नवीन लेखन...

ज्ञानगंगेच्या प्रवाहात

‘आई गं! खूप त्रास होतोय गं मला चालताना. घेऊन दे ना मला नवीन चप्पल. वाटल्यास मला दोन दिवस जेवायला देऊ नको. मी उपाशीपोटीच तुझ्यासोबत कामाला येईल. बघ ना माझ्या पायाकडे, त्या भेगांमधून किती रक्त येतंय?’
भावाचे शूज थोडे जरी फाटले तरी त्याला शिवू देत नाही तर लगेच नवीन घेऊन देते. शिक्षणात मी त्याच्यापेक्षा हुशार असून मला शिक्षणापासून वंचित केलंस आणि तो दहावीत तीनदा नापास होऊन सुद्धा पुढील शिक्षण घेतोय. काय पाप केलेय गं मी म्हणून तू मला अशी शिक्षा देत आहेस? का मला दहावीनंतर शिकता आलं नाही? मुलगी असण्याचा परिणाम एवढा भयंकर असू शकेल असं माहीत असतं तर मी मला समज यायच्या आतच अवघ्या जगाला सोडून देवाघरी निघून गेली असती. का करतेस गं असं? जगू दे ना मला पण माझ्या भावासारखं. त्याला जन्माला घालताना ज्या वेदना तुला सहन कराव्या लागल्या त्याच वेदना माझ्यासाठीही सहन कराव्या लागल्यात ना तुला? मग का अशी वागतेस माझ्याशी? ज्योत्स्नाचं विचारचक्र या दिशेने सुरूच राहिलं होतं. पण उत्तरं मिळत नव्हती.

‘मी घर तसेच शेतीची सर्व काम करते याचे मला दुःख नाही गं. पण भावाला ज्या सुविधा मिळत आहेत त्या सुविधा मलापण मिळायला नको का? निदान शिक्षण तरी. कॉलेजमध्ये न जाताच मी माझे शिक्षण पूर्ण करेन पण मला शिक्षणापासून वंचित करू नकोस. आज झालेल्या वेदना मी सहन करेन गं, पण आयुष्यभर ह्या वेदना मला सहन होणार नाहीत.’ ज्योत्स्ना आपल्या पायांमधून रक्तस्राव होताना बघून आईजवळ मनमोकळेपणाने तिच्या भावना व्यक्त करू लागली. ज्योत्स्ना बोलत असताना रडत होती त्यावेळी आईचे डोळेही पाणावले, पण क्षणातच तिने आपले डोळे पुसले आणि ज्योत्स्नाला म्हणू लागली..
वेडी आहेस का तू..? तुला कशाला पाहिजे शिक्षण? मुलगी आहेस तू याचं थोडं तरी भान आहे की नाही तुला? उद्या तुझं लग्न होईल तेव्हा तुला माझ्यासारखंच चूल आणि मूल पहावं लागेल ना.? मग कशाला एवढा शिक्षणाचा खर्च करायचा, त्यापेक्षा तुझ्या भावाला उच्च शिक्षण देऊन कुठेतरी गुंतवून ठेवलं तर बरं होईल. तुझ्या शिक्षणाचा आम्हाला काय फायदा होणार?’

शिकून सवरून असलेल्या बाया घरचे काम करायला लाजतात. त्यामुळे घरामध्ये वाद होईल. उद्या लग्नानंतर काही बरंवाईट झालं तर मी कोणाकडे पाहणार? ही आईची भीती होती. बघ ज्योत्स्ना मुलगी आहेस. तू जास्त शिकली काय किंवा कमी शिकली काय तुला उद्या मी जे काम करते तेच काम करावं लागेल. म्हणून आजपासून सवय लावून घे. उद्या तुला जड जाणार नाही. आईचे बोलणे म्हणजे जुन्या वाईट परंपरेने जखडलेल्या भाकडकथेसारख्या वाटत होतं. आईचे प्रत्येक शब्द ज्योत्स्नाच्या काळजावर वार करत होते. स्वतःच्या आईला आपण परकीय वाटत आहोत म्हणजे आयुष्यात आणखी जगण्यासारखं काही शिल्लक राहिलं असेल असे तिला वाटतच नव्हतं. म्हणून न राहवून ती आईला मोठ्या आवाजात म्हणू लागली.

आई! तू खरंच माझी आई आहेस का गं? पोटच्या गोळ्याला कोणतीही आई वेदना देऊ शकत नाही असं मी ऐकलं होतं. साधू, संत, ऋषी, मुनी एवढेच काय तर परमात्म्याला सुद्धा तुझ्या पोटी जन्म घ्यावासा वाटतो. आई म्हणजे आत्मा आणि ईश्वराचे मिलन.आई शब्द उच्चारताना किंवा ऐकताना मनाला किती आनंद होतो हे माहीत आहे ना तुला? आईला मुलगा आणि मुलगी दोन्ही समान असतात. पोटच्या गोळ्याला कोणी परकं करतं नाही गं. माझ्या शिक्षणाचा तुम्हाला फायदा काय म्हणून म्हणतेस. काय फक्त तुमचा फायदा व्हावा म्हणून मला जन्माला घातलंस का गं. किती विचित्रपणे बोलत आहेस आज तू. शिकणार्या प्रत्येक मुली घरकाम करायला लाजत असत्या तर कोणाचाही संसार आज सुव्यवस्थित चालला नसता. मला नोकरीसाठी नाही तर मला माझे अधिकार आणि कर्तव्य समजले पाहिजे आणि माणूस म्हणून मलाही जगता यायला पाहिजे म्हणून मी शिक्षणाविषयी हट्ट करत आहे. आज तू जे काही बोलत आहेस ते शिक्षणाच्या अभावामुळे बोलत आहेस. विचारवंतांचे विचार वाचले असतेस तर तुला माझ्या भावात आणि माझ्यात भेद जाणवला नसता. आई असून तू माझ्याशी अशी वागलीस तर मी आणखी कोणाकडे पहायच?’आई मला पायांच्या भेगांमधून रक्त वाहताना ज्या वेदना होत आहेत त्यांच्यापेक्षा जास्त वेदना तुझ्या बोलल्यामुळे झाल्या. खरंच मी जन्मालाच आली नसती तर खूप बरं झालं असतं गं.’
ज्योत्स्ना बोलायला लागली. हक्क काय आहे ते समजायला लागली. भांडायला, जाब विचारायला तिला बळ येत आहे. हे सर्व फक्त तिच्या शिक्षणामुळे. आईला हक्काचं बोलणं कधी जमलंच नाही. पूर्वग्रहदूषित रीतिरिवाज आणि भाकडकथांमुळे ती मुलामुलींत भेद करायला लागत होती. स्वतःचा मुलगा दहावीत तिसर्यांदा नापास होऊन सुद्धा ती त्याला पुढील शिक्षणासाठी उत्तेजित करत होती पण मुलगी दहावीत चांगल्या गुणांनी पास होऊन सुद्धा घरकाम आणि शेतीच्या कामात व्यस्त होती. आईला आपल्या अशा वागणुकीमुळे खूप वाईट वाटत होतं. लेकीच्या शब्दांनी आज मात्र निराळाच परिणाम साधला. ती ज्योत्स्नाच्या पायाकडे बघून रडतच तिला म्हणू लागली..

माफ कर गं बाई मला. खरंच मी खूप चुकीची वागली तुझ्यासोबत. आई असूनही तुझ्या वेदना मला जाणवू शकल्या नाहीत. अशिक्षित आहे ना, हक्क, कर्तव्ये याची जाण मला कशाला राहणार? फार गुणाची लेक आहेस गं माझी तू. मी तुझी आई आहे आणि माझ्याच पोटी जन्माला आलीस. नको गं मला दूर करूस. मी तुला शिकवणार, तुझ्या ध्येयापर्यंत पोहचवणार, तुला हसताना, खेळताना, भावासोबत पुन्हा शिकायला जाताना मी बघणार. माझं काहीही झालं तरी चालेल पण तुझ्या स्वप्नांचा गळा मी आता घोटणार नाही. उद्याच तुला नवीन कपड्यासकट चांगले शूज आणि कॉलेज बॅग घेऊन देते. कॉलेजध्ये ऍडमिशन करायला तयार राहशील.’

एवढे बोलून ती ज्योत्स्नाच्या पायाला आपल्या मांडीवर घेऊन भेगांमध्ये मलम लावून तिला घट्ट मिठी मारली आणि नंतर दोघी निवांत झोपी गेल्या.सकाळी उठल्याबरोबर आई तिला मार्केटमध्ये घेऊन गेली आणि चांगले कपडे, शूज आणि बॅग घेऊन ज्योत्स्नाचा भाऊ मग तिला आपल्यासोबत कॉलेजला घेऊन गेला आणि सायन्सला ऍडमिशन करून दिलं. एक शिक्षणापासून वंचित असणारी मुलगी पुन्हा नव्याने ज्ञानगंगेच्या पात्रात मनसोक्तपणे अंघोळ करायला तयार असलेली पाहून तिच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरंगायला लागले.

-अजय रमेश चव्हाण

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..