हिंदू धर्म हा सुधारणेची कास धरणारा धर्म आहे हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. भोळ्या भाभड्या समाजाची पिळवणूक करून आपली तुंबडी भरण्याचे उद्योग तर समाजातील प्रत्तेक धर्मात होत आहेत .हिंदू धर्मात तर हे अनादी काळा पासून सुरु आहे. धर्ममार्तंड आणि त्यांच्या चेल्या चपाट्यानी अनेकदा धर्म बांधवांवर असे निर्बंध टाकून ठेवले कि जणू काही त्यांच्या कर्मकांडा पासून जो दूर जाईल आणि वेगळा विचार करेल त्या व्यक्तीस धर्माचा शत्रू समजले जाई .सतत वेगवेगळी कर्मकांडे माणसाच्या जन्मापासून ते त्याच्या मृत्यू पर्यंत करायला लावायची आणि त्यास त्यात जखडून ठेवून स्वतःची तुमडी भरायची हा तर अनेक शतका पासूनचा गोरख धंदा आहे .
राजा राम मोहन रॉय यांनी या प्रथा परंपरे विरुद्ध प्रथम आवाज उठवला आणि सतीची चाल त्यांच्या अथक प्रयत्ना मुळे ब्रिटिशांनी कायदा करून बंद केली .विधवा विवाह ,केशवपन ,बालविवाह,स्त्रियांना शिक्षण बंदी या सारख्या प्रथा हिंदू धर्मातील थोर समाज सुधारकांनी बंद करण्यासाठी आपल्या सर्वस्वाचा होम केला.त्यामुळे अनेक बालिकांचे प्राण वाचले .स्त्रियांना शिक्षणाची कवाडे उघडली गेली आणि त्यामुळेच आज स्त्रिया समाजातील सर्व क्षेत्रांत आघाडीवर आहेत.महर्षी धोंडो केशव कर्वे ,महात्मा ज्योतिबा फुले ,सावित्रीबाई फुले , न्यायमूर्ती रानडे यांच्या सारख्या अनेक समाज सुधारकांनी धर्मातील बुरसटलेल्या विचाराशी दोन हात केले ,प्रसंगी जीवाची बाजी लावली आणि समाज सुधारणेची मुहूर्तमेढ रोवली.आज वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या अनेक मुलींनी तर त्यांच्या पर्स मध्ये श्री गजाननाच्या फोटो बरोबरच पहिली महिला डॉक्टर सौ .आनंदीबाई जोशी आणि सावित्री बाई फुले यांचा फोटो ठेवला पाहिजे इतके उपकार या थोर महिलांचे तुमच्या वर आहेत.
धर्म रूढी आणि जुनाट परंपरा यांनी मुलींना शिक्षणा पासून वंचित ठेवत होते.विधवा महिलेचे हाल तर कुत्रा खात नव्हता ज्या क्षणी महिला विधवा होईल त्या क्षणा पासून तिच्या दुर्दैवाचे फेरे सुरु होत असत .जणूकाही समाज तिचे अस्तित्वच नाकारत असे.अनेकदा तिच्यावर अन्वनित अत्याचार होत असत.
आपल्या धर्मातील अनिष्ट गोष्टींना आपणच मूठमाती द्यायची असते.सुधारणा प्रथम स्वतः पासून आणि आपल्या कुटुंबां पासून करायची असते.याचीच जाणीव झाल्यामुळे कै. विनायक विश्वनाथ तथा आप्पा पेंडसे यांनी १९६२ साली ज्ञान प्रबोधिनी या संस्थेची स्थापना केली. स्वदेशात विचारप्रबोधन व्हावे, कार्यप्रबोधन व्हावे, देशाचा कायापालट व्हावा, लोकमानसात नवचैतन्य निर्माण व्हावे हा प्रबोधिनीच्या कार्याचा हेतू आहे.
ज्ञान प्रबोधिनी ही नेतृत्व विकसनासाठी स्थापन झालेली संस्था असून, शिक्षण, संशोधन, ग्राम विकास, आरोग्य व युवा संघटन, स्त्री-शक्ती-प्रबोधन या क्षेत्रात काम करते. संस्कृत संस्कृती संशोधिका म्हणजेच ‘संत्रिका’ हा ज्ञान प्रबोधिनी संस्थेचा एक महत्त्वाचा विभाग आहे. २२ जुलै १९७५ रोजी या विभागाची स्थापना कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या विभागामध्ये १३००० ग्रंथ असलेले ग्रंथालय आहे. त्यात संस्कृत पुस्तके, हस्तलिखिते, कोश, संदर्भकोश व अन्य ग्रंथसंपदा आहे. रामायण संग्रह हे या ग्रंथालयाचे वैशिष्ट्य आहे. या रामायण संग्रहात १९५७ पुस्तके असून ती ३३ भाषांत व १८ विविध लिपींमध्ये आहेत. २३ भारतीय भाषा व १० परदेशी भाषांतील ही संस्करणे आहेत.
धर्म हा कुणा एका व्यक्तीची अथवा जातीची मक्तेदारी नसून ती सुदृढ आणि निकोप समाज निर्माण करून वृद्धिंगत करणारी समाज रचना आहे. ज्ञान प्रबोधिनी नेमकी याच गोष्टीवर बोट ठेवून चालवलेली संस्था आहे. हिंदुधर्मातील प्रत्तेक जन्म घेतलेल्या व्यक्तीच्या सोळा संस्कारावर ही संस्था फक्त भाष्य करीत नाही तर त्यात सुधारणा करण्या साठी मोठी यंत्रणा निर्माण करते आहे.जाती पातीतील बंधने दूर करून वेदाचा मूळ गाभा हिंदू समाजा समोर उलगडून सांगण्याचे काम हि संस्था करीत आहे.स्त्री पुरुष भेद नाहीसा करून शिव आणि शक्ती या स्वरूपात स्त्री पुरुषाला स्थान देण्याच्या समान भूमिकेचे हि संघटना समर्थन करीत आहे.’धार्मिक विधी’ ही फक्त पुरुषांची मक्तेदारी या संस्थेनी मोडीत काढली आहे.
“महिला पुरोहिता” निर्माण करून त्यांना प्रशिक्षण देवून या संस्थेनी स्त्री पुरुष समानतेचा पाया घातला आहे.धर्म आणि धर्माच्या तत्वज्ञानाचा पाया असलेले वेद यावर स्त्री पुरुष आणि सर्व जाती जमाती सह संपूर्ण समाजाचा अधिकार आहे हे ही संस्था मानते.महिला पुरोहितांच्या दृष्टीने पुणे ही भारताची राजधानी झाली आहे.गेल्या पंचवीस वर्षांत पुण्यात जवळ जवळ दहा हजार महिला पुरोहित तयार झाल्या.आज त्यातील सुमारे आठ हजार महिला राज्यात विविध धार्मिक विधींचे पौरोहित्य करीत आहेत.यामुळे शतकानुशतके चालत आलेली पुरुषांच्या पौरोहित्यांचा एकाधिकार संपुष्टात आला तसेच ब्राम्हण वर्गाचाही एकाधिकार संपुष्टात आला.कारण येथील ज्ञान प्रबोधिनी आणि गेल्या पिढीतील जाणकार संस्कारपुरस्कर्ते श्री.शंकरराव थत्ते यांचे काम मोठे आहे.
धार्मिक कृत्याचा संबंध फक्त सोळा संस्काराशी येतो असा एक समज आहे.सोळा संस्काराबरोबर वेदांचे पठण आणि याग यालाही तेवढेच महत्व आहे.त्यातही महिला आघाडीवर आहेत.वैदिक संशोधन मंडळासारख्या संस्थेच्या संचालिका एक महिला आहेत एवढेच नव्हे तर त्यानी वेदपाठशाळा सुरु करण्याचीही तयारी केली आहे.
ज्ञानप्रबोधिनीच्या सुनीती गाडगीळ या महिन्यातून किमान १५ दिवस या कृत्यात व्यग्र असतात. मौजीबंधन, लग्न , बारशी, या कार्यक्रमांबरोबरच त्या श्राध्दविधीही आवर्ज्रून करतात. त्याच्या आईच्या श्राद्धाच्यावेळी ब्राह्मण न मिळाल्याने कशी अडचण आली हे लक्षात आल्यापासून त्या श्राद्धांचे काम मुद्दामहून करतात. त्या म्हणाल्या की स्मशानातील विधी करण्याचीही आमची तयारी आहे.
पारसी धर्मात मुलींची मूंज लावली जाते.त्यामागे एक उदात्त हेतू आहे.मुलींवर उपनयन संस्कार करण्याची प्रथाही या महिला पुरोहितानी नव्याने चालू केली असून पुण्यात अश्याप्रकारे अनेक मुलींवर उपनयन संस्कार करण्यात येत आहेत.धर्माच्या ठेकेदारांना दिलेला हा धक्का आहे.
माझा आलेला संबंध
नुकतेच माझ्या मोठ्या बंधूंना देवाज्ञा झाली.माझ्या बंधूनी त्याच्या आजारपणात ज्ञानप्रबोधिनीच्या माध्यमातून त्याचे शेवटचे संस्कार करण्याची इच्छा प्रगट केली होती. तो पर्यंत माझा कधीही या संस्थेशी संबंध आला नव्हता. मी पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीच्या लोकांशी संपर्क साधला .मुलुंड येथील सौ.शमा पुणेकर यांचा नंबर मला मिळाला .त्यांनी सर्व विधी करण्याचे आश्वासन दिले .ठरलेल्या दिवशी त्या घरी वेळेवर हजर झाल्या .सर्व कुटुंबाला त्यांनी संपूर्ण विधीची कल्पना दिली .प्रत्तेक विधी कसा आहे आणि तो का करावा हे सांगितले .संपूर्ण कुटुंबाला विधीमध्ये सामावून घेतले .विधीची संपूर्ण माहीती त्यांनी सुंदर पद्धतीने समजावून सांगितली
त्यांचे उत्कृष्ट संस्कृत उच्च्चार ,वेळेचे नियोजन ,कामाची तन्मयता हि खूप वाखाणण्या सारखी होती.वातावरण मंगलमय करून कुटुंबियांच्या मनाला आधार देण्याची त्यांची हातोटी होती.खऱ्या अर्थानी मृत व्यक्ती कशी अनंतात विलीन होते आणि पूर्वजांच्या सान्निध्यात जाते याचे वर्णन अविस्मरणीय असेच होते.त्यांच्या विधी करण्याच्या पद्धतीने घरावर आलेले विचित्र सावट दूर झाल्याची जाणीव झाली .
उदक शांती पर्यंतचे सर्व विधी कुठलेही अवडंबर न माजवता त्यांनी केले.या सर्व विधीची दक्षिणा फक्त २५०० रुपये झाली. त्यात त्यांच्या संस्थेची देणगी आणि येण्या जाण्याचा खर्च समाविष्ट होता.रीतसर त्यांनी पावती दिली.सर्व व्यवहार पारदर्शक होता.बारसे, मुंज लग्न इत्यादी सर्व विधी ज्ञानप्रबोधिनी मार्फत केले जातात .समाजानी या संस्थेचा फायदा घ्यावा या साठी हा लेखन प्रपंच.
आज समाजाला याच गोष्टींची गरज आहे. शमा पुणेकर आणि ज्ञानप्रबोधिनीचे आम्ही कुटुंबीय ऋणी आहोत. फोटोत सफेद साडीतील कुटुंबासमावेत बसलेल्या सौ.शमा पुणेकर !
— चिंतामणी कारखानीस
माझ्या मुलीचे लग्नविघी साठी
फोननंबर मिळेल का ?