ज्ञानेश्वरांना माणूस फार अचूक कळला होता. या माणसाला जगवण्यासाठी काय ज्ञान द्यावे लागेल हे त्यांना फार चांगले उमगले होते. यामुळेच त्यांनी वेदांमधून कडसून काढलेल्या भगवदगीतेचा भावार्थ सांगायचे ठरवले असावे. तो भावार्थ असावा, अनुवाद नसावा हा त्यांच्या प्रज्ञाचक्षुंचा दूरगामी निर्णय. एव्हढी मोठी प्रतिभा, एव्हढा मोठा व्यासंग. सांख्य, योग, न्याय , वैशेषिक , पूर्वमीमांसा आणि वेदांत या सहा दर्शनांचा पाडलेला कीस. त्यांनी या गितारूपी नवनिताला स्वत:च्या अनुभवांचे, विचारांचे कोंदण दिले. “ विश्व स्वधर्म सूर्य पाहो” हा नवस त्या नियंत्याला करण्यापूर्वी या विश्वाच्या मनाची जडण घडण करण्यासाठी “How to do it ? or Do it Yourself(DIY)” च्या धरतीचे “Manual”च समोर ठेवले. “ज्ञानेश्वरी” हे ते “Manual”. माणसाने कसे वागावे म्हणजे त्याचे हे क्षणभंगुर(??) आयुष्य सुख-समाधानाने भरून जाईन याचे मार्गदर्शन करणारे. ज्ञानेश्वरी शाश्वत आनंदासाठी वाचायला हवी. स्पर्धा लागल्यासारखे, अर्थविन्मुख पारायण नको, तिचे वाचन हवे, त्या वाचनाचे मनण हवे, ग्रहण हवे. ज्ञानेश्वरीचा जीवनरस अंगाला लगला पाहिजे. जाणीवेला बाळसे चढायला पाहिजे.
कुठून वाचायला सुरुवात करायची, हाच प्रश्न आहेना? कधी वाचायची ? कशी वाचायची? कुठे वाचायची? वाचताना काही तयारी करायची का? अंघोळ करून आसन मांडून सुरुवात करायची का? तर नाही. अस्सं काहीहि करायचं नाही. बासनातली ज्ञानेश्वरी बासनातून काढायची, मांडीवर धरायची, उघडायची आणि वाचायला सुरुवात करायची. काही पूजा नको कि गंध अक्षता नकोत. कुठलाही बडेजाव नको. पूज्यभाव नको. त्या महापुरुषाने या मनीचे त्या मनी घालण्यासाठी लिहिले ते वाचायला कुठलाही अडथळा नको. जिथे आहात तिथे, जेव्हा वाटेल तेंव्हा, असे जसे असाल तसे, वाचायला सुरुवात करायची.
“ॐ नमोजी आद्या । वेदप्रतिपाद्या । जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥ १ ॥ “
मंगलाचरण ते. मंगलकार्याची सुरुवात. तुम्ही केलीय ती. अशीच करायची असते. मनात आनंद भरून. मनातील जळमटे, दु:खी विचार दूर सारून. आता जगाची काळजी सोडायचीय. तुमच्या ज्ञानदेवांच्या जवळ तनामनाने जाणार आहात तुम्ही. वाचनाची सुरुवात हीच तुमची पूजा. वाचत रहा. आता जीवनाचा अर्थ तुमच्यापुढे उलगडणार आहे. शेकडो वर्षांचे ज्ञान व्यासांनी एकत्र केले. तेच ज्ञान ज्ञानराज तुमच्या भाषेत तुम्हाला सांगणार आहेत. “अवधारीजोजी”.
“ना तरि सकल धर्माचें माह्येर । सज्जनाचें जिव्हार ।
लावण्यरत्नभांडार । शारदेचें ॥ ३१ ॥“
या ओवीतील धर्म हा शब्द कर्मकांड या अर्थाने घेतला तर मात्र त्याचा अनर्थ होतो. “धर्म” हा आनंदाने जगण्याची पद्धत ,असा अर्थ घेतला तर येथे पुण्या कमावून स्वर्गात जाण्याची गरजच भासणार नाही. येथेच स्वर्ग तयार होईल. आपण धर्म हा शब्द शाश्वत आनंदाचे साधन या अर्थी घेऊयात. या ओवीचा अर्थ आता अगदी स्पष्ट होईल. प्राकृत जरी असली तरी ती आपली माय मराठी आहे. पान्हा सोडीलच. ज्ञानेश्वरी हे ज्ञानाचे भांडार, धर्माचे माहेरघर, सज्जन सुसंस्कारित व्यक्ती -ज्यांनी हे जग आनंदाने भरून टाकण्याचा ध्यास घेतला होता- त्यांचे हे जीवाभावाचे विश्रांतीस्थळ , तेच आज तुमच्यासाठी ताटात मांडून आणले आहे. सज्जनहो या ज्ञानरूपी जिवनरसाचा तुम्ही स्वीकार करावा. तुम्ही रममाण होऊन, तन्मय होऊन वाचत रहा. तुमचे जग सुखी करायचे आहे. सगे सोयरे आनंदाने भरून टाकायचे आहेत. क्षणैक आनंद नाही, तर चिदानंद पसरवायचाय.
“नाना घनीभूत सुवर्ण । जैसें निहाळीतां साधारण ।
मग अलंकारीं बरवेपण । निवाडू दावी ॥ ४४ ॥“
न घडवलेले सोने जसे साधारण दिसते, पण त्याच सोन्याचे दागिने जघडवले कि त्यांच्या दर्शनाने मन मोहरून जाते. हा डाग चांगला कि तो डाग चांगला अशी मनाची चलबिचल होते. तसेच ज्ञान साध्या, सरळ शब्दांत मांडले तर ते ठसत नाही. शब्दांचे दागिने घडवले कि साधारण ज्ञान “मंत्ररूप” घेते. निरखून पाहून वापरावेसे वाटते. बारीक जाण होती मानवी स्वभावाची त्यांना. जर तुम्ही एखाद्याला काही शिकवणार असाल तर ते ओबड धोबड शब्दांमध्ये सांगून परिणामकारक होणार नाही. चपखल शब्दांची चपखल मांडणी करावी लागेल. मग ऐकणारा ते लक्षपूर्वक ऐकेल, त्याचा विचार करील व ते अंमलात आणील. ज्ञानेशांनी तेच केले. श्रोत्यांच्या पोटात शिरून, त्यांच्या जाणिवांना आवाहन करून, हळूवार चित्ताने मी काय सांगतो ते ऐका असं आवाहन श्रोत्यांना ते करतात.
तेयापरीं श्रोतां । अनुभवावी हे कथा ।
अति हळूवारपण चित्ता । आणूनियां ॥ ५७ ॥
पण त्या जाणत्या श्रोत्याने का ऐकायचे हे सर्व? हा खटाटोप कशासाठी? जर इतर सोपे मार्ग असतील ज्ञान मिळवण्याचे तर मग मेहनत का घ्यायची? पण याचे हि उत्तर आहे. श्रोत्यांच्या मनात चाललेले सर्व विचार त्यांना कळतात. मग यावर ते स्पष्टीकरण देतात.
कां आपुला ठावों न संडितां । आलंगिजे चंद्रु प्रकटतां ।
हा अनुरागु भोगितां । कुमुदिनी जाणें ॥ ६० ॥
श्रोत्यांना काहीच करण्याची गरज नाहीये. त्यांनी आपल्या जागेवरच बसायचे आहे. सर्व काही खूप प्रेमाने जागेवरच वाढले जाणार आहे. आपली जागा न सोडता ती कमलिनी, चंद्र उगवताच त्याच्या मिठीत शिरते, तसे रोमांटिक आहे हे. तुम्ही कल्पना करा कि देव हात पसरून तुमच्या समोर आहे. तुम्ही फक्त त्याच्या कुशीत शिरून डोळे मिटायचेत. बाकी काहीच परिश्रमाची गरज नाही. त्याच्या प्रेमाच्या वर्षावात मनसोक्त भिजयाचेय. अनेकांना ढोरकष्ट करूनही जे भोग प्राप्त होत नाहीत, ते भोग ज्ञानदेवांच्या वाणीतून आपल्यावर बरसणार आहेत.आपण फक्त हळूवार चिताने त्यांनी दिलेला अनुभव सरता करून घ्यायचाय.
जैसां स्वभावो मायेबापांचा । अपत्य बोले जऱ्हीं बोबडिया वाचा ।
तऱ्हीं अधिकाधिक तेयांचा । संतोखु चि आथि ॥ ६४ ॥
पण जर मोठेपणा आपल्याकडे घेतला तर श्रोत्यांचा इगो दुखावला जाईल. ते लक्ष देणार नाहीत. मग हे गीतेतील विचारांचे नवनीत सांडून जाईल. अशी भीतीही त्यांना वाटते. इथेही ज्ञानदेवांच्या सूक्ष्म स्वभाव-परीक्षेची कल्पना आपल्याला येते. माझ्याकडे ज्ञान आहे आणि ते मी मला पाहिजे तसे सांगणार. सामोरच्यालाच समजून घ्यायचे नसेल तर मी काय करणार? घोड्याला पाण्याजवळ तर नेता येईल, पण त्याला पाणीच प्यायचे नसेल तर? असा करंटा विचार हा ज्ञानियांचा राजा करतच नाही. हे श्रोते त्यांचे आहेत. जीविचा जिव्हाळा आहे. जी माया त्यांनी सोपान- मुक्तेवर केली, जो आदरभाव निवृत्तीनाथांना, विठ्ठलपंत- रुक्मिणीमातेला दिला, तीच माया तोच आदरभाव त्यांना त्यांच्या समाजपुरुषाबद्दल आहे. हे माझे आहेत. त्यांच्या जीवनवेणा माझ्या आहेत ही जान होती. श्रोत्यांच्या पोटात शिरण्यासाठी ते म्हणतात- तुम्ही माझे आ ई वडील आहात. मी तुमचा लहानगा आहे. मझ्याकडे मायेने बघा. मी नुकताच बोलू लागलोय. बोबडे बोल बोलतोय. मला पावलं टाकता येतात, मला काही शब्द बोलता येतात. तुम्हाला माझे कोण कौतूक वाटते. तुम्ही अति प्रेमाने माझे हे बोबडे शाध कानात साठवून घ्या.
हेंअनावरत विचारितां । वायां चि धिवंसा उपनला चित्ता ।
यऱ्हविं काइ भानुतेजीं खद्योता । शोभा आथि ॥ ६७ ॥
देववाणी संस्कृतातले गीता ज्ञान मराठीत आणण्याचे हे अवघड काम त्यांनी हाती घेतलंय. गीतेचा भावार्थ सांगणे सोपे नाहीये. श्रोत्यांना वाटेल कि “ हात्तीच्या, येव्हढे सोपे ते ज्ञान! आम्हालाही समजले असते. त्यासाठी इथे यायची गरज काय?” श्रोत्यांना या गैरसमजापासून वाचवण्यासाठी ते त्यांना या कामाच्या व्याप्तीची, त्याच्या भव्यतेची कल्पना आधीच देऊन ठेवतात. हे काही “ येये न मये आणि घमेये घेऊन पये” असं काम नहिये. ते उगाच मनात उपजले आणि करून टाकले असे नाही. हे मोठे काम आहे, अवघड आहे याची जाणीव आहे. ते श्रोत्यांना आणखी मोठेपण देतात. तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेऊन मी हे सूर्याला काजवा दाखवण्याचे काम करतोय असे ते बजावतात.
एकैकाचेनि मनोव्यापारें । हें विश्व होये संहरे ।
श्रोत्यांच्या मनात चाललेली बारीक बारीक सारीक हालचाल ते टिपकागदाने टिपतात. या जगाचा सारच व्यापार मनाच्या खेळानुसार चालतो. “मन चिंती ते वैरी न चिंती” असे उगाच म्हणत नाहीत. एका बेसावध क्षणी सज्जनाचे विचारहि चुकतात. पाय वाकडे पडतात. आणि काडी काडी जमवून उभारलेला संसार उद्ध्वस्त होतो. ज्ञानेश्वर कालातीत वचन येथे सांगून जातात. एका एका व्यक्तीच्या विचारांमध्ये हे सर्व विश्व – universe- जाळून टाकण्याची क्षमता आहे. म्हणून ते श्रोत्यांना आवाहन करतात कि गीतेच्या ज्ञानाला समजून घ्या. एकदा हे अमृत तुमच्या मनात भिनले कि मग कोणत्याही विध्वंसक विचारांना मनात शिरण्याची हिंमत होणार नाही.
ज्ञानेश्वरी हि ज्ञानेश्वरांच्या अनुभवांनी सिद्ध गीता आहे. गीता कृष्णाने त्याच्या सुहृदाला, रणांगणी ऐन युद्धाच्या वेळी सांगितली असे व्यास म्हणतात. हे त्या पार्थापुढे उलगडलेले जीवन मार्गदर्शनच होते. एखादे कार्य का करायचे? प्रयत्न का करायचे? स्वत:ला लोभ, मोह या शत्रूंपासून कसे वाचवायचे? पश्चातापाच्या चितेत जिवन्तपणी जळणे कसे टाळायचे? या सर्व प्रश्नांची उत्तरे गीतेतून मिळतात. पण गीता पडली देववाणी. गीर्वाणभारती संस्कृतमध्ये. आपला कुठे अधिकार संस्कृत समजायचा? आपल्याला सहजसाध्य आपली रोजच्या व्यवहारातील भाषा मराठी. ज्ञानेश्वरांनी याच भाषेत हे जीवनदर्शन आपल्यासाठी खुले करून दिले.
पतिव्रतेचे हृदय जैसें । पतीवांचौनि न स्पर्शे ।
मी सर्वस्व ययां तैसें । सूभटांसि ॥ १११ ॥
जर जीवनातील अनिश्चितता, असुरक्षितता, भय यापासून उपाय हवा असेल तर? तर काय करायचे हे देवाने सांगून ठेवलंय. देव सांगतो कि माझ्यामध्ये एकरूप व्हा. तुम्ही आणि मी एकाच बना. इतके विरघळून जा कि काही अंतरच उरो नये. एखादी पत्नी जशी पतीला सर्वस्व अर्पण करते, तिच्या हृदयात पतीशिवाय दुस-या कुणाचाही विचार नसतो तसे तुम्ही माझे व्हा. एकदा तुम्ही माझे झालात कि तुमची प्रत्येक कृती माझी होते. तुमची प्रत्येक चूक माझी होते. असे झाल्यावर तुमच्या चुकीच्या शिक्षेचे खापर माझ्यावर फुटते. कोणती पतीव्रता स्वत:च्या चुकांची शिक्षा पतीला हौ देईल? ती चुका टाळण्याचा प्रयत्न करेल. पतीला आनंद व्हावा यासाठी काय काय करता येईल याचा सतत विचार करीत राहील. याने पती व ती दोघे आणखी एकरूप होतील. व एकदिवस दोघांची हृदये अभिन्न होतील. माझे आणि माझ्या भक्ताचे हृदयही तसेच एक होते. मी आणि भक्त वेगळे राहत नाहीत. आता भक्ताचे प्रत्येक गुज, प्रत्येक यश, प्रत्येक आनंद , दु:ख माझेच होऊन जाते. आता तो भक्त भक्त उरत नाही. तो देव बनतो व तसाच आनंदाच्या सागरात आनंदविभोर होऊन जगतो.
पाइकु पाठिसिं घातला । आपण पुढां राहिला ।
कधी तुम्ही समजदार आई- मुलाला रस्त्याने जाताना पाहिलेय? आई रहदारीच्या बाजूला असते आणि मुल रहदारीच्या विरुद्ध बाजूला, आईच्या छत्रछायेत मजेत रमत गमत सुरक्षित चालत असते. त्याला कसल्याही धोक्याची काळजी नसते. कारण त्याने सर्व भार आईवर टाकलेला असतो आणि त्या माउलीनेही तो भार समर्थपणे पेललेला असतो. कृष्णानेही तेच केले. तो रथावर सारथ्य करत राहिला आणि अर्जुन त्याच्या मागे कौरवसेनेच्या मान सुरक्षित राहून वार करीत राहीला. त्याचा सर्व भार देवाने स्वत:च्या शिरी घेतला होता. शस्त्र-अस्त्रांची दाहकता सर्व रोखून धरली होती. अर्जुनापर्यंत थोडीही आच पोहोचली नाही.
एकदा तुम्ही देवाचे पाईक झालात कि तो तुम्हाला पाठीशी घालतो. देवाचे म्हणणे काय असते “ आनंदी राहा. ज्या कृत्याने, शब्दाने देवाला त्रास होईल, त्याचा अपमान होईल असे काही करू नका.” आता देवाला त्रास कशाने होतो तर त्याच्या दुस-या पाइकाला त्रास होईल असे वागणे. देव याला कधीच मान्यता देत नाही. तुमच्या मनात देवच भरून राहिला असेल तर असे कृत्य तुमच्या हातून होतच नाही. तुम्ही देवत्वाला पोचलेले असता. तुमच्याकडे येणारे प्रत्येक अस्त्र देव स्वत:वर घेतो. पण अट एकच – सर्वस्व देवाला द्यायचं, देवच मनात ठेवायचा. हे जरा गैरसमज निर्माण करणारं आहे. तुम्ही देव देवच करीत राहिलात तर तुमची नित्य नेहमीची कामे कोण करील? तुम्ही म्हणाल कि देव. तर देव तुमचा श्रीखंड्या होईलही, तुमच्यासाठी दळण दळीनही .पण कधि? तुम्ही तुमची स्वत:ची कामे तना मनाने पूर्ण करीत असाल तर. तुमच्या परिवाराची, समाजाची व नोकरी व्यवसायाची पूर्ण जबाबदारी प्रामाणिकपणे पेलत असाल तर. कामचुकार, टवाळखोर, विकृत मनाचे, यांना देव मदत करीत नाही. देव त्याच्या पाईकाच्या पुढे उभा राहतो.
याविषयी विस्ताराने पुढच्या लेखात.
— राजेंद्र गंगाधर चौरे