नवीन लेखन...

कोकणची मुंबई; नको रे बाप्पा !

Transforming Konkan into Mumbai ? No.. Never

आपल्या भारतीय लोकांची एक गंम्मत आहे, आपल्याला नेहेमी आपण आहोत त्यापेक्षा जे नाहीत ते बनण्याची किंवा बनवण्याची अतोनात होस. मुलीला मुलाचे कपडे काय घालू किंवा क्वचितच असलं, तरी मुलाला मुलीचे कपडे काय घालु, काय नि काय..! मुंबईला शांघाय काय नि कोकणाला कॅलिफोर्निया काय, काही विचारू नका..! या मुर्ख होसेपायी आपण बनवायला गणपती जातो, पण उत्साहाच्या भरात सोंड नेमकी कुठे चिटकवायची याचा अंदाज न आल्याने म्हणा, किंवा जोश मे होश गमावल्यामुळे म्हणा, ती नेमकी मुखाऐवजी पुठ्ठ्यावर लागते (खरंतर पुठ्ठ्याऐवजी xxवर असं म्हणायचं होतं, पण ‘भावने’च्या भीतीने म्हणणं आवरतं घेतलं. भावना फार सेन्सिटीव्ह झलीय बुवा हल्ली.) आणि त्याचं थेट माकड होऊन जातं, असं काहीसं आपलं होतंय किंवा झालंय.

या सर्व अतिउत्साहात आपणं आपलं नैसर्गिक वा उपजत जे पोटेन्शिअल असतं, तिकडेच दुर्लक्ष करतो किंवा त्याला हीन ठरवतो आणि स्वत:चाच सत्यानाश करून घेतो. काही वर्षांपूर्वीपर्यंत आडव्या झोपडपट्ट्यांचं मुंबई शहर, त्याचं शांघाय करायच्या नादात, ते उभ्या झोपडपट्ट्यांचं केलं आणि येवढं होऊनही पुन्हा आडव्या झोपड्या आहेतच. शांघाय हे शाघायच राहीलंय, त्यांनीआणखी कुणाची काॅपी केली नाही, चिन्यांनी काॅपी केलीच असेल तर पुढारलेल्या देशातील राज्यकर्त्यांची आणि शहरनियोजनकारांची, परंतू विकास मात्र शांघायच्या गुणांना पुरक आणि दोषांना मारक असाच केला असावा. सतत भुकंप होणाऱ्या टोकीयोचा विकास कुठल्या इतर शहरांची काॅपी करून झालेला नाही तर टोकीयोचं भोगोलिक स्थान, हवामान, निसर्ग आणि तेथील लोकं अशा सर्वांच्या प्रकृतीचा आणि प्रवृत्तींचा विचार करून, त्याला साजेश्या पद्धतीने विकास करण्यात आला आणि म्हणून ते जागतिक दर्जाचं शहर होऊ शकलं. इतकं लांब कशाला, मुंबईचंच उदाहरण पुरेसं आहे. मुंबंई महानगरी झाली, ती तिला लाभलेल्या नैसर्गीक बंदरामुळे. मुंबईचं हे पोटेन्शिअल ब्रिटीशांनी ओळखलं आणि मुंबईला तसं बनवलं अन्यथा ब्रिटीश येण्यापूर्वीही मुंबई इथेच होती आणि पडीकही होती. पुढे मुंबई देशाची आर्थिक राजधानी झाली, ती तिच्या दमट हवामानाला योग्य अशा कापड गिरण्यांमुळे व अर्थातच तिच्या सुरळित बंदर असण्यानं. पुढे मात्र कुठल्यातरी पाश्चात्य देशाची भ्रष्ट कॉपी करण्याच्या नादात मुंबईचा पार कोंडखाना आणि सिमेंटचं जंगल आणि खड्ड्यांचं कुरणं करून, इथं मोकळा श्वास घ्यायलाही जागा ठेवलेली नाही.

शहर असो वा माणूस, त्याच्या अंगभुत क्षमतांना आणि गुणांना ओळखून त्यांचा योग्य उपयोग केला, की मग आणि मगच शाश्वत विकास (sustainable development) शक्य होतो. आपण ‘विकास’ असा शब्द म्हणतो, तो शब्दकोशात ‘विकस’ असा आहे आणि त्याचा अर्थ उमलणे, फुलणे असा आहे. उमलणे, फुलणे, मग त्या फुला-फळांच्या असोत की शहराच्या किंवा माणसांच्या, ह्या क्रिया पूर्णपणे आजुबाजूच्या वातावरणावर आणि नैसर्गिक घटकांवर अवलंबून असतात, नव्हे असाव्यात, आणि नेमकं तेच आपण विकासाच्या कैफात विसरत चाललोत असं म्हणायला जागा आहे. उमलण किंवा फुलण हे हळूहळू आणि निसर्गाच्या कलेने व्हायला हवं. केमिकलने पिकवलेल्या आंब्यात सत्व आणि चवही नसते हे काय कोकणवासियाना माहित नाही?

कोकणची मुंबई करण्याची कल्पना ज्या डोक्यातून बाहेर आली आहे किंवा येऊ घातलीय, त्याच्या शहाणपणाविषयी मला शंका येऊ लागलीय. ज्या व्यक्तीला हे जे काही सुचलं, त्याचं जनरल नॉलेज पार रित आहे किंवा महाराष्ट्राच्या राजधानीपासून त्याची नाळ पार तुटली आहे असं समजायला हरकत नाही. मुंबई काय हलाखीत दिवस काढतेय याची त्या सज्जनांना कल्पना नसावी हेच यातून दिसतंय. गुरांनाही राहायला चांगली जागा असते असं मुंबईतील खुराडी पाहून वाटावं. हिटलर गॅस चेंबरमधे मारण्यासाठी, माणसांना रेल्वेच्या वॅगन्समधे गच्च कोंबून भरून घेऊन जायचा अश्या कथा वाचल्या होत्या. मुंबईतल्या रेल्वेची त्याही पेक्षा वाईट अवस्था आहे आणि त्यातून मुंबैकर जबरदस्तीने, नाईलाजाने प्रवास करतोय. सकाळी बाहेर पडलेला मुंबैकर रात्री सुखरूप घरी येईल याची शाश्वती राहीलेली नाही आणि हे सर्व कोकणात व्हावं अशी राज्यकर्त्यांची इच्छा असेल, तर कोकणाला तो परशुरामच वाचवो बाबा..

मुंबईचा विकास असाच नियोजनशुन्य धरसोड पद्धतीने झालाय आणि म्हणून मुंबई बकाल झालीय. एक ताजं उदाहरण देतो. ही बातमी १० जुलै २०१७ रोजीच्या लोकसत्तेत आली होती. मुंबईच्या नव्याने होऊ घातलेल्या मेट्रो प्रकल्पासाठी मुंबईची फुफ्फुसं असलेल्या ‘आरे कॉलनी ‘च्या जंगलाचा बळी द्यायचं घाटलं आहे. आता विकास करायचा म्हणजे पर्यावरणाचा काहीतरी बळी द्यावाच लागणार हे मान्य आहे. परंतु इथे जे चाललय ते मात्र काहीस विचित्र आहे. आरे कॉलनीतली होणारी वृक्षांची हानी भरून काढण्यासाठी म्हणे नरीमन पॉईण्ट –कुलाब्या जवळच्या समुद्रात भरणी टाकून तिथे हजारो वृक्ष लावण्यात येणार आहेत. आताअस्तित्वात असलेले पूर्ण वाढलेले, हजारो वृक्ष कापून समुद्रात नव्याने बेट तयार करून तिथे वृक्ष लावण्याचा द्राविडी प्राणायाम का केला जातोय हेच कळत नाही.

हे सर्व लिहावसं वाटलं कारण कालच कुठेशी वाचलेली ‘कोकणची मुंबई’ करणार ही बातमी. ही बातमी ऐकून अंगावर काटाच आला. जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाच्या पाठोपाठ आता कोकणात ग्रीन रिफायनरी येणार आणि कोकणची मुंबई होणार हे ऐकून अंगावर उठलेला काटा नसून पुरळ असल्याची जाणीव झाली. कोकणचा कॅलिफोर्निया करणं एकनेळ समजू शकतो कारण त्यात निसर्गाचा विचार आहे, पण मुंबई?

प्रत्येक ठिकाणचा एक युएसपी म्हणजे एक बलस्थान असत. कोकणाचं बलस्थान हे तेथील निसर्ग आणि अनाघ्रात समुद्रकिनारे आहेत. या बलस्थानांचा विचार करून केलेला विकास हा नेहेमी शाश्वत आणि मुख्य म्हणजे तेथील स्थानिकांचा विकास असतो. मोठमोठे प्रदूषणकारी प्रकल्प आणून, स्थानिकांच्या जमिनी घेऊन, तेथील कुटुंबातील कुणाला तरी नोकरी देऊन होणारा विकास ही सूज असेल, सुदृढता नव्हे. मुंबईत झोपडपट्ट्यांचा विकास करताना, झोपडपट्टीवासियांचं भल करण नव्हे, तर त्या झोपड्यांच्याखाली असलेल्या बहुमोल जमिनींवर सर्वांचा डोळा होता आणि हे नुकत्याच उघडकीला आलेल्या एस आर ए घोटाळ्यावरून उघडकीला आल. दुर्दैवाने कोकणातही हेच होईल याची भीती वाटते. मोठ मोठे प्रकल्प आणून प्रकल्पांना लागणाऱ्या जमिनी स्थानिकांकडून विकत घ्यायच्या आणि त्याच दाम दुपटीने प्रकल्पांना विकायच्या हे देशात सर्विकडेच झालंय, ते इथे घडणार नाही याची काही खात्री नाही.

कोकणचा आणि मुख्य म्हणजे तेथील जनतेचा विकास करावयाचा झाल्यास पर्यटन उद्योगासारखा दुसरा उद्योग नाही. पर्यटनावर मलेशिया सारख्या अनेक देशांचा संपूर्ण खर्च चालतो. शेजारच्या गोवा राज्यांच उदाहरणही आहे. गुजरात सारख्या राज्याने अमिताभ बच्चनना घेऊन जगात वाळवंटही विकून दाखवलय. मग कोकणचं अनाघ्रात गूढ निसर्ग सौंदर्य, स्वच्छ समुद्र किनारे, महाराजांचे गड किल्ले, लोकजीवन- लोककला- खाद्य जीवन, सह्याद्रीतील जैवविविधता, घनदाट जंगलं यांचा कल्पक्तेने वापर करून पर्यटन उद्योगासारखा पर्यावरणाला घातक न ठरणारे उद्योग विकसित करायला काय हरकत आहे. कोकणच्या समुद्राचं आकर्षण देशात अनेकांना आहे, त्या आकर्षणाचं रुपांतर आपण व्यावसायात करणं गरजेचं आहे. गोव्याने ते तसं केलंय. पर्यटनासारख्या व्यवसायात एक आहे, की या प्रकारच्या उद्यागांमुळे परिसराची वाढ हळूहळू होते आणि हळूहळू होणारी वाढ ही समृद्धीकडे नेते अन्यथा ती सूज ठरते आणि सूज हे अनारोग्याच लक्षण आहे. कोकणला कालीफोर्निया किंवा रोगट बकाल मुंबई करण्यापेक्षा, त्याला कोकणच ठेवल तर ते जास्त भल्याच ठरेल.

मुंबई, पुणे किंवा अन्य कोणत्याही मोठ्या शहरातला ऑक्सिजन संपत चाललाय. कोकणात मात्र तो मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. भविष्यातील पर्यटन काही बघण्यासाठी कमी आणि निर्मळ प्राणवायू मिळावा म्हणून जास्त होणार आहे याची जाणीव राज्यकर्त्यांनी नसली तरी स्थानिक जनतेने मात्र ठेवायला हवी. स्थानिक लोक्प्रतीनिधिनीही जनतेच्या या भावनांची कदर करून आपले पक्षभेद विसरून कोकणच कोकणत्व टिकवून ठेवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि त्यांना तसं करण्यासाठी जनतेनेही (आणि विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही) त्यांच्यावर दबाव आणला पाहिजे. ही काळाची गरज आहे.

— नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..