नवीन लेखन...

ज्ञानेश्वरांचें साहित्यिक रूप : एक विविधांगी चिंतन : भाग – २

 ज्ञानेश्वरांचें साहित्यिक रूप : एक विविधांगी चिंतन : कांहीं दिशादर्शक प्रश्न : भाग – 

या अभ्यासासाठी आपल्याला ज्या विविध अंगांबद्दल पहावें लागेल, त्यांचा अभ्यास करावा लागेल, त्या पैलूंवर थोडीशी नजर टाकूं या.

  • ज्ञानदेवांच्या नांवावर बरेच ग्रंथ सांगितले जाजात. त्यांतील मूळ-ज्ञानेश्वरांचे कोणते ? ( त्याच रचनांचा विचार करावा लागेल) .
  • ज्ञानदेव एक होते की दोन ? वरीलपैकी जे ग्रंथ मूळ ज्ञानेश्वरांचे नाहींत, ते साहजिकच दुसर्‍या ज्ञानदेवांचे मानावे लागतात. त्याव्यतिरिक्त, १८९८ सालीं श्री. ‘भारद्वाज’ (भारदेबुवा) या, पूर्वजांपासूनच वारकरी-भक्तिपंथातील गृहस्थांनी, ज्ञानेश्वरी व अमृतानुभव यांची भाषा , आणि तुलनात्मक रीत्या, अभंग इत्यादींची भाषा, यांच्यात भिन्नत्व दाखवून, ‘या दोन भिन्न ज्ञानदेवांच्या रचना आहेत’ असें प्रतिपादन केलें होतें. त्याविरुद्ध बर्‍याच संशोधकांनी लिहिलेलें आहे. मात्र, हा प्रश्न भाषा व शैलीशी संबंधित असल्याकारणानें त्या बाबींचा आढावा घेणें क्रमप्राप्त ठरेल.
  • याला जोडूनच एक विचार असा की, जर नामदेव दोन किंवा अधिक झाले ( संत नामदेव आणि विष्णुदास नामा) , चांगदेव दोन झाले ( त्यांपैकी एक म्हणजे, ज्ञानदेवांन भेटलेला चांगदेव), मुक्ताई दोन होत्या ( एक महानुभाव पंथामधील, आणि दुसरी ज्ञानदेवांची बहीण), ‘तुका’ दोन आहेत ( संत तुकाराम व तुका विप्र) , एवढेंच काय पण, दोन एकनाथांचा व जनार्दनांचा ( एकनाथांचे गुरु) उल्लेख सापडतो ( एक बी-चे व एक संत एकनाथ पैठणचे). त्याचप्रमाणें दोन ज्ञानदेव असूं ही शकतात.

( पूर्वी , किंवा आजही एका नांवाच्या अनेक व्यक्ती सापडतात. त्यामुळे, पूर्वी तसें असणें, विशेष  करून अनेक असतंया कालावधीत असणें, यांत आश्चर्य वाटण्यांसारखें कांहींच नाहीं ) .

  • ज्ञानेदवांनी सर्वत्र एकच नाममुद्रा वापरलेली नाहीं, जसें की ‘निवृत्तिदासु’, ‘बापरखुमादेवीवरु’, ज्ञाना, ज्ञानदेवो, इ. यामुळेही ज्ञानदेव एक की दोन, याचा विचार आवश्यक आहे.
  • जर दोन ज्ञानदेव असले, तर त्यांच्या भाषाभिन्नतेची कारणें वेगळी असणार, हें उघड आहे.
  • ज्ञानेश्वरी-लेखनाचा शक व ज्ञानेश्वरांनी संजीवन-समाधी घेतली तो शक, यांच्याबद्दल माहिती सापडते. वारकरी पंथानुसार, शके १२१२ मध्ये , वयाच्या १६व्या वर्षीं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी रचली. पण ज्ञानेश्वरांच्या जन्मशकाबद्दल कांहीं मतभेद आहेत. त्यांचा ऊहापोह करणें क्रमप्राप्त आहे.
  • जर वयाच्या १६व्या वर्षीं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली असेल, तर त्याआधीचा त्यांचा, ज्ञानसाधनेचा प्रवास कसा झाला असावा, हें पाहणेंही उपयुक्त ठरेल.
  • ज्ञानेश्वरांच्या भाषेचा विचार करतांना खालील गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतील –
  • Basically, मूलत: , यादवकालीन मराठी भाषेचे रूप.
  • महानुभाव-मराठीचें रूप
  • मुकुंदराज हा ज्ञानेश्वरांच्या जवळजवळ एक शतकाआधीचा आहे. त्याच्या ‘विवेकसिंधु’ ची भाषा .
  • ज्ञानेश्वर तसेंच नामदेवादी संताच्या गाथा-रचनांची भाषा.
  • एकनाथांनी ज्ञानेश्वरी शुद्ध केली. याचा अर्थ असा की त्यांच्या काळींही ज्ञानेश्वरीच्या विविध पोथ्या होत्या, आणि त्यांच्यात क्षेपक होते. या नंतरच्या काळातील क्षेपकांमुळे, भाषेवरील विचार चुकीच्या निर्णयाला येऊं शकतो.
  • अभंग हे तर मौखिक पद्धतीनेंच पसरत राहिले. त्याचा परिणाम अर्थातच त्यांच्या भाषेवर झालेलाच असणार.
  • इतिहासाचार्य राजवाडे यांना बीड-पाटांगण येथे मिळालेली प्रत ज्ञानेश्वरी लिहिली गेली त्याच्या- जवळच्या काळातली आहे, असें त्यांचें प्रतिपादन आहे. माडगांवकर यांना मिळालेल्या प्रतीत व राजवाडे-प्रतीत साम्य आहे. पण, त्या प्रती ज्ञानेश्वर-कालीन आहे कां,  याच विचारही करणें आवश्यक आहे. ( वारकरी पंथीयांतील दांडेकर, पांगारकर प्रभृतींनी , त्या काळातच तिला मान्यता दिलेली नव्हती) .  मात्र, ततीज्ञानेश्वरकालीन आहे, असें दाखवून राजवाडे यांनी तिच्या व्याकरणाबद्दलही विस्तृतपणें लिहिलेलें आहे.
  • अन्य कांहीं गोष्टी –
  • ज्ञानेश्वरांनी रचलेल्या मूळ ज्ञानेश्वरीची ‘ऑथेंटिक’ प्रत उपलब्ध नाहीं. (बहुधा एकनांथांनाही तशी प्रत मिळालेली नसावी). त्यामुळे,  सध्या उपलब्ध असलेल्या प्रतींवरून (नकलेवरून, कॉपीवरून )  निष्कर्ष काढावे लागतात.
    • क्षेपकांमुळे आनेश्वरीतील ओव्यांची संख्याही प्रती-प्रतीमध्ये वेगवेगळी आहे. त्यामुळे, ज्ञानेश्वरीबद्दलच्या विचारार्थ क्षेपक-विचार आवश्यक आहे.
    • क्षेपकांची भाषा मूळ ज्ञानेश्वरी-भाषेहून धोडी किंवा बरीच वेगळी असूं शकते. म्हणजेच, क्षेपकांमुळे अभ्यासकाचे भाषीय निष्कर्ष बदलूं शकतात.
  • ज्ञानेश्वरी-लेखन एक वर्ष चालले होतें. त्यावरून, तें लेखन कसें केलें असेल, कुणापुढे केलें गेलें असावें, याचा अंदाज बांधावा लागेल. लेखनाची भाषा त्यावरही कांहीं अंशी अवलंबून राहील.
  • अभंगही, कधी , कुठे, व कुठल्या परिस्थितीत रचले गेले, यावर त्यांची भाषा अवलंबून राहील.
  • हीसुद्धा चर्चा करतां येईल की, या ग्रंथाचें मूल नांव ज्ञानेश्वरी की भावार्थदीपिका, की अन्य कांहीं ? त्यावरून, त्या विशिष्ट प्रतीचा ( नकलेचा ) प्रवास कसा झाला असावा, याचा अंदाज येईल, व त्या नकलेत कांहीं अशुद्धी आली असल्यास, तिच्याविणा ज्ञानेश्वरीच्या भाषेचा विचार करावा लागेल.
  • तसेंच, सच्चिदानंद जिचें लेखनिक होते, ती ( फक्त त्याच एका प्रकारची ) प्रतच ‘मूळ प्रत’ असेल काय, की अन्य कोणीसुद्धा ती लिहून घेलली होती ( नकलून नव्हे). त्यानुसार, भाषेत फरक पडूं शकतो.
  • लेखकाची भाषा ही कांहीं मुख्य बाबीवर अवलंबून असते –
  • काळ ( कुठल्या काळांत रचली गेली) , भूगोल ( म्हणजे , कुठे लिहिली गेली , Region, ‘लोकेशन’) .
  • जसें की, इ.स. च्या सुरुवातीच्या काळची ‘महाराष्ट्री –— त्यानंरच्या कांहीं शतकांनी ‘उगम’ झालेली ( पूर्व-भाषेत बदल होत होत तयार झालेली ) अपभ्रंश भाषा (महाराष्ट्री-अपभ्रंश ) — यादवकालीन मराठी — एकनाथकालीन मराठी — आधुनिक मराठी — ही सर्व, भिन्नभिन्न काळातली वेगवेगळी भाषिक रूपें आहेत.
  • एकाच काळाचा, म्हणजे, यादव-कालाचा जरी विचार केला, तरी, पैठणची मराठी , पंढरपुरची मराठी, विदर्भातील मराठी यांचें रूप कांहीं अंशीं तरी भिन्न असणारच.
  • तसेंच, भाषा-रूपअवलंबून असतें तें, रचयित्याचें शिक्षण, रचयित्याचें ‘एस्. ई. एस्.’ म्हणजे ‘सोशियो-इकॉनॉमिक स्टेटस’  यांवर. (‘जात’ वगैरे विचारापेक्षा, ‘एस्. ई. एस्.’ नुसार विचार, हा आजच्या सामाजिक परिस्थितीत अधिक योग्य वाटतो ).

– म्हणजे, ज्ञानेश्वर, नामदेव, चोखा मेळा यांच्या भाषेतलें वेविध्य, याला हें ‘एस्. ई. एस्.’ कारणीभूत असूं शकतें.

  • आपण आधीच म्हटलें आहे त्याप्रमाणें आपला  अभ्यास हा , अध्यात्म, तत्वज्ञान,  या अंगानें जाणार नाहीं, कारण प्रस्तुत लेखाच्या लेखकाचा, त्यावरील चर्चेचा अधिकारच नाहीं. तरीही, हें ध्यानात ठेवावें लागतें की, ज्ञानेश्वरीचा विषयच असा आहे की, त्यामुळे वरील अंगाचा अगदी वरवरचा कां होईना, पण विचार आवश्यक ठरतो.
  • ज्ञानेश्वरी ही गीतेवरील ‘टीका’ (समीक्षा) आहे. गीता हा महाभारताचा एक भाग आहे. महाभारताची जय-भारत-महाभारत अशी तीन रूपें सर्वांनाच माहीत आहेत. ( कांहीं संशोधक ४ रूपें मानतात). म्हणजे, गीतेचीसुद्धा तेवढीच रूपें झाली. पुन्हां, महाभारतात अनेक प्रक्षेप आहेत, व ते वेगवेगळ्या काळीं घातले गेलेले आहेत. ( भांडारकर इस्टिट्यूट नें चाळीसएक वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर, महाभारताची इ.स. ९०० – १००० च्या काळची ‘ऑथेंटिक’ , ‘संशोधित’ प्रत बनवली आहे. यावरून प्रक्षेपांची थोडीशी कल्पना येऊं शकेल . महाभारताप्रमाणेंच, तिचा भाग असलेल्या गीतेतही, प्रक्षेप असूं शकतात. त्यामुळे, तिच्या भाष्यावरही,( म्हणजेच, ज्ञानेश्वरीवरसुद्धा) परिणाम होऊं शकतो. त्याचा थोडासा तरी विचार करणें क्रमप्राप्त आहे.
  • गीतेच्या बदलत गेलेल्या रूपांमध्यील तत्वज्ञानातही फरक दिसतो. त्याचा कितपत परिणाम ज्ञानेश्वरीवर झालाअसावा ?
  • ‘भाष्यकारांतें वाट पुसतु’ असा उल्लेख ज्ञानेश्वर करतात. हे भाष्यकार कोण ? सार्वत्रिक विचार असा आहे की, यातून त्यांनी आदि-शंकराचार्यांचा उल्लेख केला आहे. त्यांचे गीतेवरील भाष्य प्रसिद्ध आहे.

– ज्ञानेश्वर हे जरी ज्ञानेश्वरीत अद्वैताच्या अंगानें जातात खरे, पण वारकरी पंथात म्हणजे भक्तिपंथात, द्वैत आहे. म्हणजे, रामानुजाचार्यांचा विचार करणें हेंही आलेंच. ज्ञानेश्वर जरी वारकरी पंथात ज्ञानेश्वरी-लेखनानंतर ( नामदेवांमुळे ) सामील झाले , तरी त्यांच्या वंशात विठ्ठलभक्ती होती, हें ध्यानांत ठेवणें आवश्यक आहे.

– ज्ञानेश्वरीत अद्वैत, आणि अभंगांमध्ये द्वैत, याची सांगड ज्ञानेश्वरांनी कशा प्रकारें घातली ?

– वारकरी पंथात, विठ्ठल म्हणजे कृष्ण असें समीकरण आहे. त्यामुळे, विठ्ठलभक्तीच्या पूर्वेतिहासात डोकवावें लागेल. गीता तर कृष्णानेंच सांगितलेली आहे.

– ज्ञानेश्वर हे नाथपंथी होते. त्यांचे ज्येष्ठ बंधू निवृत्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरु होते, व ज्ञानेश्वरी त्यांच्यासमोरच रचली गेली.  निवृत्तिनाथ यांचे गुरु होते गहिनीनाथ. त्यामुळे, नाथपंथाच्या तत्वज्ञानाचा थोडासा तरी विचार करणें आवश्यक आह.

– नाथपंथाच्या तत्वज्ञानावर काश्मिरी शैव-तत्वज्ञानाचा परिणाम आहे. त्यामुळे, त्याही तत्वज्ञानात, वर-वर कां होईना, पण डोकावणें उपयुक्त ठरावें.

  • ज्याप्रमाणें भौगोलिक-विभाग ( region) वगैरे वर उल्लेखलेल्या बाबींवर भाषावैविध्य अवलंबून असतें , त्याचप्रमाणें , एकच ( दि सेऽम ) रचयिता असला तरी, त्याचें भाषावैविध्य अवलंबून असतें कांहीं गोष्टींवर , जसें की –
  • ‘टारगेट ऑडियन्स्’ – कुठल्या प्रकारचा श्रोतृवर्ग लेखकाला अभिप्रेत आहे –

म्हणजे, तें लेखन,  कुठला वाचक ,  पाठक ( त्याचा ‘पाठ’ करणारा), यांच्यासाठी आहे. ज्ञानेश्वरी ही ज्ञानी-जनांसाठी रचली होती, तर अभंग  हे साधारण-जनांसाठी ( कॉमन-मॅन) होते.

  • या लेखनाचा उद्देश काय –जसें की, ज्ञानेश्वरी हा तत्वज्ञान-चर्चा-ग्रंथ आहे . अभंग हे भक्तीबद्दल आहेत. त्यामुळे, ज्ञानेश्वरी ‘भारदस्त’ व गंभीर दिसते ; तर अभंग, विराण्या या जास्त भावनाक्षम वाटतात. ज्ञानेश्वरांनी भारुडसम रचनाही केलेल्या आहेत. अशा रचान या , समाजप्रबोधनासाठी असून, त्यांचा बाज अर्थातच वेगळाच असणार.
  • प्रस्तुतीकरण : या लेखनाचें कशा प्रकारें प्रस्तुतीकरण (वाचन, पठण वगैरे) केलें जाणें अभिप्रेत होतें –   ज्ञानेश्वरी ही निरूपणात्मक आहे. त्यामुळे तिचें निरूपण-कीर्तन-प्रवचन असें अभिप्रेत होतें .  आजही वारकरी साधक ज्ञानेश्वरी ‘वाचतात’, तेव्हां मोठ्यानें लयबद्ध पद्धतीत तिचें पठण करतात.

अभंग हे अशिक्षित व अल्पशिक्षित लोकांसाठी होते , आणि त्यांचें ‘गायन’ अपेक्षित होतें, पठण नव्हे. ( आजही वारीमध्ये तें , ‘नाचत म्हटलेलें  गाणें’ ,अशा प्रकारेंच गाइले जातात).

  • आपण जर म्हणतो आहोत की, ‘एकच (  सेऽम) लेखक असला तरीही, त्याची भाषा व शैली, विविध कारणांनी, त्याच्याच  भिन्नभिन्न रचनांमध्ये बदलूं शकते’ ,  तर मग, तशी कांहीं , ज्ञानेश्वरांव्यतिरिक्त, अन्य उदाहरणें आहेत काय ? तशी असल्यास, ती उदाहरणें आपल्या मुद्द्याला  सहाय्यभूत ठरतील.

समारोप

आपण कांहीं  संत कबीराप्रमाणें ‘गहरे पानी पैठ’ असें करणार नाहीं आहोत. तरीही, नुसता वरवरचा विचार जरी करायचहीअसेल, तरी किती बाबींचा आपल्याला ऊहापोह करावा लागणार आहे, हें, वरील चर्चेवरून दिसून येईल.

तसा प्रयत्न, आपण थोडाथोडा करून , हिश्शाहिश्शात,  करूं या. तें करतांना जर कांहीं नवीन मुद्दयांच्या विचार करणें क्रमप्राप्त झालें, तर त्यांचाही विचार आपण करूं या.

ज्ञानेश्वरीच्या अभ्यासासाठी एक जन्मसुद्धा पुरा पडेल काय, हा प्रश्नच आहे. त्यामुळे, प्रस्तुत लेखकाच्या जीवनाची संध्याकाळ झालेली असतांना,  त्याला हा वरवरचा अभ्यास तरी पुरा करतां येईल काय, ठाऊक नाहीं. तसेंच, स्वत:चें ज्ञानवर्धन करत करत ही वाट चालायची आहे , म्हणजे अधिक वेळ लागणार !

हा प्रवास सुरूं तर झाला आहे, मुक्काम फार दूर आहे. मात्र, हा प्रवास आनंददायी आहे , हें नक्की.

सुभाष स. नाईक
Subhash S. Naik

मुंबई.
M- (91)- 9869002126.
Email : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com   ,  www.snehalatanaik.com.

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 294 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..