“आपल्या आयुष्यात दोन क्षण अतिशय शक्तिशाली असतात. यातील पहिला क्षण आपण जन्माला येतो तो आणि दुसरा आपण जन्माला का आलो, हे कळतं तो..” हे वाक्य आहे केनिया या देशातील एका तरुणाचे. त्याचं नांव बोनिफेस म्वांगी.
खरंच किती खोल अर्थ आहे या वाक्याचा. या दोन दिवसांतील पहिला, म्हणजे जन्माला येण्याचा क्षण आपण सर्वच जिवमात्रांच्या आयुष्यात येतो. आयुष्यात येतो म्हणण्यापेक्षा, या पृथ्वीतलावर जन्माला आलेल्या सर्वांचंच आयुष्य या क्षणापासून सुरू होतं. यात केवळ आपण मनुष्यप्राणीच नसून, प्राणी-पक्षी, जीवजंतू अशी सर्वच सृष्ची येते.
जन्माला येणं, स्वत:च्या आणि आपल्यावर अवलंबून असणाऱ्यांच्या पोट-पाण्याची सोय पाहाणं, आपल्यालारखेच जीव जन्माला घालणं आणि नंतर कधीतरी मरून जाणं, हा जिवनक्रमात मनुष्य आणि कुठलाही प्राणी-पक्षी-जीवजंतू यात फरक नाही. जन्माला आलेल्या मनुष्यासकट प्रत्येक जिवाला भय, आहार, मैथून आणि निद्रा ह्या भावना असतातच. या भावनांच्या संदर्भात मनुष्य आणि प्राणी यात कोणताही फरक नाही.
प्राण्यांपेक्षा मनुष्य वेगळा ठरतो, तो त्याला मिळालेल्या बुद्धीमुळे. मनुष्याला मिळालेल्या बुद्धीच्या जिवावर, मनुष्याने प्राण्यांपेक्षा काहीतरी वेगळं करावं अशी निसर्गाची अपेक्षा असणार;कारण या जगात विनाकारण काहीही मीळत नाही अथवा घडत नाही. परंतू निसर्गाची मनुष्याकडून असलेली अपेक्षा पूर्ण करण्यात मनुष्य खरंच पुरे पडलाय का, हे पाहाणं महत्वाचं ठरतं. वास्तविक मनुष्याला मिळालेल्या बुद्धीच्या वरदानाच्या सहाय्याने मनुष्याने प्राण्यांपेक्षा वेगळं ठरणं, म्हणजे आहार, निद्रा, भय, मैथून या चार विकारांच्या पलिकडे जाऊन, मनुष्यप्राण्यातल्या प्राण्यातून मनुष्य वेगळा करणं अपेक्षित असताना, मनुष्य आपली बुद्धी आहार, निद्रा, भय, मैथून हे जास्तित जास्त कसं मिळवता येईल किॅवा निर्माण करता येईल यासाठीच खर्ची घालताना दिसतो. असं करुन तो प्राण्यांच्याही पेक्षा खालच्या पातळीवर पोहोचतो, कारण या जगातला कोणताही प्राणी गरज नसताना आहार, निद्रा, भय आणि मैथून या चार विकारांना बळी पडत नाही. प्राण्याच्या गरजेपुरतं मिळालं, की तो समाधानी असतो आणि गरजेपुरती सर्वांचीच सोय निसर्गाने (परमेश्वराने म्हटलं तरी हरकत नाही) करुन ठेवलेली आहे. तेवढ्यापुरता संघर्ष सर्वांनाच करावा लागतो.
बुद्धीच्या जोरावर मनुष्याने भयावर नियंत्रण मिळवायचा प्रयत्न केला खरा पण त्याने तो जास्तच भयभित होत गेलेला दिसतो. देशादेशांतूल शस्त्रस्पर्धा कुणाच्या तरी भितीमुळे आणि कुणाला तरी भिवववण्यासाठी होतेय. आहारच्या बाबतीत स्वत:चं आणि स्वत:वर अवलंबून असणाऱ्यांचं पोट भरण्याइतपत मिळवण्यात मनुष्य समाधानी नाही, तर पुढच्या काही पिढ्यांची सोय करण्याच्या नादात त्याने स्वत:ची निद्रा तर गमावलीच, परंतू दुसऱ्याचीही निद्रा हरण केली. माझं ते माझंच आणि दुसऱ्याचंही माझंच हा ओरबाडण्याचा दुर्गुण फक्त या दोन पायाच्या प्राण्यातच दिसतो. या संदर्भात ज्या निसर्गाने त्याला मनुष्यजन्म बहील केला, त्या निसर्गावरच त्याने बलात्कार करण्यास मागेपुढे पाहिलेलं नाही. आणि मैथुनाबद्दल तर न बोलणंच चांगलं. प्राणी आपला वंश वाढावा येवढ्याच मर्यादीत हेतूने मैथुन क्रिया करतात. मनुष्याच्या बुद्धीने त्या क्रियेत आनंद शोधला आणि त्यात आनंद आहे ही. मात्र मैथुनातील या आनंदाच्या शोधात नितीमत्ता मात्र पार सोडली ह्याची उदाहरणं आपल्याच आजुबाजूला दिसतील.
जगभरातील धर्मांच्या संकल्पनेचा उगम प्राणी जिवन जगणाऱ्या मनुष्याच्या आहार, निद्रा, भय, मैथून या विकारांचं नियमन करावं या हेतून झालेला आहे. मात्र त्याच धर्मांचा आधार घेऊन हे विकार आणखी कसे बळावतील याचा विचार करण्यासाठी मनुष्याने आपली बहुमोल आणि बहुप्रसवा बुद्धी खर्ची घातली आणि या खटाटोपात आपण जन्माला कशाला आलोय, हेच तो पार विसरला.
खुप कमी लोकांना आपला जन्म कशासाठी झालाय हे उमगलं, बाकी बहुसंख्य मात्र अद्याप प्राणी पातळीवर किंवा त्या पातळीच्याही खाली जायच्या प्रयत्नात असताना दिसतात. आपल्या देशापुरतं बोलायचं झालं तर, ज्ञानेश्वरादी संताना हे माहित झालं, शिवाजी महाराजांना समजलं, गुरुनानक-कबिरांना कळलं, विवेकानंदाना उमगलं आणि अलिकडच्या बाबा आमट्यांनाही याचा साक्षात्कार झाला. आणखीही काही, परंतू बोटांवर मोजता येतील इतकी आणि तितकीच नांव सापडतील, पण ते तेवढेच ज्यांनी मनुष्यातून प्राणीतत्व वेगळं काढायचा प्रयत्न केला. अगदी यांच्याएवढं महान कार्य करायची काहीच गरज नाही, प्रत्येकानं आपल्या आजुबाजुचं जग जरी सुंदर करायचा प्रयत्न केला, तरी तो दुसरा क्षण बऱ्यापैकी साध्य झाल्यासारखा होईल.
आपण जन्माला का आलो, याचं उत्तर ज्या क्षणी आपल्याला सापडेल, त्याच क्षणापासून आपण मनुष्य म्हणून जगायला पात्र ठरु. हा क्षण कधीही येऊ शकतो, त्य क्षणाला शोधण्याची उर्मी मात्र अंत:करणापासुनची हवी. हा क्षण आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात कधीना कधी येतोच, पण तो आल्याचं कळत नाही या पेक्षा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो हे अधिक खरं..तो क्षण जर आपण पकडायला यशस्वी ठरलो, तर मात्र हे जग आणि जगणं अधिक सुंदर होईल यात शंका नाही..!
पाहुया, आपल्याला शक्तिशाली बनवणारा तो क्षण आपल्याला पकडता येतो का ते..!!
— ©️ नितीन साळुंखे
9321811091
२५.०५.२०१८
Leave a Reply