“नोकरी धंद्यातील अडचणींमुळे आज भासणारी पैशाची चणचण आपल्या मुलीच्या शिक्षणाच्या आड येऊ देऊ नका!”
आज प्रत्येकाला आपल्या नोकरी धंद्याची काळजी सतावते आहे. आणखी पुढील किती दिवस अनिश्चितता अशीच राहणार याची कोणाला अजूनही तितकीशी कल्पना नाही. पैशाची चणचण प्रत्येकालाच भासतेय. येत्या काही दिवसात दहावीचे निकाल लागतील आणि मग चांगल्या कॉलेज मध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांची धावपळ सुरू होईल. पण यावेळी परिस्थिती थोडी वेगळी आहे. कॉलेज मध्ये प्रवेश घेताना तेथील फीच्या आकड्याकडे पालकांचे लक्ष नक्की असेल. शिक्षणाची दिशा ठरवताना पूर्ण शिक्षणाला किती खर्च येईल याची खातरजमा केली जाईल आणि कमीत कमी वर्षात शिक्षण पूर्ण करून मुलांनी आपल्या पायावर लवकरात लवकर उभे राहावे असेच प्रत्येक पालकाला वाटत असेल.
कोरोनाशी दोन हात करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार गेले चार साडे चार महिने झगडत आहे. अब्जावधी रुपये खर्च करत आहे परंतु त्याच बरोबर आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीसाठी शासन अब्जावधी रुपये दरवर्षी खर्च करत आलेले आहे. ती गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना चांगले व्यावसायिक शिक्षण मिळावे म्हणून जी शासकीय आणि अनुदानित महाविद्यालये, तंत्रनिकेतने आहेत त्यांच्यावर होणारा खर्च. अत्यल्प दरात शिक्षण उपलब्ध करून देणारी हीच महाविद्यालये आणि तंत्रनिकेतने आज अडचणीच्या वेळी सर्व सामान्य लोकांच्या उपयोगी पडणार आहेत.
येत्या काही वर्षात ज्या नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत त्या मुख्य करून इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी या विषयाशी संबंधित असणार आहेत. पण आजही या क्षेत्रात येणाऱ्या मुलींचे प्रमाण हे जास्तीत जास्त 30 टक्के एवढेच आहे. कुठेतरी इंजिनिअरिंग हे क्षेत्र मुलींसाठी नाही हे तिच्या लहानपणापासून मनावर ठसवले जाते. दुर्दैवाने आजदेखील काही प्रमाणात का होईना, मुलगी म्हटली की तिच्या शिक्षणासाठी होणाऱ्या पैशासाठी कुठेना कुठे हात थोडासा आखडता घेतला जातो. त्यात व्यावसायिक शिक्षण घ्यायचे म्हटले की पहिले प्राधान्य हे मुलाला दिले जाते. आज अशी परिस्थिती आहे की मुलगा असो व मुलगी, प्रत्येकाने शक्यतो व्यावसायिक शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभे राहून कुटुंबाला आर्थिक हातभार लावणे गरजेचे झालेय.
या लेखाद्वारे, मुलींसाठीच्या खास अशा एका संधीची ओळख करून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. या संधीचा आपण लाभ घेतलात तर जवळ जवळ शून्य खर्चात आपली मुलगी डिप्लोमा इंजिनिअर बनू शकते आणि नुसते डिप्लोमाचे प्रमाणपत्रच नाही तर कोर्स संपल्यावर तिच्याकडे एका वर्षांचा इंडस्ट्री मधील कामाचा अनुभव देखील असेल ज्याच्या जोरावर तिला नोकरी मिळविण्यात कोणत्याच अडचणी येणार नाहीत!
मुंबई येथील एस एन डी टी महिला विद्यापीठ हे १०४ वर्षांची परंपरा असलेले भारतातील पाहिले महिला विद्यापीठ आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिलांसाठी स्थापन केलेल्या या भारतातील पहिल्या विद्यापीठाच्या पी व्ही पॉलिटेक्निक या शासन अनुदानित तंत्रनिकेतनाद्वारे चालविणारा जाणारा “डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स” हा चार वर्षांचा अभ्यासक्रम म्हणजे आजच्या घडीला मुलींसाठी शिक्षण घेऊन तंत्रज्ञान क्षेत्रात आपले करिअर करण्यासाठी एक हक्काचा आणि हुकुमी मार्ग ठरत आहे. एका वर्षाच्या इंडस्ट्री ट्रेनिंग चा समावेश असणाऱ्या या अभ्यासक्रमाची चारही वर्षांची मिळून एकूण फी ही साठ हजाराच्या आसपास आहे आणि जवळजवळ तेवढीच रक्कम विद्यार्थिनींना इंडस्ट्री मधून स्टायपेंड च्या स्वरूपात आजवर मिळत आलेली आहे त्यामुळे शिक्षणासाठी येणारा फी च्या रूपातील खर्च हा नसल्यात जमा आहे. शिवाय शासनाच्या इतर स्कॉलरशिप आणि फ्रीशिप योजना पण आहेतच! इथे एक गोष्ट नक्की लक्षात घेण्यासारखी आहे की आज खाजगी तंत्रनिकेतनाची एका वर्षाची फी ही साठ हजाराच्या वर आहे!
या कोर्स साठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींना ट्रेनिंग देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि कंप्युटरच्या क्षेत्रातील एल अँड टी, टीआयएफआर, बीएआरसी, अँपलॅब, सेलेक, पॅरलॅक्स लॅब अशा नामवंत कंपन्यांसमवेत इतरही जवळ जवळ १५ कंपन्या उपलब्ध आहेत. लॉक डाऊन च्या काळातही सिमेन्स सारख्या कंपनीने कॉलेज वर विश्वास दाखवत २०२० च्या बॅच मधील दोन मुलींना या अगोदरच ऑफर लेटर दिलेले आहे. अनुभवी शिक्षक आणि इंडस्ट्री मधील तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मुली इंडस्ट्रीला जे अद्ययावत ज्ञान हवे आहे त्याचे शिक्षण घेत आहेत. ज्यावेळी इतर कॉलेज मध्ये तीन वर्षात जास्तीत जास्त पुस्तकी ज्ञानच मिळते त्याचवेळी इथे मात्र तुम्हाला एका वर्षाचा इंडस्ट्री मधील कामाचा अनुभव मिळतो. एक डिप्लोमा इंजिनिअर घडविण्यासाठी जसे अपेक्षित आहे तसे रोजगाराभिमुख शिक्षण देण्यासाठी या चार वर्षाच्या मोठ्या मेहनतीने बनविलेल्या अद्ययावत अभ्यासक्रमाची खूप मदत होते आहे आणि त्यामुळेच जेव्हा नोकरीसाठी येथील विद्यार्थीनी इंडस्ट्री मध्ये जातात तेव्हा त्या रिकाम्या हाताने परत कधीच येत नाहीत हे नक्की!
मी आपणाला इलेक्ट्रॉनिक्स चा पर्याय देत आहे कारण, येत्या काळात इलेक्ट्रॉनिक्स च्या क्षेत्रात काम करणाऱ्यांचे भविष्य उज्ज्वल आहे. याची काही कारणे आपण पाहू.
१.आपण सध्या इलेक्ट्रॉनिक्सवर अवलंबून असलेल्या जगात राहतो. संपूर्ण जगामध्ये कोरोनामुळे तयार झालेली पार्श्वभूमी पाहता जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनिक्स उद्योग भारताकडे वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर कधी नव्हे ते आपले सरकार आत्मनिर्भरतेवर एवढा भर देत आहे. या सर्वांचा प्रभाव या क्षेत्रातील नोकऱ्या वाढण्यावर होणार आहे.
२. 5G आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर दिवसेंदिवस अपरिहार्य बनत चालल्यामुळे त्यासाठी आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स प्रणालींचा वापर करणे क्रमप्राप्त आहे.
३. दूरसंचार, अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स, मॅन्युफॅक्चरिंग सिस्टम, आयटी, कंप्यूटिंग, रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि बर्याच गोष्टींचा समावेश असलेल्या या विस्तृत क्षेत्रातील अभियंत्यांना यशस्वी करिअरसाठी अनेक संधी सध्या उपलब्ध आहेत .
४. याशिवाय सेल्फ ड्रायव्हिंग कार, ड्रोन लॉजिस्टिक, रोबोटिक्स, ऑटोमेशन, स्मार्ट एनर्जी सिस्टम इ. यासारख्या भविष्यातील अत्याधुनिक क्षेत्रात नवनवीन जॉब रोल्स तयार होत आहेत.
५. ऑटोमोटिव्ह, आयटी, टेलिकॉम, मॅन्युफॅक्चरिंग, पॉवर, ट्रान्सपोर्ट, युटिलिटीज आणि कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीज अशा अनेक क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला पूरक असे बदल होऊ घातले आहेत.
वरील सर्व गोष्टींचा विचार करून अभ्यासक्रमात आवश्यक तो बदल एसएनडीटी च्या अभ्यासक्रमात केला गेलेला आहे आणि त्यामुळेच मुंबईमधील नामवंत कंपन्या येथील इंजिनिअर्स ना ट्रेनिंग देण्यासाठी आणि नोकरीत सामावून घेण्यासाठी इच्छुक आहेत. फक्त ४० विद्यार्थिनींना प्रवेश देणाऱ्या या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी अथवा इतर कोणतीही शंका असल्यास अथवा आणखीन माहिती पाहिजे असल्यास ९३२१२ ३२२३८ या नंबरवर कॉल करू शकता अथवा आपले नाव व मोबाईल नंबर मेसेज करु शकता.
Leave a Reply