नवीन लेखन...

ज्ञात अज्ञात पंढरपूर २ – समस्त कलगीवाले थोरली तालिम

पंढरीतील शक्ती भक्तीचा संगम म्हणजे समस्त कलगीवाले थोरली तालिम हि तालीम. पंढरी नगरीतील वैभवशाली कुस्ती परंपरेतील महत्वपूर्ण अन् मानाचे ठिकाण म्हणजे हि व्यायामशाळा.

भारतभूची कुस्ती परंपरा अतिप्राचिन. भगवान राम अन् कृष्णापासून ते छत्रपती शिवराय अन् धर्मवीर संभाजी महाराज हि या कुस्तीपरंपरेचे उपासकच. मानव जन्मीचे इहित कार्य करित असताना “बळि तो कानपिळी” या न्यायाने जगण्यासाठी शरिरात शक्तीची अन् सुदृढ शरिराबरोबरच कणखर मनीचाही अवश्यकता असल्याने सारेच लोक पूर्वी मल्लशालेत जावून मनाने अन् तनानेही घडले जात. त्यासाठी गावोगावी मल्लशाळा उभारल्या जायच्या. तशीच ही पंढरपूरातील कलगीवाले यांची थोरली तालिम. अनेक मल्लांचा इथे उदय झाला. जसा मल्लाचा उदय झाला तसेच अनेक समाज हितैषी कार्य करणाऱ्यांवर इथेच आपली मति अन् शरिरशक्ती अनिष्ट कार्यी न वापरता समाजासाठी वापरावी हा प्राथमिक संस्कार इथे होवून अनेक समाजसेवकांचाही उदय इथे घडला.

तसेच वारकरी संप्रदायातील धुरंदर, ज्यांना आजचे युगातले व्यास म्हणाने असे उत्तुंग कार्यकर्तृत्व असणारे आणि १०० वर्षांपूर्वी ज्यांनी आळंदीची वारकरी शिक्षण संस्था स्थापिली ते परमपूज्य जोग महाराज पंढरी मुक्कामी असताना याच तालिमीत केवळ व्यायामच नाही तर कुस्तीही करीत असत. त्यामुळे त्यांच्या संतसंगतीचा वासही या लाल मातीला आहे. म्हणूनच हि व्यायामशाळा शक्ती अन् भक्तीचा संगम आहे .

पंढरीत गुणवंत मल्लाची खाण होती, आहे त्यांना घडविण्याचे कार्य या तालिमीने केले.

नदि तटावर एका बाजूला धोंडोपंतदादा मठ तर दुसरी कडे विप्रदत्त मंदिर मागचे अंगाला सरदार रास्तेंचा वाडा अशा जागी पूर्वाभिमुख मोठे पटांगण त्यामागे मोठ्या जोत्यावर पत्र्याची ही व्यायामशाळा. आत सुमारे ५० पोरं व्यायाम करतील एवढी पैस जागा. तीन पकडी चालतीस असा लाल मातीचा आखाडा. त्याला दणकट असा लक्कडकोट, आख्याड्यावर छताला बांधलेला दोर, बाहेर डबलबार, सिंगलबार हि आधुनिक तर मल्लखांबासारखे जुने व्यायाम साधन आहे. कुस्तीसाठी आवश्यक ती पारंपारिक साधने व्यायामासाठी बक्कळ जागा असणारी पंढरपूरातील हि एकमेव तालिम. या तालमीला पूर्वी तेराभाई तालिम नावानेही ओळखले जाई.

या तालिमीची स्थापना माधवराव पेशव्यांचे मामा आणि सरदार रास्ते यांनी केली. त्यांनीच आपले वाड्याजवळच्या मोकळ्या जागेत हि तालिम बांधली. अन् जनताजनार्दनासाठी मुक्त करून तिचे बक्षीसपत्राने दान केले. आजही तालमीचे दक्षिणेकडे मोठे द्वार दिसते ते रास्ते यांच्या वाड्याचेच. त्यासमोरचा नदिकडे जाणारा पूर्वपश्चिम रस्ता दगडी फरसबंदीचा आहे. आज कालौघात त्यावर मातीचा थर आहे. सोबतच्या प्रकाशचित्रांत रास्ते वाड्याचे दारहि दिसते आहे. आता रास्ते वाड्याचा मठ झाला आहे. पण तालिम अजून आहे.

हिंदुस्थानातील अनेक थोर मल्ल पंढरीत आल्यावर या मातित लढून गेले आहेत. माग अनेक वर्षे पंढरपूर केसरीची स्पर्धाही या तालिम मंडळाकडून घेतली गेली ज्यात उपमहाराष्ट्र केसरी बालारफिक शेख अन् सोलापूरचा उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकालेची कुस्ती झालीय. तसेच पंढरीतील खलिफा काका माईनकर, क्रांतिवीर वसंत बाबाजी बडवे, वस्ताद अन् उपनगराध्यक्ष गिरिधर दिगंबर बडवे, अप्पासाहेब वासकर, केराप्पा गवळी, विठ्ठल बोराडे हे जुन्या पिढीतील मल्ल त्या नंतरच्यात पंढरपूर तालिम संघाचे संस्थापक सचिव, आमचे पिताश्री अनिलकाका, वारकरी संप्रदायातील अध्वर्यु विवेकानंद तथा दादा वासकर, सुरेश बडवे , दत्ता बडवे, उपनगराध्यक्ष विलास साळुंखे, नगरसेवक नाना कदम, नगरसेवक वामन बंदपट्टे, समाजसेवक इब्राहिम बोहरी अन् त्यांचे बंधु यांची घडण याच तालमीतील. सोलापूर जिल्हा कुमार केसरीची गदा मिळवून जिल्हा पातळीवर सतत नंबर मिळवून राज्यस्तरावर आणि विद्यापिठ पातळीवर कुस्ती करण्याचे बळ या तालमीमुळेच मलाही प्राप्त झाले. आमचे घरची पुढची पिढीही याच तालमीत सराव करतेय.

सध्या काका पवार कडे पुण्याला सराव करीत असलेला आणि भारत विजेता आबा आटकळे, महापौर केसरी मारूती माळी, औदुंबर शिंदे वस्ताद, महान भारत केसरी योगेश बोंबाळे, पोलिस खात्यातला दत्ता डुबल त्याचा भाऊ दादा डुबल, गोपाळपूरचे सरपंच अर्जुन लेंगरे, गुरव मंडळी , शेगांव दुमाल्याचे आटकळे यांनीही याच तालमीत कुस्तीचे धडे गिरवलेयत. राष्ट्रीय पातळीवर खेळणारी पंढरपूरातला नवोदित बॉक्सर भार्गव महाजन बडवे यानेही याच तालमीत कुस्ती अन् मेहनतीचा श्रीगणेशा केलाय. पंढरीतील सामाजिक कार्यकर्ते सुधिर धुमाळ राजू सर्वगोड दिपक वाडदेकर यांची ही घडण याच तालमीची. तानाजी चौकातील साळुंखे, कोल्हे माने आदि कुटुंबेही या तालमीतच घडली तिही अगदी पिढ्यान् पिढ्या. वै गिरिधर दिगंबर बडवे तथा दादा म्हणजे या तालमीचे खऱ्या अर्थाने वस्तादच. खुराकाला कमी पडणाऱ्या मल्लांना पंढरीतील धनवंताकडून दूध तूप बदामाची व्यवस्था त्यांनी करावी अन् हक्काने पोरांकडून मेहनत करवून घ्यावी तर दादांनीच.

पूर्वी लाठी, काठी, पट्टा आदी मर्दानी खेळाचे शिक्षणही याच तालमाचे पटांगणात वै. जनार्दन साठे मामा देत असत. याशिवाय सूर पाट्या, फूटबॉल, हूतुतू, खोखो सारख्या पारंपारिक खेळाबरोबरच लेझिमीचाही सराव या मैदानावर चालायचा. सांप्रत काही युवक पोलिस भरतीसाठीचे पुर्वप्रशिक्षणासाठी या पटांगणावर कष्टतात.

याशिवाय पंढरीत विविध सामाजित अन् सांस्कृतिक कार्यात सदैव पुढे असणारे शिवप्रेमी तरूण मंडळ अन् तानाजी चौक तरूण मंडळाचे शेकडो कार्यकर्ते या तालमीतच घडले आहेत. सोलापूर जिल्हा कामगार केसरी ची गदा मिळवून स्तत: ची अत्याधुनिक निवासी तालिम उभारण्याची मनिषा ठेवून त्यासाठी कष्ट उपसणारा संतोष गवळी याच तालमीचा पठ्ठा.

सध्या वारकरी सांप्रदायात वारकरी पाईक संघ स्थापून वारकरी हिताचे कार्य करणाऱ्या राणू महाराज वासकरांचा पिंड याच तालमित घडला. शिवप्रतिष्ठानचे निष्ठावान सौरभ थिटे पाटील, प्रज्वल खडकेही याच तालमीत घडले. अजून किती नावे सांगू ज्यांना या तालमीने घडविले?

आताच्या काळी स्वत:च्या शरिराकडे डॉक्टर सांगेपर्यंत कोणी पहातच नाहीत. कोणी शरिर समृद्धीसाठी व्यायामच करत नाही. जे करताच ते नव्या जिमचे मागे धावताना दिसतात. त्याना अशा जुन्या तालमीचे महत्व कसे कळावे . असो.

© आशुतोष अनिलराव बडवे पाटील
पंढरपूर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..