नवीन लेखन...

चिनी माल खरेदी करणं जीवनावश्यक आहे का ?

Do we really need Chinese Products ?

एकेकाळी उल्हासनगरमधील उत्पादनांना त्यांच्या कमी किमतीमुळे फार मोठी बाजारपेठ होती. जगातल्या कुठल्याही ब्रॅंडची कुठलीही वस्तू उल्हासनगरमध्ये बनू शकते याची खात्री अनेकांना असायची. मूळ उत्पादन आणि उल्हासनगरमध्ये बनलेले उत्पादन यातला फरकही कळायचा नाही. किंमत मात्र अत्यंत कमी असायची त्यामुळे उल्हासनगरचा माल खपायचाही लवकर.

लोक गमतीने उल्हासनगरच्या मालाला Made in USA म्हणायचे. म्हणजे Made in Ullhasnagar Sindhi Association. अगदी फिलिप्सचे रेडिओ ते इतर अनेक नावाजलेल्या ब्रॅंडसच्या वस्तू उल्हासनगरमध्ये मिळायच्या. मात्र उल्हासनगरचा माल हा कायमच डुप्लिकेट म्हणून हिणवला गेला. खरंतर त्या उत्पादनांमध्येही एक ताकद होती. उल्हासनगरची ही उत्पादने त्यांच्या नावाने विकली गेली असती तर त्याचवेळी उल्हासनगरची ही बाजारपेठ स्वत:च्या आस्तित्त्वाचा ठसा उमटवू शकली असती. तसे झाले असते तर Made in Ullhasngar च्या ऐवजी हाच माल Made in India म्हणूनच विकला गेला असता. कदाचित त्यामुळे चिनी माल भारतात येण्याऐवजी इथलाच माल देशोदेशी गेला असता.

मात्र कदाचित त्यावेळच्या राज्यकर्त्यांना हे जाणवले असावे आणि त्यांच्या वैयक्तिक स्वार्थाच्या व्यावसायिक गणितात हे बसत नसावे. नाहीतर जी मेक इन इंडियाची घोषणा पंतप्रधान मोदींनी २०१५ मध्ये केली ती इंदिरा गांधी अथवा राजीव गांधी या भारताच्या दोन महान पंतप्रधानांना करणे सहज शक्य होते. त्यांच्यात ती धमकही होती.

कालांतराने उल्हासनगरचे हे महत्त्व कमी होत गेले आणि चिनी बनावटीचा माल भारतीय बाजारपेठेत स्थिरावायला सुरुवात झाली.

आज भारतात जवळपास सर्वच क्षेत्रात चिनी बनावटीच्या वस्तूंचा सुळसुळाट झालेला आहे. कपडे, खेळणी हे तर सोडाच, पण दिवाळीतले कंदील आणि रोजच्या पूजेतील धूप, अगरबत्तीसारख्या वस्तूही यातून सुटल्या नाहीत. मुंबईत रस्तोरस्ती फूटपाथवर हा चीनी वस्तूंचा बाजार भरलेला असतो. याचे गमक हे चिनी वस्तूंच्या अत्यंत कमी किमतीत आहे.

असे म्हणतात की पश्चिमेकडच्या बाजारात काही नवे उत्पादन आले की लगेच त्याची चिनी आवृत्ती बाजारात येते. ती स्वस्त असते, पण टिकावू किंवा खरोखर उपयोगी असते असे म्हणणे धाडसाचे होईल. बहुसंख्य चिनी उत्पादनांचे आयुष्य जेमतेम सहा महिने ते एक वर्षाचे असते. यातली काही तर दुकानातून घरी घेउन गेल्याबरोबर बंद पडतात. मात्र ती उत्पादने चिनी कंपन्यांच्या नावावर विकली जातात. यामुळे चीन हा जागतिक बाजारपेठेत एक ब्रॅंड बनला.

२०१५ मध्ये प्रचंड आर्थिक मंदीच्या सावटाखाली आल्यावर. चीनने त्यांच्या मुद्रेची किंमत कमी केली. अर्थतज्ज्ञांच्या मतानुसार चीन स्वतःच्या उत्पादनांच्या किमती कमी ठेवून आर्थिक मंदीचा सामनाही करतोय आणि भारतातीलच नाही तर इतरही देशांतल्या बाजारपेठा काबिज करण्याचा प्रयत्न करतो. यामुळे भारतीय आणि इतर देशांच्या बाजारपेठेत चीनी उत्पादने अत्यंत कमी किमतीत उपलब्ध होतात. शेवटी गिर्‍हाईकाला जे स्वस्त मिळेल ते तो घेणारच. .

भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आणि एकूणच भारताच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. मात्र दुर्दैवाने यातील गांभीर्य आपण लक्षात घेत नाही आणि दररोज चिनी माल खरेदी करुन चिनची अर्थव्यवस्था बळकट करायला एकप्रकारे मदत करतोय.

चिन हा पाकिस्तानचा मित्र असल्यामुळे पदोपदी पाकिस्तानला मदत करतो हे काही आता लपुन राहिले नाही. भारताच्या पूर्वेकडच्या राज्यांमध्येही चिनच्या कारवाया सुरुच आहेत. एकीकडे आपले वीर जवान सीमेवर पाकिस्तानच्या कारवायांना बळी पडतात, शहिद होतात आणि आपण इकडे चिनी बनावटीच्या वस्तू राजरोसपणे रोज खरेदी करतो. आपण एकदातरी असा विचार केलाय का, की नकळत का होईना आपण आपल्या शूर शहिद जवानांचा अपमान करतोय?

भारत ही चीनची जगातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे. चीन भारतीय बाजारपेठेत दरवर्षी करोडो रुपयांचा व्यवसाय करतोय. यातील बराचसा माल चोरीच्या मार्गाने येत असावा त्यामुळे अचूक आकडे मिळणे कठीण आहे. मात्र जाणकारांच्या मते जवळपास काही लाख कोटी रुपयांची उलाढाल चीन केवळ भारतात करतो.

सीमेवर शहिद होणार्‍या भारतीय जवानांना आणि त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याची ही आपल्याला संधी आहे. चिनला एक संदेश देण्याचीही हीच संधी आहे.

चीनच्या अर्थव्यवस्थेवर थोडाफार तरी परिणाम करण्याची संधी आपल्याला भारतीय नागरिक म्हणून आहे. फक्त एक महिना कोणतीही चीनी बनावटीची म्हणजेच Made in China वस्तू खरेदी न करण्याचे जर भारतीयांनी ठरवलं तर ? चीनी बनावटीची कोणतीही वस्तू न विकण्याचं भारतीय व्यापार्‍यांनी ठरवलं तर?

बर्‍याचदा आपल्याकडे No TV Day आयोजित केले जातात. एकाद्या ठराविक दिवशी रिक्षा किंवा टॅक्सीने प्रवास करायचा नाही असे आवाहन केले जाते.

असाच एखादा No Chinese Goods Month पाळायला काय हरकत आहे? विचार करा.. पटलं तर इतरांना पटवा. मेलवरुन, फेसबुकवरुन, WhatsApp वरुन.. कसंही !

नाही पटलं तर खाली मान घालून स्वस्थ बसून रहा. आपल्या स्वस्थ बसण्याने कदाचित येणार्‍या काळात आपल्याला दूधही चिनमधल्या म्हशींचं प्यायला लागेल !

— निनाद अरविंद प्रधान

निनाद प्रधान
About निनाद प्रधान 97 Articles
मराठीसृष्टीचे व्यवस्थापकीय संपादक. मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती. १९९६ साली मराठी भाषेतील पहिल्या वेबसाईटच्या निर्मितीमध्ये सहभाग. त्यानंतर अनेक मराठी आणि आणि भारतीय भाषिक वेबसाईटस बनविण्यात सहभाग. वृत्तपत्र आणि मिडियासाठी विविध सॉफ्टवेअरची निर्मिती. लोकसत्ता फॉन्टफ्रीडम आणि फॉन्टसुविधा या देवनागरीसाठीच्या अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती. अनेक वेबसाईटच्या निर्मितीत सहभाग. याच विषयावर विपुल लेखन. मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..