नवीन लेखन...

डॉक्टरांनो धंदा करता जोखीमही स्वीकारा!





रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टर्स तसेच रुग्णालयातील इतर कर्मचारी वर्गाला मारहाण होण्याचे प्रकार अलीकडील काळात खूप वाढले आहेत. या घटना बहुधा सरकारी इस्पितळाच्या संदर्भातच असतात. अशी एखादी घटना घडली की लगेच त्या इस्पितळात असतील नसतील तेवढे सगळे कर्मचारी काम बंद आंदोलन करतात. चार-दोन दिवस हे आंदोलन चालते आणि पुन्हा अशी नवी घटना घडेपर्यंत या मंडळींचे येरे माझ्या मागल्या सुरू होते. सरकारी रुग्णालयातील डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांना मारहाणीचे प्रकार वाढले आहेत, ही वस्तुस्थिती असली तरी हे प्रकार का वाढत आहेत, याचाही विचार होणे गरजेचे आहे. सरकारने आता डॉक्टर्स आणि रुग्णालयातील इतर मंडळींना संरक्षण देण्यासाठी सक्षम कायदे करण्याचे ठरविले आहे. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. अर्थात सरकारचे हे पाऊल योग्यच आहे. लोकशाहीला पूजणाऱ्या राष्ट्रात हिंसाचार खपवून घेतलाच जाऊ शकत नाही. हिंसाचार किंवा दडपशाही, मग ती गुंडांची असो अथवा पोलिसांची, केवळ निषेधार्हच नव्हेतर दंडनीयदेखील असायला हवी. कायद्याचे राज्य म्हणजे कायदे करणाऱ्यांचे राज्य नाही तर कायद्याने वागणाऱ्यांना न्याय व सुरक्षा देणारे राज्य असा होतो. सांगायचे तात्पर्य डॉक्टरांना मारहाण करण्याचा प्रकार नक्कीच योग्य नाही आणि अशा प्रकारांना आळा घातल्याच गेला पाहिजे. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सरकारने केल्या आहेत, करीत आहे; परंतु सरकारची जबाबदारी इथेच संपत नाही. तात्पुरत्या इलाजाने किंवा वरवरच्या उपचाराने कोणताही रोग कधीही बरा होत नाही. डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांविरुद्ध कायद्याचा बडगा उगारल्याने हे हल्ले थांबतील असे समजण्यात अर्थ नाही. कारण बहुतेक प्रकरणात आपल्या रुग्णाची झालेली हेळसांड, वेळेवर उपचार न मिळणे किंवा चुकीचे उपचार होणे आणि त्य

तून रुग्ण दगावणे या घटनाक्रमाची परिणती त्या रुग्णाच्या नातेवाईकांच्या क्रूद्ध प्रतिक्रियेतून उमटते. हा क्षणैक भावनांचा विस्फोट असतो आणि त्या

क्षणी कायदा वगैरे काय म्हणतो हे विचारात

घेण्याच्या मन:स्थितीत त्या रुग्णाचे नातेवाईक नसतात. त्यांच्या भावना क्रूद्ध होण्यामागच्या कारणांचाही सरकारने वेध घ्यायला हवा. आज ज्यांच्या संरक्षणासाठी सरकार कायदे करीत आहे, ती मंडळी आपल्या कर्तव्याशी कितपत प्रामाणिक असतात याचाही विचार व्हायला नको का? पूर्वी डॉक्टर किंवा वैद्य म्हणजे लोकांना देवदूत वाटायचा. कुणाच्याही संदर्भात मृत्यू ही सर्वाधिक दु:खप्रद घटना असते. या मृत्यूशी लढून आपल्या माणसाचे प्राण वाचविणारी व्यत्त*ी लोकांना देवदूत वाटणारच; परंतु आज तशी परिस्थिती राहिली आहे का? आजही आजारपणावर मात करण्यासाठी लोकांना डॉक्टरांचाच आधार घ्यावा लागतो, परंतु पूर्वी डॉक्टरांबद्दल असलेली आदराची भावना आज लोकांमध्ये दिसत नाही, यामागचे कारण कोण शोधणार? खासगी दवाखान्याची तर गोष्टच सोडा. तिथे एखाद्याला भरती केल्यावर आधी आपण किती कापले जाणार हाच विचार त्या रुग्णाच्या नातेवाईकांना अस्वस्थ करतो. तो रुग्णही त्याच विचाराने अर्धमेला होतो. काही सन्माननीय अपवाद वगळता खासगी डॉक्टरांच्या व्यवसायाला आज साखळी धंद्याचे स्वरूप आले आहे. रुग्ण एखाद्याच डॉक्टरच्या दवाखान्यात दाखल होतो, परंतु त्याच्या जिवावर इतर चार डॉक्टरांचेही पोट भरत असते. ही व्यवस्थाच तशी आहे. बऱ्याच अनावश्यक तपासण्या, ज्यांचा अहवाल नेहमीच ‘नॉर्मल’ येतो, का केल्या जातात, हे लोकांना न कळण्याइतके लोक आता अडाणी राहिलेले नाहीत. पाच-पन्नास रुपयांत बरा होणारा साधा हिवतापाचा पेशंट असला तरी एकवेळ दवाखान्यात भरती झाल्यावर तो 4-5 हजाराने तुटल्याशिवाय त्याची सुटका नसते. बऱ्याच ठिकाणी तर पेशंट दगावण
ार याची शंभर टक्के खात्री असल्यावरही केवळ बिल फुगविण्यासाठी त्याला ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरवर ठेवले जाते. कधी कधी तर पेशंट दगावल्याचेही बऱ्याच विलंबाने सांगितले जाते. अनेक दवाखान्यात आगाऊ पैसे भरावे लागतात. दवाखान्याचे बिल त्या भरलेल्या पैशापेक्षा कमी होणार नाही याची काळजी घेतली जाते आणि बिल जास्त झाले तर उर्वरित पैसे भरल्याशिवाय सुट्टी दिली जात नाही. बिलाच्या वसुलीसाठी मृतदेह रोखून धरण्याचे प्रकारही आता सर्रास होऊ लागले आहेत. शिवाय इतके पैसे कसे झाले ते विचारण्याची सोय नसते. एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलला लाजवेल असा दिमाख असणाऱ्या दवाखान्यांची संख्या काही कमी नाही. हा एक कुठलीही जोखीम नसलेला आणि प्रचंड फायद्याचा धंदा झाला आहे. थेट रुग्णाच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न असल्याने लोक फारशी चिकित्सा करीत नाहीत किंवा त्या मानसिकतेत नसतात. त्यामुळे जे बिल होईल ते मुकाट्याने भरले जाते किंवा भरावेच लागते. अशा दवाखान्यात शंभरपैकी नव्वद रुग्णांचा तर ‘गिनिपिग’सारखा वापर केला जातो. कधी कधी तर आंतरराष्ट्रीय औषध कंपन्यांनी उत्पादित केलेल्या नवनवीन औषधांचा रुग्णावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास अशा दवाखान्यात केला जातो. त्यासाठी या कंपन्यांकडून डॉक्टर मंडळींना कमिशन मिळते ती कमाई वेगळीच. ही एक प्रचंड मोठी साखळी आहे आणि या साखळीतला प्रत्येक घटक आपला मलिदा लाटण्यासाठी रुग्णाची अक्षरश: पिळवणूक करीत असतात. शंभरपैकी नव्वद आजार केवळ काही शारीरिक व्यायाम आणि योगासने वगैरे केल्याने बरे होतात, हे आता सिद्ध झाले आहे. नेमक्या याच आजारांवर खासगी व्यवसाय करणारे डॉक्टर्स अडमाप कमाई करीत असतात. रुग्णाकडून मिळणाऱ्या पैशापेक्षा त्याचा जीव वाचविण्यात किंवा त्याला बरे करण्यात अधिक समाधान मानणारे डॉक्टर्स, वैद्य आता राहिले नाहीत. आता रुग्णाचे काय बर
वाईट व्हायचे ते होवो, आपला धंदा तेजीत चालला पाहिजे, हाच विचार केला जातो. मात्र याकरिता केवळ मंडळींनाच जबाबदार धरून चालणार नाही. पूर्वी डॉक्टरी पेशाकडे वळणारी माणसे ही समाजातील एका विशिष्ट जडणघडणमधली थोडक्यात म्हणजे सामाजिक दृष्टिकोन ठेवणारी व सेवाभावी वृत्तीमधली असायची, कारण ही डॉक्टर मंडळी सरकारी अनुदानावर चालणाऱ्या कॉलेजेस किंवा हॉस्पिटल्सने चालविलेल्या कॉलेजेसमधून शिकायची. प्रवेशाकरिता केवळ बौद्धिक गुणवत्ता हाच निकष असायचा. परंतु जेव्हापासून

ही कॉलेजेस खासगीकरणात किंवा पुढाऱ्यांकडे गेली तेव्हा बौद्धिक गुणवत्तेपेक्षा आर्थिक सुबत्ता जास्त

महत्त्वाची ठरली आणि जो जास्तीतजास्त डोनेशन देईल त्यालाच प्रवेश आणि वरून भरमसाट शिक्षण शुल्क. पदव्युत्तर शिक्षण किंवा स्पेशलायजेशनकरिता अजून जास्त डोनेशन व फी. होस्टेल व इतर खर्च वेगळाच. एक डॉक्टर बाहेर येईपर्यंत अक्षरश: तीन ते पाच कोटी खर्च झालेला किंवा गुंतवणूक झालेली. मग हा झालेला खर्च लवकरात लवकर व्याजासह कसा वसूल होईल याकरिता मग पॉश हॉस्पिटल्स, कट प्रॅक्टिस, औषधी दुकानदार व कंपनीकडून कमिशन किंवा दुकान स्वत:चेच हे सर्व ओघानेच आलेच. रुग्णसेवा ही आता ईशसेवा राहिलीच नाही. डॉक्टर लोकांचा ईश्वर आता बदलला आहे. आता त्यांच्यासाठी पैसा हाच परमेश्वर झाला आहे. डॉक्टरांनी जर आपल्या व्यवसायाला आता धंद्याचे स्वरूप दिले असेल तर धंद्याच्या बऱ्यावाईट परिणामांचा सामना करायलाही त्यांनी तयार राहायला हवे. डॉक्टरी व्यवसाय हा धंदा असेल तर रुग्ण ठााहक ठरतात आणि ठााहक म्हणून त्यांना त्यांनी केलेल्या खर्चाचा हिशेब मागण्याचा अधिकार आहे. हे लोक लुबाडले जात असतील, नागविले जात असतील तर त्याविरुद्ध ते आवाज उठविणारच. तुम्ही माणुसकी गाडून धंदा करीत असाल तर तुमच्या ठााहकांकडून तुम्ही माणुसकीची अपेक्ष
ा कशी करू शकता? खासगी दवाखाने हे असे आर्थिक पिळवणुकीचे अड्डे झाले आहेत, तर सरकारी दवाखान्यांनी बेमुर्वतपणाचा, भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. खासगी दवाखान्यातले उपचार ज्यांना परवडत नाहीत त्या गरीब किंवा मध्यमवर्गीयांना सरकारी दवाखान्याशिवाय दुसरा पर्याय नसतो आणि तिथे तर अक्षरश: बजबजपुरी माजलेली असते. एखादा रुग्ण प्राणांतिक वेदनेने तळमळत पडला असेल तर त्याच्याकडे ढुंकूनही न पाहता त्याला ओलांडून जाण्याइतकी निष्ठूरता सरकारी दवाखान्यात अगदी सहज पाहायला मिळते. आपण या रुग्णांवर उपचार करतो म्हणजे फार मोठे उपकार करतो अशा थाटात सरकारी दवाखान्यातले डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी वावरत असतात. एखादा रुग्ण अचानक अत्यवस्थ होतो, त्या रुग्णाचे नातेवाईक केविलवाण्या शब्दात तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टरची विनवणी करतात, दोन मिनिटांसाठी चला म्हणून डोळ्यात पाणी आणून आर्जव करतात आणि तो डॉक्टर ‘सॉरी, माझी ड्यूटी आता संपली आहे’ असे म्हणत त्यांना ठोकरून निघून जात असेल तर त्या रुग्णाच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया काय असायला हवी? सरकारी दवाखान्यात असले प्रकार नेहमीच होतात. नाही म्हणायला यातही अपवादात्मकरीत्या चांगले डॉक्टर आणि नर्सेस असतात नाही असे नाही. मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या एका प्रतिष्ठित दवाखान्यातून एक लहान मूल बेपत्ता झाले. त्याचा आजपर्यंत शोध लागू शकला नाही. इस्पितळ कर्मचाऱ्यांच्या या बेजबाबदारपणासाठी मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेने संबंधित मूलाच्या पालकांना दहा लाख रूपये नुकसान भरपाई द्यावी असा निर्णय दिला. हा दंड या रूग्णालयाच्या कर्मचाऱ्यांकडून वसूल करण्यात यावा अशी मागणी आता पुढे येत आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत. सार्वजनिक दवाखाने म्हणजे बेशिस्त कारभार, कमालीची अस्वच्छता, भ्रष्टाचार आणि संवेदनाशून्यतेचे आदर्श नम

ने असतात. तिथल्या निष्ठूर कोरडेपणाचे अनेक जण बळी ठरतात. अनेक जण मुकाटपणे हे सगळं सहन करतात, काहींचा संयम सुटतो आणि मग मारहाणीसारखे प्रकार घडतात. हे मारहाणीचे प्रकार आता बंद व्हावेत म्हणून सरकारने कायदे केलेत. बाकी सगळं पूर्वी जसे होते तसेच सुरू राहणार! मात्र मारहाणीचे हे प्रकार पूर्वी नव्हते आणि आताच का सुरू झालेत याच्या मुळाशी सरकार कधीच जाणार नाही.

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..