नवीन लेखन...

आली दिवाळी..दिवाळी पाडवा..

वर्षभर आतुरतेने वाट पाहात असलेल्या दिवाळसणाचा, बघता बघता तिसरा दिवस उजाडला. आजचा दिवस पाडव्याचा. साडेतिन मुहुर्तांपैकी आजचा दिवस हा अर्ध्या मुहूर्ताचा. आजची कार्तिक शुद्ध प्रतिपदा ‘पाडवा’ नांवानेच ओळखली जाते. महाजनांच्या प्रतिपदा या शब्दाचं बहुजनांनी केलेलं सुलभीकरण म्हणजे ‘पाडवा’ हा शब्द. भाद्रपदा’चं कसं ‘भादवा’ केलं, अगदी तस..!

आजच्या दिवसाला ‘बलीप्रतिपदा’ असंही म्हणतात. शेतकऱ्यांचा लोककल्याणकारी आद्य राजा बळी याचं स्मरण करण्याचा दिवाळीतील हा महत्वाचा दिवस. ‘भिक्षे स्थळ मागुनीं बळीला पाताळा नेणा’ऱ्या वामनाने याच दिवशी बळीला पृथ्वीवरून पाताळात ढकलले अशी पुराण कथा आहे. ही कथा म्हणजे हे रूपक आहे. बळी शेतकऱ्यांचा राजा, तर वामन विष्णूचा अवतार. वामनाने बळीला पाताळात ढकललं, याचा सरळ अर्थ शेतीसंस्कृती संपुष्टात येऊन शेतीला दुय्यम स्वरूप प्राप्त व्हायला सुरुवात झाली. आपल्या देशातील प्राचिन आणि आद्य कृषीसंस्कृती व नंतरच्या काळात उदयाला आलेल्या इतर संस्कृतींमधील संघर्षात, शेतीसंस्कृतीला दुय्यम ठरवण्यात आलं. समाजव्यवस्थेच्या शीर्षस्थानी असणारा शेतकरी, नंतरच्या काळात दुय्यम स्थानी ढकलला गेला, म्हणून तो पाताळात गेला. आज साजरा केला जाणारा पाडवा, ही या बदलाची खुण.

‘दिन दिन दिवाळी…’ या दिवाळीशी घट्ट निगडीत असलेल्या लोकगीतातली शेनटची ओळ, ‘इडा-पिडा टळो, बळीचं राज्य येवो..’ अशी आहे. ‘इडा (इला)’ म्हणजे जमीन. ‘इडा पिडा टळो’ म्हणजे जमिनीवर इतर संस्कृतीचं आलेलं अरिष्ट टळो आणि बळीचं, म्हणजे शेतकरी पुन्हा राजा होवो अशी या ओळींतली लोकभावना. आपल्या संस्कृतीत जमिनीला अन्नदेवता ‘इला’चं स्म्हटलय. जमिनीवरील आस्मानी आणि सुलतानी(पक्षी राजकीय) संकट टळून, शेतकरी राजा झाल्या शिवाय आपला देश समृद्ध होणार नाही, हाच संदेश यातून दिला जातो. सध्या झालेल्या शेतकऱ्यांच्या हलाखीच्या परिस्थितीवरून ह्याची जाणीव आणखी तीव्र होते.

वामनाने जरी बळीला पाताळात ढकललं असलं, तरी आपला कृषीप्रधान देश व या देशातील शेतकरी, हजारो वर्ष उलटूनही बळी-वामन संघर्षातील बळीला अद्याप विसरलेला नाही. आजचा दिवस ‘बळीप्रतिपदा’ म्हणून साजरी होतो,यावरून सिद्ध होतं. इतरत्र माहित नाही, परंतू आमच्या दक्षिण कोकणात तर ‘बळी’ हे पुरूषांचं लोकप्रिय नांव आहे. आपला देश ‘बळी’चाच असं मी मानतो.

शेतीचा शोध स्त्रीयांनी लावला. स्त्रीयांचं भुमीशी असलेलं नातं आणि साम्य आपल्या सर्वांना माहित आहे. आपल्या प्राचिन संस्कृतीत स्त्रीयांना महत्व होतं. त्या काळातली घरातली कर्ती-धर्ती स्त्रीच असायची. मातृप्रधान समाजव्यवस्था हा आपल्या तत्कालीन कुटुंब व्यवस्थेचा पाया होता. आपल्या मातृप्रधान संस्कृतीची एक खुण ‘कुलदेवता’ रुपाने अजूनही आपल्यात टिकून आहे. आपल्याकडे ‘देवा’पेक्षा मातृरुपी देचींचं महत्व जास्त मानलं जातं. कुलदेव कोण हे बऱ्याचजणांना सांगता यायचं नाही, मात्र कुलदेवता कोण हे सर्वांना माहित असतं. घरच्या मंगल कार्यात प्रथम कुलदेवतेचा न चुकता आशीर्वाद घेतला जातो. वर्षातून एकदा तिची खणा-नारळाने ओटी आवर्जून भरली जाते. ही आपल्या समाजात कधी काळी प्रचलित असलेल्या मातृप्रधान व्यवस्थेची अद्याप शाबूत असलेली खुण..! देशात नंतर कधीतरी आलेल्या संस्कृतीने आणलेल्या पुरूषप्रधान संस्कृतीने आपल्या मातृप्रधानतेची जागा घेतली आणि ‘आई’ दुय्यम स्थानावर ढकलली गेली, ती आजतागायत. दिवाळी पाडव्याला स्त्रीकडून, म्हणजे पत्नीकडून, स्वत:ला ओवाळून घेण्याची नविन प्रथा सुरू झाली ती इथपासूनच. असं असलं तरी समाजाच्या बहुजन वर्गात ही प्रथा नाही हे ही आवर्जून नोंदवावं लागेल. हल्ली एकमेकांचं बघून काही जण असं स्वत:ला बायकोकडून ओवाळून घेऊ लागले असले, तरी अद्यापही ही प्रथा काही ठराविक लोकांपर्यंतच मर्यादीत आहे.

जुन्या आणि नव्या संस्कृतींच्या संघर्षात आपली कृषीप्रधानता आणि मातृप्रधानता दोन्ही दुय्यम स्थानी ढकलली..जगातील सर्वच देशात वेगवेगळ्या काळात उदयाला आलेल्या किवा बाबेरून आलेल्या आणि देशातल्या मुळ संस्कृतींच्या संघर्षात असं घडत आलेलं आहे आणि हे पुढेही घडत राहाणार आहे..

या दिवशी विक्रमसंवत सुरू होतं..शहरी व्यापाऱ्यांचं किवा उत्तर भारतातल्या लोकांचं नवं वर्ष या दिवशी सुरू होतं. व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या,
कीर्द -खतावणीच्या चोपड्या ह्या दिवशी नविन वर्षाच्या हिसाबासाठी सज्ज होतात..

आपण नरकचतुर्दशीला पहाटे लवकर उठाचो, तेंव्हा माझे गुजराथी शेजारी नेहेमीप्रमाणे उठायचे. तेंव्हा त्यांना असं का विचारलं, तर ,’हमारी दिवाली नये साल को होती है’ असं उत्तर मिळायचं. मला तर अजब वाटायचं तेंव्हा. आता तसं का हे कळतंय. आज त्यांचं नवं वर्ष. गुजराथी समाजात या दिवशी पहाटे लवकर उठून, स्नान करून, नविन कपडे परिधान करून घरचा कर्ता पुरूष हातात थाळी घेऊन ती लाटण्यानं बडवत संपूर्ण घरभर फिरतो. त्याच्या मागून त्याची पत्नी व मुलं चालत असतात. लहानपणी मला हे दृष्य पाहून मोठी गंम्मत वाटायची. ते या प्रसंगी एक गाणंही गायचे. ते हाणं आता मला नीट आठवत नाहीय. त्यांच्या अशा दोन-तिन फेऱ्या झाल्या, की सर्व घरातून स्वच्छ कचरा काढून तो कचरा दूर नेऊन टाकत. आपणही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूला लक्ष्मी मानून करत असलेली तिची पूजा आणि गुजरातेतील ही प्रथा यात विलक्षण साम्य आहे. स्वच्छतेच्या ठिकाणीच (अपवाद भंगारातं दुकान. भंगारात प्रचंड पैसा मिळतो) लक्ष्मी वास करते, असं ती प्रथा सुचवित असावी बहुदा..!!

आता उद्याची भाऊबिज झाली की सणांची सम्राज्ञी असलेली दिवाळी आपला निरोप घेईल आणि त्याच उंत्कंठेने आपण तिची नव्याने प्रतिक्षा करण्यास सुरू करू. हे चक्र असंच सुरू राहाणार. पुढच्यावेळी आणखी काहीतरी आणखी चांगलं घडेल ही आशाच तर जगण्याचं बळ देते..

नविन वर्ष सुरू झालंय..
आपल्या सर्वांना नविन वर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!!

-नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..