावर ,
का हो ! काहीच उपाय नाही का यावर ?????
ही दिवाळी आठवते का ? नक्की कळवा !
प्रासादिक म्हणे
— प्रसाद कुळकर्णी.
Leave a Reply