गुरू अनेक प्रकारचे असतात व ते आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्यासाठी उभे असतात. आपण घेतलेल्या श्वासाच्या पहिल्या क्षणी आपल्याला, आपला पहिला गुरू भेटतो- मातृगुरू! आपली आई. आई श्वास घ्यायला शिकवते, बोलायला शब्द देते, जगण्याची मूल्ये देते. श्वासाच्या दुयार्या क्षणी आपल्याला भेटतो आपला दुसरा गुरू- पितृगुरू! ते जगण्याचं बळ देतात, जगण्याच्या
प्रत्येक श्वासाला विवेकाचं, विचाराचं कोंदण देतात. आणि श्वासाच्या तिसर्या क्षणी आपल्याला भेटतो- विद्यागुरू! जो ज्ञान देतो. असं ज्ञान की, जे आपल्याला जगण्याचं अधिष्ठन प्राप्त करून देतं, आपल्या जगण्याच्या दिशा नक्की करतं.
हे सर्व गुरू आपल्या सर्व मनोरथांना पूर्ण करतात. तेच आपलं सर्व काही बनतात. आपल्या स्वत:मध्ये शिष्याला विलीन करून घेतात. म्हणूनच ज्ञानदेव म्हणतात – “का चिंतामणी जालिया हाती। सदा विजयवृत्ति मनोरथीं। तैसा मी पूर्णकाम श्रीनिवृत्ती। ज्ञानदेवो म्हणे।।” चिंतामणी हाती लागल्यावर ज्याप्रमाणे मनुष्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतात, त्याप्रमाणे माझा गुरू माझे मनोरथ पूर्ण करतो. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे मीच तो पूर्णकाम श्रीनिवृत्ती होतो; ज्ञानेश्र्वरच गुरू निवृत्तीनाथ होतात.
खरा गुरू शिष्याला ‘स्व’रूप बनवतो, व ‘स्व’रूपाची ओळख करून देतो. त्यानंतर खुद्द देव त्याचा अंकित होतो; संत एकनाथ महाराज म्हणतात – “देव तयाचा अंकिला । स्वये संचरे त्याचे घरा।।” पण स्वरूपाचा प्रत्यय झालेला तो शिष्य “गुरु गोविंद दोउ खडे। काको लागे पाव। बलिहारी गुरु आप में। गोविंद मिलो समाय।।” असा विवेक करण्यास शिकतो. गुरू आणि परमेश्वर असे दोन्ही एकाच वेळी समोर उभे ठाकले तर कोणाच्या पायी लागू? कबीर गुरूलाच नमस्कार करतात. कारण त्याच्यातच गुरू सामावलेला असतो. हे गुरू आपल्याला खरं तर ठायी ठायी भेटत असतात. ते चांगल्या शिष्याच्या शोधात असतात. प्रश्न इतकाच आहे, की शिष्याला त्या गुरुची ओळख पटते की नाही?
नीतिन आरेकर
nitinarekar@yahoo.co.in
Leave a Reply