देखे मेघौनि सुटती धारा। तिया न रूपती जैसिया सागरा।
तैसी शुभाशुभे योगेश्वरा। नव्हती आनें ।।
ज्ञानेश्वरी, अध्याय ६ ओवी ८०
जगणे ही मोठी आनंदयात्रा आहे. पण ह्या आनंदयात्रेचा वारकरी असणारा माणूस मात्र शुभ अशुभाच्या कल्पनांच्या ओझ्याखाली दबून जात असतो. या सर्व कल्पना निर्माण कोणी के्ल्या याचा आपण विचार करत नाही. केवळ प्रथा, परंपरेच्या नावाखाली आपण दबून जातो. हे कर, ते करू नकोस; घरात पाऊल टाकताना पहिल्यांदा उजवे पाऊल टाका,डावे टाकू नका, पैसे डाव्या हातात घेऊ नका, मांजर आडवे गेले तर सात पावले मागे जा; तीन तिगाडा, काम बिगाडा; घरातून कोणी बाहेर गेले तर दिवा लावू नका किंवा घर झाडू नका; दिवा खाली पडला तर शांत करा; तेराचा फेरा. . . एक ना हजार गोष्टी आपण मानत असतो नाही? आता घरात येणारे पाय किंवा पैसे घेणारे हात आपलेच, मग त्यात डाव्या उजव्याचं महत्व ते काय? डावा पाय पुढे जायचं आणि उजवा पाय मागे जायचं असं म्हणतो का? मांजर आपल्याला आडवं गेलं तर आपणही मांजराला आडवे जात असतोच ना? देवाविषयी आदर व्यक्त करायला दिवा लावला किंवा स्वच्छतेसाठी घर झाडले तर त्यामागचा हेतू जाणणे आवश्यक नाही का? कोणाच्या हातून काही पडत नाही का? मग निरांजन जर चुकून पडले तर त्यासाठी शांत का करायची? तेरा काय किंवा छत्तीस काय, हे फक्त आकडेच. त्यात शुभाशुभाचा प्रश्नच येतो कुठे?
शुभ आणि अशुभ या फक्त समजूती. ज्ञानदेव म्हणतात, “मेघापासून ज्या पावसाच्या धारा पडतात, त्या ज्याप्रमाणे समुद्राला बोचत नाहीत, त्याप्रमाणे शुभाशुभे ही योगीश्वराच्या आत्मस्वरूपाहून भिन्न नसल्यामुळे त्यात ती द्वंद्वे प्रतीत होत नाहीत.”
खरंच आहे, मेघापासून निघालेल्या पर्जन्यधारा समुद्राला खुपतील कशा? त्या पर्जन्यधारा मुळात समुद्रातूनच जन्माला आलेल्या असतात. आई आपल्या लेकरात डावं उजवं करत नाही. तसंच, आपल्या आयुष्यात येणार्या प्रत्येक घटनांबाबत आपलं धोरण असायला हवं. त्या चांगल्या आहेत किंवा वाईट, उत्तम – अधम, श्रेष्ठ – कनिष्ठ, शुभ – अशुभ या एकाच नाण्याच्या दोन बाजू! त्या कधीच एकमेकांसमोर येत नाहीत. पण त्यांच्या पाठी एकमेकांना चिकटलेल्या असतात. त्यांना स्वतंत्र अस्तित्व नाही. त्यात द्वैत हे नसतंच! तुकोबा एका अभंगात म्हणतात, “हरीच्या दासा। शुभकाल अवघ्या दिशा.” ज्ञानोबा, तुकोबा किंवा आपण कोणीही, मध्ये शेकडो वर्षांचं अंतर. पण हे अंतर जर त्यातला अवधी सोडला तर आपल्याला प्रतीतच होत नाही, याचं कारण आपल्यातला बांधला गेलेला संस्कृतीचा धागा! येथे द्वैत संपतं. मी व्यापक, तू मर्यादित हा भेद संपतो. शेवटी उरतो योगीश्वर! तुम्हाला, आम्हाला, सर्व चराचराला व्यापून तरीही शिल्लक राहणारा! अरूप आणि अव्यक्त!!
— नितीन आरेकर
Leave a Reply