गझल – वृत्त :- आनंदकंद
लगावली :-गागालगा लगागा गागालगा लगागा
डोहात वेदनेच्या ,आनंद शोधतो मी
दु:खातही हसावे,हृदयास सांगतो मी
वेडा म्हणेल कोणी,याची मला न चिंता
गातो नवे तराणे ,तंद्रीत राहतो मी
गेले उडून पक्षी शोधात भाकरीच्या
ओसाड गाव झाले, माणूस मागतो मी
जातीत वाटलेली झाली हवा विषारी
जाती बघून आता संबंध ठेवतो मी
पंथात कोणत्याही भक्ती मला दिसेना
ही जात माणसाची ढोंगीच मानतो मी
गेले निघून माझ्या शब्दातले निखारे
हल्ली नव्या पिढीच्या शब्दास झेलतो मी
© जयवंत वानखडे,कोरपना