दिवाळी दिवाळी आ ssss ली
कांही तिखट.. कांही गोड !
दरवर्षीप्रमाणे ‘दिवाळी’ आली, पण ती अगदी आजच आली आहे याच्यावर विश्वासच बसत नाही, मला भिंतीवरच्या ‘कालनिर्णय’ वरून समजलं. पण तरीही माझ्या ‘झोपी गेलेल्या आठवणी जाग्या झाल्या’.
खरं म्हणजे हल्लीच्या दिवाळीवर लिहूंच नये, कारण ‘आमच्या वेळी….’ असा सूर लावल्याशिवाय दिवाळीचे गाणे रंगणारच नाही.
त्यावेळी आम्ही सगळेच गरीब होतो, गरीब होतो म्हणजे काय, तर श्रीमंत नव्हतो, म्हणजे आम्ही गरीब आहोत हेच मुळी आम्हाला ठाऊक नव्हतं, म्हणजेच श्रीमंती काय असते हेच मुळी आम्हाला कुणालाच ठाऊक नव्हतं. पण भले नसूं श्रीमंत पण आनंदी नक्कीच होतो, घरी गणपती, दिवाळी, श्रावण महिना, पाडवा, दसरा दणक्यात साजरा करीत असूं, मग आम्ही गरीब कसे बरं ? घरात खायला व्यवस्थित मिळत होतं, मोजकेच कां असेना, पुरेसे कपडे होते, पण आम्ही त्यावेळी जी श्रीमंत दिवाळी साजरी केली होती ती आजची श्रीमंताची मुलं तरी करतात कां ? कारण त्यांना गरीबी म्हणजे काय हेच मुळी माहीत नाही, तर दिवाळी म्हणजे काय हे कसं कळणार बरं ?
त्यावेळची दिवाळी म्हणजे आमच्या एका कविवर्य मित्रांच्या भाषेत सांगायचं तर ‘पंचेंद्रियांचा महोत्सव, आनंदाचं इंद्रधनुष्य आणि डोळ्याचा दीपोत्सव वगैरे होता. आतां (‘गड आला पण सिंह गेला’च्या चालीवर) पैसा आला पण दिवाळीचा तो आनंद गेला. (पंचेंद्रिय म्हणजे डोळे. नाक, कान, जीभ आणि त्वचा, बरं कां ?) जुन्या काळी “दिवाळी दिवाळी आsssली” याची वर्दी महिनाभर आधीच लागत असे, हल्ली “आली माझ्या घरी ही दिवाळी” हे पेपर मधल्या सफाई कामगारांचे संप, बोनसच्या मागण्या, पेपर मधल्या हजारो जाहिराती, कपड्यांची आणि मिठाईची सजलेली दुकाने भेसळयुक्त माव्याच्या बातम्या, आणि दुकानांमधली उबगवाणी गर्दी, रस्त्यावरचा मरणाचा वाढलेला ट्राफिक, भयानक प्रदूषण, भीतीदायक फटाके, आणि रस्तोरस्ती चिनी आकाश कंदील आणि इलेक्ट्रिक माळा विकणारे विक्रेते.. वगैरे वगैरे गोष्टींमधून कळते. (ही तुलना अपरिहार्य आहे).
आमच्या वेळी (हे पालुपद राहणारच) डोळ्यांना (पाहा : पंचेद्रिये) सुखावणारे बहुतेक पारंपारिक आकाराचे कंदिल घरीच बांबूच्या कामट्या तासून त्यावर निरनिराळ्या रंगाचे पतंगाचे रंगीत कागद घरी केलेल्या खळीने (खळ म्हणजे एक प्रकारचं गोंद. (किंवा ‘गम’, हल्ली त्याला ‘ग्लू’ असेही म्हणतात बरं कां) चिकटवून आणि जमेल तेवढी सजावट करून त्यात बल्ब सोडून (कांही जण त्याला ‘ग्लोप’ तर कांहीजण त्याला ‘गुलोप’ ही घराबाहेर लटकावले जात आणि त्यांच्याकडे दुरून अभिमानाने पहाणे ही एक वेगळीच मजा होती. कांही जास्त कल्पक वगैरे मंडळी ‘पायलीचा फिरणारा कंदिल’ करीत असत.
आमच्या वेळी (हे पालुपद राहणारच) दिवाळीचा फराळ म्हणजे जिभेची चैन (पहा : पंचेद्रिये) होती. हा फराळ म्हणजे करंज्या, बेसनाचे लाडू, चिवडा, चकली, शेव, कडबोळी, शंकरपाळे, हा सर्व घरोघरच्या आया (म्हणजे ‘आई’चे अनेकवचन बरं कां) स्वत: बनवीत असत आणि यात आश्चर्याची बाब म्हणजे घरोघरचे ‘बाप’ आणि मुलं एक चेंज म्हणून त्यांना त्यासाठी मदतही करीत असत, उदा. करंज्यांसाठी पीठ खलबत्त्यात कुटून देणे वगैरे. त्यावेळी दिवाळीच्या निमित्ताने माणसं एकमेकांच्या घरी फोन न करतां फराळाच्या निरनिराळ्या पदार्थांचा आस्वाद देण्याघेण्यासाठी मोकळेपणाने येत जात असत. (रसनेचा रसास्वाद, वगैरे !).
हल्ली ‘आम्ही दिवाळीचे पदार्थ घरीच करतो बुवा’ ही सुद्धां एक बातमीच होते आणि पुरावा म्हणून त्या पदार्थांचे फोटो फेसबुक वर टाकण्याची एक स्पर्धाच लागली आहे, आतां तेच फोटो ‘गुगल’ वर रेडीमेड मिळतील, चोरले जातील आणि भविष्यकाळात तर तेच फोटो टाकले जातील.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी ‘आली दिवाळी दिवाळी.. पहाटेच्या त्या आंघोळी” म्हणजे त्वचेचा आणि नाकाचा आनंदोत्सव. कडकड दांत वाजवणा-या थंडीत (त्यावेळी ती असेही) आईने उटणी लावून कढत (गरम नव्हे) पाण्याने घातलेल्या दिवाळी स्पेशल ‘मोती’ साबणाच्या आंघोळी. नंतर अत्तरं, गंध लावून, ते कोणते ते एक लाल रंगाचं लोकप्रिय सुगंधी चिकट तेल (नांव आठवत नाही) डोक्याला लावून त्या पहाटे सर्वात आधी उठण्याच्या चढाओढी, चाळीखाली, आळीत किंवा वाड्यात पहिला फटाका वाजवण्याची स्पर्धा, नंतर घराजवळच्या (बहुतेक गणपतीच्याच. पण गणपतीच्याच कां, इतर देवांना नको का, हा प्रश्न मी आईला विचारला तर आईने माझ्या पाठीत एक धपाटा मारलेला आणि वडिलांनी ‘अतिशहाणा आहे’ म्हणून मारलेला शेरा, मला अजून आठवतो). देवळात देवाला दाखवलेला फराळाचा नैवेद्य आणि घरी येऊन सहकुटुंब बसून घरच्या फराळाचा घेतलेला मनसोक्त आस्वाद.
आतां कान (पहा : पंचेद्रिये). आमच्या वेळी (इलाज नाही हो..) प्रत्येक घरी मुलांना (निदान तीनचार तरी असतच) टोपली भरून ऐपतीनुसार फटाके आणत असत. त्याची आपापसात वांटणी म्हणजे आरक्षणाची वाटणीही त्यापेक्षां सोपी वाटावी. त्यातच मामा वगैरेही (निदान तीनचार तरी असत) फटाके आणून देत असत. फटाके म्हणजे फुलबाज्या, भुईचक्र, पाऊस, केपाची पिस्तुलं, लवंगी फटाके वगैरे. (त्यावेळी फटाके वाजवायला बंदी नव्हती) दिवाळीच्या शेवटच्या भाऊबीजेच्या दिवशी रात्री उरलेसुरले सगळे फटाके वाजवून संपवून टाकणे. त्यातला महत्वाचा न चुकणारा विधी म्हणजे लवंगी फटाके सोडवून त्यातली दारू एकत्र घेऊन भक्कन् एकरकमी पेटवणे….त्यांचाही हवाहवासा वाटणारा एक विशिष्ट वास अजून आठवतो. (अजून खूप लिहितां येईल, पण कशासाठी ? नाही कां ? बस झालं.)
आणि शेवटच्या दिवशी येणारी भाऊबीज, बहिणींची ओवाळणी, आईला ओवाळणी घालण्यासाठी घरी न चुकतां दरवर्षी येणारे मामा.. जातांना त्यांनी दिलेली खाऊ घेण्यासाठी दिलेले रुपया, आठ आणे. (मी मोठा, पांच सहा वर्षांचा म्हणून मला एक रुपया आणि मधल्या बहिणीला आठ आण्यांची दोन नाणी आणि धाकट्या बहिणीला चार चार आण्याची चार नाणी, त्यामुळे आपल्याला जास्त पैसे मिळाले म्हणून त्यांना जाम आनंद व्हायचा).
आणि ती आज उद्यां करूं करूं म्हणून तोपर्यंत राहून गेलेल्या शाळेने दिलेल्या गृहपाठाची खाडकन् झालेली कडू आठवण…… संपली दिवाळी !
काळ बदलतोय आणि बदलणारच, कारण ‘बदल’ हाच एक काळाचा ‘स्थायी’भाव आहे, त्याला इलाज काय !
सर्वांना दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा !
– सुभाष जोशी, ठाणे
Leave a Reply