माझ्या भावाने लिहिलेली कविता…
दिवाळीची हळुहळु पुर्ण झाली तयारी,
झाडलोट, साफसफाई तोरणे लागली दारी.
फडताळात फ़राळानी भरल्या बरण्या,
सजल्या साऱ्या वृद्ध अन बाया तरण्या.
पण हा कसला गोंधळ नी आदळआपट?
फडताळाच्या कड्यांची कर्कश खाटखुट?
हळुच डोकावून पाहिले स्वयंपाक घरात,
बुंदिचा लाडू टणकन आदळला कपाळात.
आत सगळ्या फराळाची जुंपली होती लढाई,
चुलीवरची तेलाची उलटली होती कढई.
तिखट शेवेनी घेरला होता बर्फीचा तुकडा,
फोडणीचा ठसका लागून खोकत होता चिवडा.
बेसनाचा लाडू रागाने झाला होता लाल,
गाल फुगवून बसले होते इवले शंकरपाळ.
चकलीला ही तिळा तिळा ने आले शहारे,
अनारसांचे खसखसले, कोसळले उंच हारे.
प्रमाणात कोंबून भरल्या करंजीच्या होड्या,
काजू, बेदाण्याने फुटल्या ढेऱ्या पण थोड्या.
पटकन लावून घेतले स्वयंपाक घराचे दार,
रोज कसे न काय खाऊ आता हाच तर विचार.
किरण कमलाक्ष कोठारे.
११-१०-२०१४.
Leave a Reply