मला कुत्रा या प्राण्याची फार ओढ. मलाच कशाला, आमच्या घरातील सर्वांनाच कुत्रा प्रिय. तसे सर्वच प्राणी आम्हाला आवडतात, परंतू मुंबईसारख्या शहरात त्यातल्या त्यात कुत्रा पाळणं सोयीचं, म्हणून कुत्रा एवढंच. मांजरही तशी छान वाटते, पण तिचा आपल्या विषयी पुरेसा विश्वास पटेपर्यंत ती काही आपल्या वाऱ्याला उभी राहात नाही. आणि एकदा का ती आपली झाली, की तिचा स्वत:चा वेगळा संसार आपल्याच घरात मांडून ठेवते. तिच्या डोळ्यात कायम अविश्वास दिसतो. तिला हवं असेल तेंव्हाच मस्का मारील, पायाला अंग घासेल, पायात घुटमळेल. पण एकदा का तिच काम भागलं, की मग कोण तुम्ही, असा अविर्भाव..! तिच्या मर्जीच्या विरूद्ध आपण तीला हात ही लावू शकत नाही. कुत्र्याचं तसं नसतं, तो असतोच भारी प्रेमळ, लाघवी, इमानदार आणि देखणाही..तुम्ही त्याला खाऊ द्या अथवा नका देऊ, तो तुम्हाला प्रेमच देणार, गळाभेट घेणार, चाटणार. त्याचं प्रेम त्याच्या डोळ्यांत दिसतंच..
मी मुंबईत तिसऱ्या मजल्यावर राहातो. खरंतर पहिल्या मजल्यापासून वरचे मजले कुठलाही प्राणी पाळण्यास अयोग्यच. इथं फक्त झुरळं, पाली आणि पक्ष्यांमधे घरात मच्छर आणि खिडकीच्या ग्रीलच्या आत शांतीभुत कबुतरं आणि बाहेर कावळे वैगेरे आपण न पाळताही घराच्या आत-बाहेर मुक्कामाला असतात. पण कुत्रा, मांजर वैगेरे पाळीव प्राणी वरच्या मजल्यांवर पाळणं अंमळ कठीणच. तरीही पाळलेच, तर त्यांच्यापेक्षा, सोसायटीची मेंबरंच जास्त पिसाळतात. तर एकुणात, इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर हा छंदं जोपासणं फार अवघड.
तरीही मी ठरवलं, की कुत्रा पाळायचा. त्याचं झालं असं, की माझी मुलगी व मुलगा दोन वर्षांपूर्वी चांगल्या मार्कांनी पास झाले, तेंव्हा त्यांना काय मागाल ते बक्षिस देतो असं वचन दिलं आणि ‘जो चाहीये वो मांग लो’ असं अगदी बादशहाच्या रुबाबत सांगीतलं. मला वाटलं, हल्लीच्या पोरांची धाव फार तर मोबाईलपर्यंत, फार तर टॅब, आणखी काय मागणार. फार फार तर ‘अॅपल’ ब्रान्डचा. पण जेंव्हा त्यांनी ‘कुत्रा’ असं एकमुखानं उत्तर दिलं, तो ही लॅब्रॅडाॅर उर्फ लॅब. तेंव्हा मात्र माझी गोची झाली. आता आली पंचाईत. हे कुठं मिळतं इथपासून तयारी. बरं, बादशहाच्या थाटात दिलेला शब्द, नेत्यांप्रमाणे फिरवताही येत नाही. मग काय, देतो म्हणालो..
आणि माझं ‘लॅब’चं संशोधन सुरू झालं आणि ‘कुत्रा’ शब्द जसे बरेचजण बऱ्याचदा तुच्छतेने वापरतात, तेवढा कुत्रा, त्यातही परदेशी, काही हलका नाही हे जाणवलं. प्युअर का, क्राॅस काय नि काय नि काय..! पुन्हा त्यांच्या किंमती ऐकूनही कसंसच व्हायचं. लोभस, गोंडस जीव विकत देणं आणि घेणं आधी मला पटतंच नाही. तरी पोरांलाठी गेलो, पण माझं मन काही होईना. ते कापसाचे गोडस गोळे, त्यांची विक्री करणाराला लुकुलुकू बघतायत, प्रेमानं चाटतायत आणि तो मात्र त्यांची किंमत ठरवतोय हे बघूनच मला शिसारी आली. प्रेमाने वागणारांचा, तोंडाने सुविचार सांगत, सौदा करायचा ही खास माणसांची खासियत. मला कुत्र्यांचीच कशाला, कोणत्याही जीवांची खरेदी-विक्री करणारांचा संताप येतो.. अप्पलपोटा माणूस कशाचा बाजार मांडेल हे त्या परमेश्वरालाही सांगता यायचं नाही. आता दस्तूरखुद्द जगन्नियंत्यालाही माणसानं बाजारात बसवलं, तिथं इतरांची काय कथा..? असो. कोणत्याच जीवांचा असा बाजार मांडता कामा नये असं मला वाटतं. निदान अशा व्यवहारात आपण सहभागी असू नये असं वाटलं व मी विकतचा कुत्रा घेण्याचा बेत रहीत केला. मुलांनाही समजावलं आणि एखादं गावठी (म्हंजे इंग्रजीत ‘स्ट्रे’ डाॅग) कुत्र्याचं पिलू मिळालं तर आणू लगेच असं सांगीतलं. त्यांना कुठे सापडलं तर त्यांनीही आणावं असंही सांगीतलं. मुलंही तयार झाली आणि आपली मराठी भाषा समजणाऱ्या गावठी कुत्र्याचं गावठी पिलू आणण्यावर आमचं एकमत झालं.
आता पिल्लू शोधायची मोहीम सुरु झाली. येता-जाता आम्ही सर्वचजण असं एखादं पिल्लू कुठे सापडतंय का हे लक्ष ठेवायला लागलो. आणि तुम्हाला सांगतो, गेल्या दोन वर्षात आम्हाला आमच्या नेहेमी येण्या-जाण्याच्या मार्गावर एकही कुत्र्याचं पिलू सापडलेलं नाही. एरवी बरीच दिसतात, पण हवं तेंव्हा एकही नाही, ही प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येकाला अनुभवायला येणारी गोष्ट. पण दोन वर्षांत एकही पिलू दिसू नये ही गोष्ट मात्र मला खटकली आणि असं का व्हावं याचा शोध माझं शंकेखोर मन घेऊ लागलं आणि त्यामागचं जे सत्य मला उमगलं ते फार भयानक आहे, चीड आणणारं आहे आणि स्वत:ला ‘विचार’ करणारा प्राणी म्हणवून घेण्यास, लाज आणणारंही आहे..
गावठी भटके कुत्रे बरेच दिसायचे पण पिल्लं नाही म्हणून माझ्या परिसरात आजुबाजूच्या लोकांकडे चवकशी केली तेंव्हा कळलं, की एकीयातल्या यच्चयावत सर्वच कुत्रा-कुत्रींचं महानगरपालिकेनं ‘निर्बिजीकरण’ केलंय. म्हणजे त्यांची पुढील पिढी वाढवायची क्षमता आणि शक्यताच माणूस नांवाच्या प्राण्याने काढून टाकलीय. अश्या शस्त्रक्रिया केलेल्या कुत्रा-कुत्रीच्या एका कानाचा एक लहानसा तुकडा, तसं आॅपरेशन केल्याची खुण म्हणून, कापलेला असतो अशी माहिती मिळाली आणि मग मला मी माझ्या कामाच्या निमित्ताने मुंबईत जिथं जिथं जातो, तिथं तिंथं भटक्या कुत्र्यांच्या कानांचं निरिक्षण करू लागलो आणि बहुतेक सर्वच ठिकाणी असेच कान कापलेले कुत्रे मला पाहायला मिळाले..
भटक्या देशी कुत्र्यांची वाढलेली संख्या, त्याचा घरात परदेशी कुत्रे पाळलेल्या साॅफिस्टीकेटेड माणसांना होणारा त्रास आणि ते आपला चावा घेईल याची भिती, याची प्रचंड बोंब मुंबईतील सर्वच उच्चभ्रू माणसांनी मारली होती व इंग्रजी पेपर्सनी त्याला भरपूर प्रसिद्धीही दिली होती हे मला आठवलं. आपली मानसिकताच अशी आहे, की इंग्रजी पेप्रात आलेल्या बातम्या/कैफियतींची नोंद सरकार दरबारी लगेच घेतली जाते, देशी भाषांतल्या पेपर्सची तशी व तेवढी दखल घेतली जात नाही. कुत्रा असा कुणालाही विनाकारण चावायला तो काही माणूस नाही. त्याला संशय आला तरच तो चावण्याइतका हिंसक होतो, तो ही तुम्ही त्याला घाबरून पळालात तरच. एक विषयांतर, कुत्रा, जराही वेडेवाकडे कपडे घातलेला, दाढी-मिश्या वाढवलेला, अगदी नेहेमीचा माणूस दिसला तरीही, त्याच्यावर तो भुंकतोच. तो खरं तर त्या माणसाला ‘ओळख पटवून दे’ आणि हेतू स्पष्ट कर असं सांगत असतो आणि आपण मात्र उगाच घाबरतो, असं मला वाटतं. स्वत: सदासर्वकाळ नागडा असलेला कुत्र्या त्या माणसाला नीट कपडे घाल, माणसासारखा राहा असं सांगतोय आणि आपण मात्र तो रागाने भुंकतोय असं समजत असतो असं मला कायम वाटतं..
असो. पेप्रात बोंबाबोंब झाल्यावर मग महानगरपालिकेंने रस्त्यावरचे कुत्रे पकडून मारायचं सत्र अवलंबलं आणि त्याला प्राणिमित्रांनी विरोध केला. असं कुठल्याही जीवाची, कोणत्याही कारणासाठी अशी सरसकट कत्तल करणं ‘अमाणूस’ असूनही माणूस तसं बिनदिक्कत करत आलाय. या कत्तलीवरही बराच गदारोळ झाल्यानंतर कुत्र्यांचं निर्बिजीकरण करण्याची सुपिक आयडीया, कुणाच्यातरी कमी कसाचं तेवढंच पिकवणाऱ्या डोक्यात आली आणि तेवढ्याच निर्बुद्धपणाणं ते गेल्या दोन-तिन वर्षांपासून अंमलातही आणलं जातंय.
एकेकाळी जागोजागी बक्कळ दिसणारी भटक्या, देशी कुत्र्यांची बालप्रजा का दिसेनासी झाली याचं हे असं कारण आहे. असंच चालू राहीलं तर येत्या पाच-दहा वर्षांत मुंबईत कुत्रा हा दुर्मिळ प्राणी होईल असं समजण्यास हरकत नाही. त्या पुढच्या आणखी काही वर्षांत तो देशातही दुर्मिळ होऊ शकतो, कारण मुंबईच्या कोणत्याही ‘फयाशन’ची निर्बुद्ध काॅपी सर्वच देशभरात होत असते. मला वाटणारी भिती आणि चीड म्हणतो, ती हिच.
भटक्या कुत्र्यांचं असं सरसकट निर्बिजीकरण असं बिनडोकपणे होऊ नये असं मला वाटतं. त्यापेक्षा ते नियंत्रीत असावं. कुत्रीचं किमान एक बाळंतपण होऊ द्यावं व नंतर तिला इनफर्टाईल करायला हरकत नाही. कुत्रा हा ही मर्यादित का असेना पण भावना असलेला जिवंत प्राणी आहे. कुत्र्याच्यी मादीलाही माणसाच्या मादीप्रमाणे मातृत्वाची आस असू शकते. आपला वंश पुढे चालवण्याची जबाबदारी निसर्गाने सर्वच सजिवांवर टाकली आहे, तशा भावना त्या त्या सजिवात नेसर्गिकपणे भरलेल्याही आहेत याला कुत्री कशी अपवाद असेल? म्हणून तिच्या या अबोल नैसर्गिक उर्मींची पूर्तता होण्यासाठी किमान एकदा तिला पिलं होऊ द्यावीत. अशाने कुत्र्याची वीण पुढे चालू राहील व इतर काही प्राण्यांसारखा तो दुर्मिळ व पुढे नामशेष होणार नाही..पण फक्त आपल्यालाच जगायचा अधिकार आहे हे समजणारा माणूस, हे काय समजणार..!
कुत्र्याच्या निर्बिजीकरणाची आणखी एक अध्यात्मिक बाजू आहे. आपल्या धर्म शास्त्रसमजूतीनुसार आत्मा कधीच मरत नाही, तर तो त्याच्या पूर्वीच्या शरीरातून बाहेर पडून पुन्हा त्याच्या पूर्वनियोजीत योनीनुसार त्या त्या योनीत प्रवेश करतो. म्हणजे जे आत्मे कुत्र्याच्या योनीत प्रवेश करण्यासाठी आपल्या बॅगा भरून तयार असतील, त्यांना त्या योनीच्या निर्बीजीकरणामुळे कुत्र्याच्या योनीत प्रवेशच करता येणार नाही आणि मग ते परमेश्वराकडे दुसऱ्या योनीत प्रवेश देण्यासाठी अर्ज करतील. माणसांने स्वत:ला सोडून इतर सर्वांनाच दुर्मिळ किंवा नामशेष केलेलं असल्यानं परमेश्वराला, कुत्रा योनीत येऊ इच्छीणाऱ्या आत्म्याना, मनुष्य योनीत पाठवण्याशिवाय गत्यंतर राहीलं नसावं. म्हणून कुत्र्यांच्या (आणि इतर प्राणीही. इथं विषय कुत्र्यांचा असल्यामुळे मी कुत्रे म्हणतोय.) पोटी येऊ इच्छीणारे आत्मे, त्यांच्या मनाविरुद्ध माणसाच्या पोटी आले असावेत हे माणसांच्या भरमसाठ वाढलेल्या संख्येवरनं वाटतं.
कुत्र्याचा आत्मा इमानीच असणार. पण तो मनुष्य योनीत शिरल्यावर त्यात स्वार्थी मनुष्यात्म्याचे अवगुण मिसळून, तो फक्त स्वार्थाशीच इमानी राहाणारा झाला असावा असं मानण्यास जागा आहे. कुत्र्याचा सकारण चावा घेण्याचा गुणधर्म, माणसात दुसऱ्यास विनाकारण चावा घेण्यात बदलला असावा, असंही समजायला हरकत नाही. आणि कुठल्याही मुंबैकराला विचारा, मुंबईतलं आमचं जीवन कुत्र्यासारखं झालंय, तुम्हाला हेच उत्तर मिळेल. या उत्तराचं मुळ या कुत्र्याच्या आत्म्याचं मनुष्याच्या आत्म्यात शिरण्यातच आहे हे समजण्यास वेळ लागणार नाही. आम्ही मुंबैकर आहार, निद्रा, भय, मैथून या पलिकडेही जीवन असतं, हेच विसरलोय, ते कुत्र्याच्या आत्म्याच्या माणसात झालेल्या प्रवेशामुळेच असावं का?
आता थोडी वेगळी गोष्ट. आमच्या दहिसर पश्चिमेला “बिबळ्या वाघ दत्तक कार्यक्रम” असं ठळकपणे रंगवलेली अक मोठी भिंत दिसते. एका राजकीय पक्षाचा हा कार्यक्रम आहे असं ते वाचून कळतं. उपक्रम खुप चांगला आहे, पण बिबळ्या वाघाला दत्तक घेणार म्हणजे ते नक्की काय करणार कळलं नाही. म्हणजे ते वाघाला घरी आणणार, की तेच जंगलात जाऊन त्याला दत्तक घेणार हे नीट समजलं नाही..पण असो, भावना चांगली आहे. हाच उपक्रम भटक्या देशी कुत्र्यांबाबत राबवायला हवा असं मात्र ती जाहिरात पाहून वाटलं..
— नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply