नवीन लेखन...

दिवटे मास्तरांची फजिती

आडगेवाडीत वीस वर्षे तळ देऊन बसलेल्या माळी मास्तरांची बदली झाली आणि त्यांच्याजागी दिवटे मास्तर आले. पहिल्या दिवशीच ते आल्या आल्या एका कारटयाने तक्रार केली, “गुर्जी, आज मुक्या आला नाही.”
“काय रे, मुक्या कितवीत आहे?”
“तिसरीत.” तिसरी सोडून पहिली ते चौथीपर्यंतचे सगळे वर्ग ओरडले.
“गुर्जी, घेऊन येऊ का त्याला?”
“हो जा. घेऊन या.”

मग तिसरीच्या वर्गातली दोन आणि चौथीच्या वर्गातली तीन मिळून पाचजण बाहेर पळाली. कोण शाळेत आला नसला की त्याची उचलबांगडी करून आणायचे कंत्राट ह्यांच्याकडे असायचे. हे पाचजण मिळून जो कोण शाळेला आला नसेल त्याची वरातच काढत आणायचे. शाळा चुकवणारा स्वत:च्या पायाने शाळेत यायला तयार असला तरीही हे त्याला आडवा पाडायचे आणि झोपाळयासारखे झुलवत त्याला उचलायचे. त्याचा हात आणि पाय असा प्रत्येकी एकेक अवयव आणि एकजण त्याचे दफ्तर घेऊन घोषणा देतच ही मिरवणूक शाळेकडे निघायची.

पण मुक्याच्या बाबतीत ते शक्य नव्हते. तो चांगलाच बेरका होता. थोडया वेळाने मुक्याच पाचजणांना घेऊन शाळेत आला. वय वर्षे आठ. पण बालशिवाजीच्या तोर्‍यात तो मास्तरांपुढे उभा राहिला, “कशाला बोलवलं वो मास्तर?”

मुक्याच्या या सडेतोड प्रश्नाने मास्तर हैराण झाले. मुक्या हा खरोखरचा मुका असावा अशी त्यांची कल्पणा होती. पण हे चित्र वेगळे होते. साक्षात विद्यार्थीच गुरुला शाळेत का बोलवले म्हणून विचारत होता.

“शाळा सोडून कुठे गेला होतास?”
“शेतात.”
“कशाला?”
“शाळू काढायला लागलेत.”
“मग तू शाळू काढतोस काय?” मास्तरांना पोरगा काम करतोय म्हणून बरे वाटले.
“न्हाय. पेंढया मोजतोय.”
“मोजल्यास?”
“होय…”
“किती भरल्या?”
“आतापरेंत कुठला सुक्काळीचा ध्येनात ठेवतोय?”
“मग काय लक्षात रहातं तुझ्या?” मास्तरांनी पाठीत एक धपाटा दिला.
“मास्तर, मारलं एवढं मारलं. पुन्यांदा अंगाला हात लावायचा न्हाय.”
“का?” म्हणून मास्तरांनी पुन्हा एक गुद्दा ठेऊन दिला.
“मास्तर, आपल्याला आपला बाप पण कधी मारत न्हाय.”
“का? नवसाचा आहेस काय?”
“न्हाय.”
“मग?”
“बापाजवळ रहायला नसतोय. मामाच्यात शिकायला आलोय.”

थोडयाच दिवसात दिवटे मास्तर चांगलेच फेमस झाले. मास्तरांनी डोक्याला टोपी, अंगात नेहरु शर्ट आणि कमरेला धोतर अडकवले की दिसायला गरीब गायच वाटायचे. पण स्वभाव खूपच मारकुटा होता. कुठल्याही कारणांवरून पोरांना झोडपून काढायचे. एखादं पोरगं प्रार्थना म्हणायला जरी चुकलं तरी त्यांच्या बरोबर लक्षात यायचं. मग प्रार्थना संपल्यावर ते त्या पोराची मानगुट पकडून विचारायचे, “काय म्हणत होतास रे आत्ता?”

“पार्थना.” स्वच्छ शब्दांत पोरगा सांगायचा.
“तुज्या बापानं तर म्हंटली होती का अशी प्रार्थना? अन् प्रतिज्ञा म्हणताना हात कुठं आभाळात घालतोस का? बाप सगळया गावाची घरं बांधतोय की ओळंब्याने लेवल बघून.”
“गुर्जी, लेवल पातळीनं बगत्यात. वळुंब्यानं लाईन बगत्यात, लाईन.” वाडीतला प्रत्येक पोरगा गुर्जीचं बारसं जेवलेलाच निघायचा.
“मला शानपणा शिकवतोस?”

मग त्या पोराला एकतर्फी मार खायला लागायचा आणि सगळी शाळा गुपचूप बसायची. दिवटे मास्तर आल्यापासून माराच्या भीतीनं पोरं शाळा चुकवायला लागली. पण मास्तर कुणाला सोडत नव्हते. चोप चोप चोपायचे. काही जणांनी तर नव्या मास्तरांचा एवढा धसका घेतला होता की पोरं घरातनं शाळेला म्हणून बाहेर पडायची आणि गावाबाहेर असणार्‍या ओढयावर जाऊन मासे पकडत बसायची.

असंच शाळा चुकवून पोरांचा एक घोळका मासे पकडत होता. बामणाच्या गण्याचा बाप ओरडतो म्हणून कुणीच गण्याला मासे पकडायला घेत नव्हते. त्याचा सूड म्हणून गण्या चिडून मधेच पाण्याच्या धारेत जाऊन माशांना हुसकून लावत होता. सकाळपासून बंधार्‍याखाली आठदहाजण बसले होते पण म्हणावे एवढे मासे सापडले नव्हते. बराचवेळ झाला, डबक्यात चांगलेच मासे जमले असतील म्हणून सगळेजण मासे पकडायला उठले. एवढयात गण्या माशांना हुसकून लावायला पुढं सरकला. आणि त्याला बघून दिवसभर उन्हाने तापून निघालेला घोळक्यातला संपा ओरडला, “धरा रं त्याला…”
दिवटे मास्तरांचा डोळा चुकवून हा सगळा कंपू ओढयावर आला होता. कुणीतरी मास्तरांना चुगली केली आणि ते सगळयांचा माग काढत लपतछपत इथे आले. एकतर दिवटे मास्तराचं आणि या टोळक्याचं वाकडं असल्यामुळं मास्तरांना कारणच पाहिजे होतं. आयतीच संधी सापडली म्हणून ते खुश होते, पण त्यांच्या कानावर जसं “धरा रं त्याला…” हा आवाज पडला, तसे ते दचकले. वाडीतली पोरं म्हणजे वेचीव पोरं होती. एकटयाला गाठून काय करतील याचा नेम नव्हता. त्यांनी आमावस्येच्या रात्री एका आगाऊ मास्तराला पोत्यात बांधून पाटलाच्या मळयातल्या चिंचेच्या झाडावर रात्रभर अडकवला होता. जी काही मास्तरगिरी करायची आहे ती शाळेत केलेली बरी, बाहेर नको असा विचार ते करतच होते, तेवढयात पोरांचा घोळका त्यांच्याकडे पळत येताना त्यांना दिसला.

आपल्या हातून मोठी चूक झाली आहेे त्यांना कळून चुकलं. जशी पोरं “धरा धरा.” म्हणून त्यांच्या दिशेने पळायला लागली, तसं मास्तरांनी धोतराचा सोगा हातात घेऊन धूम ठोकली. आडवळणाला गाठून हे बहाद्दर आपल्याला नक्कीच चोपल्याशिवाय सोडणार नाहीत ही मास्तरांची खात्रीच झाली. धोतराचा सोगा हातात घेऊन सुसाट सुटलेले मास्तर दिसल्यावर काहीतरी घोटाळा झाला हे संपाच्या ध्यानात आलं. आता पुन्हा शाळेत गेल्यावर आपलं काही खरं नाही म्हणून तो, “ओ गुर्जी, तुम्हाला न्हाय. तुम्हाला न्हाय” म्हणून त्यांच्यामागं लागला आणि अजूनच पंचाईत झाली.

चिंचेचे ओले फोक घेऊन आपल्यामागे आठदहाजण पळताहेत हे बघितल्यावर मास्तरांना उभ्या उभ्याच घाम फुटला. त्यांनी पायातलं पायतान हातात घेऊन वाडीच्या दिशेने पळायला सुरवात केली. डोक्यावरची टोपी केव्हाच वार्‍यावर उडून गेली होती. कमरेला धोतर टिकून होते हेच नशीब होते. पुढे मास्तर आणि मागं पोरं ही वरात तशीच देवळापर्यंत आली. पारावर चारपाच म्हातारी माणसं बोलत बसली होती. मास्तरांना पळून पळून धाप लागलेली. मास्तर आले तसे काही न बोलता जीव गेल्यासारखे त्यांच्यासमोर मटकन खाली बसले. त्यांच्या तोंडातून शब्दच निघेना. ते नुसतेच हिव भरल्यासारखे करायला लागले.

मास्तरांची अवस्था बघून एका म्हातार्‍याला त्यांची दया आली आणि तो पोरांवर उखडला, “लेकांनो, कोण पोरं हायसा का हैवान हायसा? मारून टाकतासा का त्या मास्तराला? जरा तर अक्कल असल्यासारखं वागा की. का गावाचं नाव मातीत मिळीवतासा? गेलं पटाक्कन मरून तर कोण यईल का मास्तर म्हणून आपल्या गावात? शानं व्हा की जरा. आणि मास्तर, तुमीबी शीआयडी असल्यासारखं त्यांच्या मागं लागत जाऊ नका. न्हायतर गळयात हातपाय घेऊन बसायला लागंल. येडया डोक्याची पोरं आहेत ही.”

खाली मान घालून पोरं काही न बोलता निघून गेली आणि म्हातार्‍यांमुळे जीव वाचला म्हणून मास्तरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

— © विजय माने, ठाणे
https://vijaymane.blog/

Avatar
About विजय माने 21 Articles
ब्लॉगर व खालील पुस्तकांचे लेखक : १. एक ना धड (सर्वोत्कृष्ट विनोदी पुस्तक २००८. महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा राज्यपुरस्कार) २. एक गाव बारा भानगडी ३. All I need is just you! (English). मराठीतील ‘आवाज’ व इतर अनेक नामवंत दिवाळी अंकातून लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..