नव वर्षाच्या स्वागताला, नव्या दिवसाची सुरुवात सामोरी जाणे आणि तीही पं शौनक अभिषेकींच्या स्वरसाथीने हा २०२२ चा शुभशकुन मानायला हवा. आज सकाळी गोखले इन्स्टिट्यूटच्या ज्ञानवृक्षाखाली सात वाजता “प्रभातस्वर” ही मैफिल होती. यापूर्वी मंजिरी असनारे -केळकरांची मैफिल येथेच अनुभवली होती.
शौनकजींना ऐकण्याचा हा पहिलाच अनुभव. २००१ च्या गणेशोत्सवात अल्फा मराठीच्या प्रातःकालीन कार्यक्रमात मी त्यांना प्रथम ऐकले आणि पाहिलेही. नंतर अधून-मधून शौनकजी,राहुल देशपांडे,महेश काळे आणि सलील कुळकर्णी या मराठीतील बिनीच्या शिलेदारांना ऐकले, मध्यंतरी “माझा कट्टा ” वर त्यांना ऐकले होते,पण आज सलग सव्वा दोन तासांची ही मैफिल त्यांनी तब्येतीत रंगविली- अगदी एकचालकानुवर्ती स्टाईलमध्ये !
” तानपुरे वाजत राहिले पाहिजेत ” असं आपल्या सहकाऱ्यांना दटावत त्यांनी जणू कोरोनाने पादाक्रांत केलेल्या विश्वाला संदेश दिला – ” काहीही विध्वंस होवो, संगीतकला अथकपणे सुरु राहिली पाहिजे.”
मध्येच सहकाऱ्यांना टपली मारत, प्रेक्षकांना ” सम ही पाण्यासारखी असली पाहिजे – नकळत झिरपणाऱ्या थेंबांमधून ” असं बाबा म्हणायचे ही आठवण देत, स्वतःपेक्षा साथीदारांचे कौतुक करत, श्रोत्यांमध्ये बसलेल्या संगीत क्षेत्रातील बुजुर्गांना यथोचित सन्मान देत ते प्रवाहासारखे पुढे जात राहिले. वडिलांचे प्रतिध्वनी बनून सामोरे गेले. आणि हो,मागे साथीला त्यांचा पुत्र होता त्यामुळे प्रतिध्वनीची एक नवी जोडी.
काही जागा त्यांनी अभिषेकीबुवांसारख्या घेतल्या. खूप पूर्वी पुण्यात बुवांची ऐकलेली मैफिल मनात जागली. काही वर्षांपूर्वी बावचीचे सत्पुरुष स्वामी प्रणवानंद सरस्वती यांना प्रथम भेटलो,तेव्हा ते त्यांच्या सद्गुरुंसारखे (स्वामी शिवानंद सरस्वतींसारखे) मला भासले. मग मला कळलं – सत्शिष्यामध्ये गुरुचे प्रतिबिंब परावर्तित होत असते आणि कालांतराने दोघांमध्ये कायावाचामने फारसा फरक उरत नाही. शौनक जी आणि अभिषेकी बुवा आज मला प्रतिमा स्वरूप दिसले. अर्थात शौनक जींनी कबूल केल्याप्रमाणे आजही त्यांच्यात प्रवाहाबाहेर जाण्याची शक्ती नाही. दीनानाथ, वसंतराव, कुमार जी आणि अभिषेकी बुवा यांच्यात पिढीजात आणि कट्टर बंडखोरी होती. संगीतावर मांड असल्यामुळे ते अभिजात सादरीकरणातून सहज परिघाबाहेर जायचे. ही रियाझापेक्षाही तपश्चर्या अधिक होती. “माझा कट्टा ” वर ते म्हणाले होते- ” बाबा, मला नेहेमी म्हणायचे, अरे आमच्या पिढीला जे अतिशय कष्टसाध्य, परिश्रम करून हाती लागलं ते आम्ही तुम्हाला हातात सहज, समोर आणून देतोय. ” हा खडतर प्रवास हे त्या पिढीचे भागधेय होते. मात्र ती जाण आजही शौनक जींच्या स्वरात डोकावली. बोलण्यात मिश्कीलपणा जरूर होता, अधून -मधून टांग खेचणे सुरु होते,पण मिळालेल्या संथेशी बांधिलकी होती, खांद्यावरच्या शास्त्रीय संगीताच्या प्रखर परंपरांची घट्ट ओळख होती. ” सांगे वडिलांची किर्ती ” अवश्य होते कारण वडीलही तसेच तेजस्वी होते म्हणूनच भैरवी गाताना आपल्या संवादिनीवरील साथीदाराला ” हे अभिषेकींचे आहे, त्यांवर गुलाम अलीचे रोपण नको” हे सांगायची धमक होती.
ही सगळीच तरुण शिलेदार मंडळी आता हळूहळू स्वतःची ” घराणी ” निर्माण करण्याच्या वाटेवर आहेत आणि मराठीसाठी तसेच एकुणात शास्त्रीयसंगीतासाठी हा ” प्रभातस्वर ” आहे. आजच्या मैफिलीने मला या अर्थाने आश्वस्त केले.
भुसावळची तापी,सांगलीची कृष्णा, ऋषिकेशची गंगा, नाशिकची गोदावरी अशा नद्यांच्या तीरी उभे राहण्याचे अनेक प्रसंग माझ्यावर आलेत. शेवटी नदीचे ” नदीपण ” तिच्या प्रवाही असण्यात असते. तद्वत ” जयपूर ” असो, वा “किराणा ” किंवा “आग्रा ” घराणे असो , संगीतात प्रवाहीपण आहे का हे माझ्या दृष्टीने महत्वाचे ठरते.
आजवर ऐकलेल्या अनेक मैफिलींनी मला ते ” नदीपण ” खोलवर दिलेले आहे.
नव्या वर्षाचे हे सुखद आश्वासन ! आता दिवसभराच्या अनेक भल्या बुऱ्या अनुभवांना समोर जायची मानसिकता आजच्या प्रभातीने दिली.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे.
Leave a Reply