बऱ्याच दिवसांनी अण्णा मनसोक्तं हसले. बाकीचे तिघे आत गेले. रात्रभर आतून हसण्याखिदळण्याचे आवाज, चिवडा, लाडू, शंकरपाळ्यांचे खमंग सुवास येत राहिले. बाहेर पहाट वयात येऊ लागली होती. सूर्य वर यायला लागला होता. पण दिवाळी मात्रं जवळपास सूर्यास्ताला आलेल्या चार हळव्या, कातर जिवांची चालू होती.
रत्नागिरीला जाताना हातखंब्याचा तिठा लागायच्या आधी निवळी जवळ उजव्या हाताला गणपती पुळ्याचा फाटा लागतो. तिथून आत गेलात की मैलभर अंतरावर डाव्या हाताला कडेनी पसरलेल्या लाल मातीतून आता दोन्हीबाजूला फुटपट्टीच्या आकाराचा पन्नास ठिकाणी उखडलेला एकेकाळी काळाभोर असण्याची शक्यता असलेला डांबरी रोड जातो. तिथून आत गेलात की पाच मिनिटांवर उजव्या हाताला एक चिऱ्यात बांधलेलं घर दिसेल. तिथे अण्णा पेंडसे आणि त्यांची बायको कुमुद रहातात. मागे नारळी, सुपारी, रातांबे, आंब्याची झाडं आहेत. त्यांच्या शेजारीच त्यांच्या सारखंच पण थोडं लहान घर बांधलेला रंग्या भाटवडेकर आणि त्याची बायको रजनी रहातात. दोघांच्या घरापुढे कायम स्वच्छ, शेणानी सारवलेलं अंगण आहे. अण्णा काय किंवा रंग्या काय, सकाळचे गेलात तर अंगणं झाडताना, इनमिन चार देवांसाठी सिद्धिविनायकाला पुरतील एवढी फुलं काढताना, एकमेकांना लांब अंतरावर असल्यासारखे मोठ्याने हाका मारताना दिसतील नाहीतर मग बागेत पाणी सोडत असलेले, पडलेल्या सुपाऱ्या, झावळ्या उचलताना दिसतील. साडेचार पाच झाले की मात्रं ते खुर्च्या टाकून अंगण्यात बसतात. अण्णा वयानी मोठे त्यामुळे रंग्या तिथेच असतो सहसा पान जमवायला आणि गप्पा ठोकायला.
आजंही अण्णा सगळं आवरून खुर्चीत बसले होते. पायापाशी पानाचा डबा होताच. उन्हं उतरत चालली होती, साडेपाच झाले असतील फारतर. कुमुद वहिनी पायटण्यांवर बसल्या होत्या.
‘चहा टाकतेस काय कोपभर?’
‘जरा मेलं टेकलं की तुम्हांला लगेच हुक्की येते, टाकते, पाच मिनिटांनी चालेल ना की लगेच शोष पडलाय अगदी?’
‘जेवायच्या आधी दे म्हणजे झालं.’ ठसका लागेपर्यंत हसत अण्णा म्हणाले.
तेवढ्यात त्यांना मळखाऊ रंगाची लाज काढेल अशा रंगाची बर्मुडा, खांद्यावर एक पंचा आणि साईझ कळण्याच्या पलीकडे गेलेला, एकेकाळी पांढरा असावा असा तांबडट गंजीफ्रॉक घालून दोघांच्या इस्टेटीची बॉर्डर ठरवणाऱ्या गुडघाभर उंचीच्या एकावर एक नुसते चिरे मांडून उभारलेल्या भिंतीवरून टांग टाकून येणारा रंगा दिसला.
‘एक कोप वाढला गं तुझा’.
‘एक कशानी, दोन वाढतील, त्याची सावित्री याला यम घेऊन जात असल्यासारखी येईलच पाठोपाठ.’
रंगा परिपाठ असल्यासारखा सरळ घरात शिरला आणि एक खुर्ची घेऊन आला. अण्णांच्या समोर त्याच्या वजनानी कुरकुर वाजणाऱ्या खुर्चीत ऐसपैस मांडी घालून बसला आणि पानाच्या डब्याला हात घालून म्हणाला,
‘अण्णा, थंडी पडायला लागली, कोजागिरी झाल्यावर पडतेच म्हणा. दरवर्षी थंडी जास्ती पडते असं वाटायला लागलंय मला हल्ली.’
‘एखाद डिग्री वाढली असेल थंडी, आपण आता म्हातारे झालो हे मेन कारण, काय समजलास!’
‘रंगूशेठ चहा पिणार ना, यांचा टाकतीये. तू नाही म्हणणार नाहीस, पण एक आपली पद्धत विचारायची, सावित्री कुठाय आणि तुझी, अजून आली कशी नाही पाठलागावर ती.’
‘टाक गो वैने, तुझ्याहातचा चहा घेतला की त्याची चव जाऊ नये म्हणून थुंकी सुद्धा गिळत नाही मी नंतर.’
‘महागोडबोल्या आहेस, आलीच बघ सावित्री पाठोपाठ, तरी बरं इथे तरणं नाही कुणी म्हणून बरं, नाहीतर शेपूट होऊन हिंडली असती.’
रजनी कुमुद वहिनींची लांबच्या नात्यातली. रंगा भाटवडेकराचं लग्नं तिच्याच शब्दावर झालं होतं त्यामुळे वडीलकीचा होता त्यापेक्षा प्रेमाचा अधिकार जास्ती होता त्यांचा दोघांवर. एकमेकांच्या अनेक सुखदु:खाच्या क्षणात ते सहभागी होते. अण्णांचा मुलगा शरद, त्याची बायको सुलभा आणि त्याचा मुलगा अमेय मुंबईला रहायचे. रंगाची मुलगी सुमेधा पण मुंबईलाच दिली होती. त्यामुळे ते चारजण एकमेकाला कायम धरून असायचे. सुमी होळीच्या पालखीला, गणपतीला उभ्या उभ्या का होईना येउन जायची, मे महिन्यात काय निवांत महिना पाऊण महिना धुडगूस असायचा तेवढाच, दिवाळीत मात्रं सुमीला जमायचं नाही, तिची घरची दिवाळी सोडून ती कुठे येणार, त्यात तिचा मुलगा यंदा दहावीला होता. शरद यायचा आधी दरवर्षी दिवाळीत पण सुलभाला फार आवडायचं नाही. त्यात आता ते सगळे दर सुट्टीला कुठे नं कुठे बाहेर जायचे त्यामुळे दिवाळीला त्यांचं येणं थांबलं होतं, अण्णांना दर वर्षी खंतावायाचे पण ते बोलायचे काही नाहीत, त्यांच्यापेक्षा वहिनी कणखर होत्या. दोन वर्ष त्यांनी बोलावलं, नंतर त्यांनी कधीही विषय काढला नाही की शरदला कधी टोमणा सुद्धा मारला नाही, ’त्याची इच्छा असेल तर येईल, आणि फिरतोय तर फिरू दे, म्हातारा झाल्यावर काय बघणार, ताकद नको?’ एवढं बोलून त्यांनी विषय संपवला होता.
आत्तासुद्धा रजनी त्यांच्या पाठोपाठ आत गेली आणि आतून हसण्या खिदळण्याचे आवाज येऊ लागले. दोघी दोन्ही हातात चहाचे कप घेऊन आल्या आणि पायटण्यांवर बसल्या. सावल्या लांबू लागल्या, अंधार जाणवू लागला होता, थंडीचं बालपण सुरू झाल्यासारखी थंडी नाजूक पडली होती. गरमागरम चहाचे कप हातात शेकत सगळे घुटके घेण्यात दंग झाले. वाढत चाललेल्या अंधारात प्रत्येकाच्या ओठांपाशी वाफ दिसत होती फक्त. चहा संपला आणि रजनीनी उठून दिवा लावला. प्रकाश पडल्यावर सगळ्यांना बरं वाटलं. अण्णा आणि कुमुद वहिनींना वाटत होतं रंगा सुमी येतीये असं सांगेल आणि रंगा रजनी वाट बघत होते ते शरदची काही बातमी देतात का.
शेवटी रंगाने विचारलेच, ‘वैने, परवा ना धनत्रयोदशी?’
‘होय’.
‘शर्या येणार आहे का?’
‘नाही.’
उत्तर तुटक असल्यामुळे त्याला पुढे काही बोलायचं सुचलं नाही.
क्षणभर शांततेत गेल्यावर अण्णा बेचैन झाले आणि म्हणाले, ‘सुमी येणारेका कार्टी?’ आणि स्वत:च उत्तर दिलं ‘तिचा पोरगा दहावीला ना, ती कशी येईल म्हणा’ आणि गप्पं झाले. विषय बदलायला रंगानी विचारलं, ‘वैने, बेसन भाजल्याचा वास नाही आला तो तुझा यंदा’.
‘काहीही करणार नाहीये, बुरा लागून जातो पदार्थांना, घरी दह्याचा चक्का लावेन म्हणतीये, खाणार कोण केलेलं, निम्मं तुझ्याच घशात जातंय, सण म्हणून चार लाडू, थोडा चिवडा आणि शंकरपाळे करेन, अनारसे मी कधीच बाद केलेत करण्यातून’.
रजनीला काही ते सहन होईना. तिला अद्भूत कल्पना सुचल्यासारखं झालं. ती म्हणाली, ‘मी काय म्हणते ताई, आपणच जाऊया का सुमीकडे?’ अण्णा आणि वहिनींना कळलच नाही पहिल्यांदा. रंगा नी रजनी घरून ठरवूनच आले होते. ठरल्याप्रमाणे रंगानी लाकूड पुढे सरकवलं आणि शेकोटी पेटती ठेवली.
‘रजने, कितीतरी वर्षानी शहाण्यासारखं काहीतरी बोललीस बघ’. अण्णा त्या कल्पनेनीच हरखून गेले होते.
वहिनी म्हणाल्या, ‘भाटवडेकर, मी तुम्हाला बरीच वर्ष ओळखतीये, रजनीच्या खांद्यावर बंदूक नको, सरळ सांग काय ते.’
‘काय नाही गं, माझ्याच मनात विचार आला. भुतासारखे चार दिवस आपण एकमेकांची तोंडं बघत सण पाठीवर टाकणार त्यापेक्षा सुमीकडे जाऊन येउयात. हरखून जाईल, तिच्या मनात असणारच की आपण यावं, बोलेल कशी? पुलावरच्या बंड्या मुळेची सुमो रिकामी आहे उद्या न परवा. उद्या रातचे निघालो, परवा उजाडता तिच्या घरी आणि रात्री तिकडून निघू, पहाटेला आपल्या दरवाज्यात परत, काय म्हणताय बोला.’
अण्णा काय, वहिनी काय, दोघांचा जीव होता सुमीवर पहिल्यापासून. बाहेर जाणंही होईल, सुमी भेटेल, तिची मुलं भेटतील, तिला होईल त्याच्या पटीत आपल्याला आनंद होईल या विचारांनी वहिनी हरखून गेल्या अगदी.
पण उघडपणे मात्र त्या म्हणाल्या, ‘तिच्याकडे फराळाचं दुकानातून न्यायचं का? तिच्या सासरचे लोक तोंडात शेण घालतील. तुम्हा पुरुषांची सवय जाणार नाही. चार माणसं आयत्यावेळी जेवायला आणाल नाहीतर बाहेरून येऊन लगेच निघायचं म्हणाल. उठ गं, करायला घेऊ आत्ताच सगळं. मी बेसन भाजायला घेते, तू रवा घे भाजायला आणि खोबऱ्याचे काप करायला दे याला. पान खात बसतील नाहीतर नुसते.’
‘वैने, जेवायला मी पिठलं भात करतो तोवर. सुमीला तुझे बेसनलाडू फार आवडतात, मी वळून देईन.’
अण्णा म्हणाले, ‘मला काम सांगा.’
‘काही नको, खुर्चीतून डायरेक्शन करू नका हीच मदत, फार तर लाडूला नंतर एकेक बेदाणा लावत बसा, त्यात चुकण्यासारखं काही नसतं.’
बऱ्याच दिवसांनी अण्णा मनसोक्तं हसले. बाकीचे तिघे आत गेले. रात्रभर आतून हसण्याखिदळण्याचे आवाज, चिवडा, लाडू, शंकरपाळ्यांचे खमंग सुवास येत राहिले. बाहेर पहाट वयात येऊ लागली होती. सूर्य वर यायला लागला होता. पण दिवाळी मात्रं जवळपास सूर्यास्ताला आलेल्या चार हळव्या, कातर जिवांची चालू होती.
***
सगळं आवरून ठरल्याप्रमाणे कुमुदवहिनी, अण्णा, रंगा आणि रजनी नवाच्या ठोक्याला वरच्या आंब्यापाशी आले. मंगळागौर जागवावी तसे अगदी टक्कं जागे होते चौघंही रात्रंभर. फराळ झाला, जुन्या आठवणी झाल्या, गप्पा झाल्या. चहा आणि पानाच्या खुराकावर अण्णा आणि रंगा गप्पा ठोकत काम करत होते. कालच्याप्रमाणेच दुपारी जेवायला रंगाने पिठलं भात केला होता. कुमुदवहिनींनी सगळा फराळ तयार झाल्यावर अत्यंत समाधानी चेहऱ्याने त्याकडे पाहिलं. फराळ गरम होता म्हणून त्यांनी तो तसाच उघडा ठेवला होता. ’अंघोळ करणार आहात का की जेऊन तसेच लोळणार आहात?’ ’पाणी ठेव मागच्या चुलीवर’. ’ठेवलंय कधीच, पानं कोण खाईल सारखी, आजूबाजूला काय होतंय ते कळलं असतं नाहीतर’. रंगा आणि अण्णा अजून एकेक पान खात अंघोळीला पळाले. दुपारची जेवणं झाल्यावर सगळे लवंडले.
कोकणातली थंडी, कितीही पडली तरी दुपारी उकडायचंच. पाचला वहिनींना जाग आली. कुणाला उठ म्हणण्याऐवजी पंखा बंद करायचा त्यांचा सोपा उपाय होता. पदराने मानेचा घाम पुसत त्या उठल्या. पंखा बंद करून मागच्या अंगण्यात जाऊन त्यांनी तोंडावर पाण्याचा हबका मारला आणि घरात येऊन चहा करायला घेतला. रजनीही पाठोपाठ तोंड धुवून आली.
‘ताई, मी करते चहा थांब.’
‘नेहमीसारखी निम्मं काम झाल्यावर येशील तू, चहाचं मी बघते, तू फराळाचे चार भाग कर, दोन न्यायला, एक तुमचा आणि एक इथला आणि त्या रंगाला म्हणावं, बंड्याला फोन कर, दोघंही घोळघाले आहेत.’
ऐकून रंगा खुर्चीतून उठला आणि आत येऊन त्याने फोन लावला. ‘वैने, नवाच्या ठोक्याला वरच्या आंब्यापाशी येतोय तो’.
‘रंगा, तू विसरला होतास, उगाच आव आणू नकोस लक्षात असल्याचा, हे चहाचे कप बाहेर ने तुमचे, सगळं हातात पाहिजे कायम तुम्हांला.’
त्या दोघीही कप घेऊन पायटण्यांवर येऊन बसल्या.
‘अण्णा, कसे दिवस काढले असतील तुम्ही फौजदाराबरोबर इतकी वर्ष?’ चहाचा भुरका मारता मारता रंगाने काडी टाकली.
‘तर तर, फौजदार म्हणे, यांच्या तोंडात कायम मूग, गिळायचे आणि गप्पं बसायचं, मी बोलते म्हणून वाईट. अण्णांची बाजू घेतोयेस अगदी, लाडवाला बेदाणे लावण्याशिवाय काय काम केलंय का बघ कालपासून, सुमीकडे असं सांगतील की सगळं यांनीच केलं आणि मी फक्त डबे भरले’. सगळे खळखळून हसले.
चहा संपवून वहिनी म्हणाल्या, ‘आवरायला घ्या चला, गाडी आहे म्हणून उगाच सामान घेऊ नका, बसायला जागा राहू दे’. जायच्या ओढीने सगळ्यांनी आवरायला घेतलं. एक दिवसाचे कपडे फक्त, दोन पिशव्या झाल्या. वहिनींनी दहा बारा नारळ, सुपाऱ्या, कोकमं, आगळ, आंब्या, फणसाची साटं, लसणाची, कारळ्याची चटणी, लोणचं, घरच्या तुपाची बरणी असे जिन्नस काढून ठेवले होते.
‘अण्णा बघितलंत ना, हुकूमशाही कशी असते ती. आपल्याला नियम आणि हीने चार पिशव्या सामान काढलंय,’ रंगा म्हणाला.
‘हे बघा भाटवडेकर, तुम्हाला एक तर आधी बुद्धी कमी आहे. हे सामान नाहीये आणि. लेकीला देतो ते सामान नसतं, त्याला ओझं नाही म्हणत. आईची माया चिकटलेली असते ते भरताना, तुला नाही कळणार ते,’ वहिनी म्हणाल्या.
रजनीच्या डोळ्यात पाणी तरारलं. तिला तिच्या मुलीला न्यायला अजून काही उरलंच नव्हतं.
‘रजने, आधीच सांगून ठेवत्ये, काय रडायचंय ते इथेच रडून घे, तिथून निघताना रडशील तर धपाटा घालेन, पोर खंतावते उगाच मग आपणच रडलो की’, वहिनी म्हणाल्या.
दोन घास भात खाऊन, झाकपाक करून, सगळी कुलुपं चार वेळा ओढून, घराला दोन चकरा मारून सगळे आंब्यापाशी आले तेंव्हा नऊ वाजले होते. सगळं सामान मागे, पुढे कानटोपी घालून रंगा आणि मधे बाकीचे तिघे बसले.
‘वैनी निघायचं का?’ बंड्या म्हणाला.
‘पंचांग आहे का बघ गाडीत आणि युद्धावर जायचं नाहीये, सुमीकडे जायचंय अंधेरीला, नीट सावकाश ने, रंग्याशी गप्पा मारू नकोस सारख्या, पुढे लक्ष ठेव.’
‘बाकी सगळे झोपतील पण तू भुतासारखी जागी रहाशील बघ,’ बंड्या म्हणाला.
‘नीट नेऊन आणलंस तर पैसे देणारे नाहीतर होळीच्या पालखीला मिळतील पैसे.’
‘देशील गो, नाही दिलेस तर आंबा उतरवून नेईन तुझा, त्यात काय एवढं.’
सगळेजण खिदळत राहिले. मिळू घातलेल्या आनंदाच्या ओढीने तुडुंब भरलेलं ते धावतं चिमुकलं विश्वं अंधारात कणाकणाने मुंबईच्या दिशेने सरकत राहिलं. प्रत्येकजण पापण्या मिटून आपापल्या परीने सुमीच्या घरची आनंदाची चित्रं रंगवत होता. काही राहिलं असं वाटून ती पुसून नव्याने काढत होता. पदरात येणाऱ्या सुखाच्या क्षणापेक्षा त्याची स्वप्नं रंगवणं जास्ती सुखकारक असतं, त्यात ओढ असते, प्रतीक्षा असते, एकदा ते सुख मिळालं, उपभोगलं की त्यातील गंमत संपली. सहाच्या ठोक्याला बंड्याने अंधेरीला सुमीच्या बिल्डिंगखाली गाडी थांबवली आणि ती स्वप्नमालिका थांबली. सगळे जवळपास जागेच होते.
रंगाने खालूनच फोन लावला.
‘बाबा बोलतोय, आहेस ना घरी, आम्ही निघतोय आत्ता इथनं, संध्याकाळी पोचू, चालेल ना?’ सुमीच्या लक्षात आलं नि ती फोन घेऊन बाल्कनीत आली. कानापासून फोन बाजूला करून ती वरूनच ओरडली, ’नका येऊ अजिबात, मी घरी नाहीये.’
सगळ्यांनी एकसाथ वर सुमीकडे बघितलं. ती, तिचा मुलगा आणि नवरा लगोलग खाली आले. सुमीने तिथेच पार्किंगमध्ये रजनीला आणि कुमुद वहिनींना मिठी मारली. सगळं सामान घेऊन माणसं वर गेली. सुमी अगदी हरखून गेली होती. तिच्या नवऱ्याला जायचं होतं कामावर म्हणून तो मोजकं बोलून त्याचं आवरून ‘दुपारी येतो लवकर’ म्हणून गेला. सगळ्यांना अगदी किती बोलू आणि किती नको असं झालं होतं.
तासभर गप्पा झाल्यावर वहिनी म्हणाल्या, ‘कार्टे आम्हाला भुका लागल्यात, रोज न्याहारीला नाक्यावरून आणता की अधूनमधून घरी काही करतेस अजून?’
सुमी जीभ चावत उठली आणि वहिनींचे गाल धरून म्हणाली, ‘आता कसं बोललीस काकू, अगदी माहेरी आल्यासारखं वाटलं, एवढं कुजकं किती दिवसात ऐकलं नव्हतं.’
रंग्याने ताजे नारळ फोडून खोबरं खवून दिलं. तिने परातभरून दडपे पोहे केले. पोह्याचे पापड त्यावर चुरून कडेला चहाचे टंपास घेऊन सगळे परत गोल करून गप्पा मारायला बसले. न संपणारे क्षण हे. सुख विजेसारखं असतं, क्षणभर चमकतं पण डोळे दिपवतं. गप्पा मारता मारता बारा कधी वाजले, कळलं नाही.
सुमी म्हणाली, ‘जेवायला काय करायचं पटकन सांगा, अजून तरी जेवण पण करते मी घरी. आम्रखंड आहे, कुकर लावते वरणभाताचा, पोळ्या आणि काकू तू कांदाबटाट्याचा रस्सा कर तुझा, खूप महिन्यात खाल्लेला नाही.’
परत एकदा सगळे किचनमजध्ये जाऊन गप्पा मारायला लागले. दुपारी हसतखेळत जेवणं झाली आणि सगळे लवंडले. मानसिक आनंदाची शाल पांघरून सगळे मिनिटात शांत झोपले. तिचा नवरा लवकर म्हणजे पाचला आला त्याच्या बेल वाजवण्याने सगळे उठले. मग चहा झाला, गप्पा झाल्या. गावच्या लोकांच्या चौकशा झाल्या. निघायची वेळ जवळ येत चालली तसे सगळ्यांचे चेहरे म्लान होत चालले.
‘सुमे, पावणेआठ झाले, आता जेवण नकोच, नाहीतर हा बंड्या झोपायचा मध्येच, चहा कर घोटभर सगळ्यांना, लागली भूक तर खाऊ रस्त्यात काही.’
सुमी पाय ओढत किचनकडे गेली. यावेळी तिला जरा जास्तीच वेळ लागला चहा करायला. चहा झाला मग वहिनी म्हणाल्या, ’शरदचा डबा त्याला घेऊन जायला सांग, पाघळी आहेस तू, जाशील पोचवायला.’
‘ते बघते मी काय करायचं ते, राहिला शिल्लक तर देईन त्याला.’
परतीचं सामान फार नव्हतंच. सुमीने दोघींच्या ओट्या भरल्या. ’कार्टे, नारळाचे पैसे दे, पुण्यं लागणार नाही. आमचेच नारळ आम्हांला दिलेस तर’, वहिनी म्हणाल्या. सगळे रडवेले हसले. नातवाने मिठी मारली आणि म्हणाला, ’उद्या जा की पण’. वहिनींच्या डोळ्यात पाणी आलं.
नमस्कार झाले, आशीर्वाद झाले. नातवाला पाचशे रुपये देऊन वहिनी म्हणाल्या, ‘परीक्षेच्या वेळेला यायला काही जमायचं नाही म्हणून आत्ताच देते. परीक्षा झाली की या दोन महिने हुंदडक्या करायला गावाला, परत एकदा कॉलेज चालू झालं की जमणार नाही’.
सुमीला हुंदका फुटला. वहिनी म्हणाल्या, ‘रडतेस कशाला, न सांगता आलो, सांगून चाललो, रडायचं नाही मग. पुढच्या वर्षी येऊ की परत नाहीतर तुम्ही या सगळे चेंज म्हणून दिवाळीला तिकडे. आम्ही आहोत तोवर याल गावाला मग काय नंतर इतर गावांनाच जायचंय दिवाळीला, घर तर उरायला हवं ना जायला’ आणि त्यांना शरदच्या आठवणीने हुंदका फुटला.
रजनीने त्यांना जवळ घेतलं आणि म्हणाली, ‘आता कुणाला फटका द्यायला हवाय?’ सगळेजण तोंड धुवून आले. अण्णा, रंगा, जावई आणि बंड्या सामान घेऊन पुढे गेले. ‘काकू रहा की, जाशील सकाळी,’ सुमी म्हणाली.
‘सुमे धावती, न ठरलेली भेटही शेवटचा तुकडा उरलेल्या आंबाबर्फीसारखी असते बघ. शेवटचा तुकडा म्हणून आपण फार जपून, चव घेत खातो. ती चव मग खूप काळ रेंगाळते जिभेवर. आम्हांला खूप दिवस पुरेल ही. आणि अजून चार दिवस राहिलो तरी निघतो म्हटलं की असंच वाटणार’.
सगळेजण खाली आले. तिथे परत गप्पा झाल्या. शेवटी बंड्या म्हणाला, ‘मी वर झोपतो, झालं की बोलवा मला’.
मग सगळे हसले आणि निघाले. गाडीच्या आरशात हात हलवणारी सुमी आणि नातू दिसेपर्यंत सगळे बघत राहिले.
‘रंगूशेठ, फोन लावा शरदला आणि सांगा त्याचा डबा ठेवलाय सुमीकडे म्हणून,’ वहिनी म्हणाल्या.
अण्णा हसले आणि म्हणाले, ‘रंगा, हा रडका फौजदार आहे रे बाबा, हीला शब्दं फुटायचा नाही म्हणून तुला लावायला सांगतीये.’
‘रडतीये कशाला मी, त्याला बेसनाचे लाडू आवडतात माझे म्हणून एक पूर्ण डबा लाडवाचा आहे ते सांगायचं होतं, बाकी काही काम नाहीये माझं.’
अण्णा, रंगा आणि रजनी जोरात हसले त्यामुळे कुमुदवहिनी अजून चिडल्या. मग फोन झाला. सगळेजण शरदशी भरपूर बोलले. खिडकीतून येणाऱ्या गार वाऱ्यावर डुलत जो तो मान मागे टाकून पापण्या मिटत दिवसभराचे सुखाचे क्षण स्मृतिपटलावर गोंदवून ठेवू लागला. प्रत्येकजण आपापल्या आंबाबर्फीचा तुकडा चिमणीच्या दाताने खात त्याची चव उपभोगत होता.
आणि मग परत एकदा, मिळालेल्या आनंदाने तुडुंब भरलेलं ते धावतं चिमुकलं विश्व अंधारात कणाकणाने घराच्या दिशेने सरकत राहिलं…
-जयंत विद्वांस
(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व / ज्येष्ठत्व साजरा करणारा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)
Leave a Reply