अवघड मार्ग आणि अनवट वाटांवरुन द-याखो-यात भटकणारऱ्या गिर्यारोहकानी गिर्यारोहणाबरोरच आपली समाजसेवेची आवड जोपासत महाड तालुक्यातील दरडगस्त सह्याद्रीवाडीत इमारती विना शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या नव्या इमारतीचा आसरा दिला आहे.डोंगरातील या नव्या शाळेचे लोकार्पण देखील झाले.आता दुर्गम भागातील शाळेत शिकणारी हि मुलं आनंदाने आपल्या शाळेत दाखल झाली.कधी सह्याद्रीवाडीत गेलात तर डोंगरातील हे ज्ञानमंदिर पाहता येईल.
डोंगर द-याखो-या तुडवत, गड किल्ले आणि निसर्गाचा आस्वाद घेणारे गिर्यारोहक केवळ स्वतःचीच गिर्यारोहणाची आवड जोपासतात असे नाही. तर समाजातील उपेक्षितांच्या मदतीला देखील तितक्यात तडफेने धावत असतात .याचे उदाहरण म्हणजे महाड तालुक्यातील दरडगस्त सह्याद्री वाडीची शाळा. ट्रेकिंगचे नवनवीन मार्ग शोधण्याकडे गिर्यारोहकांचा नेहमीच कल असतो. अशाच प्रकारे निसर्गामध्ये भटकणारे गिर्यारोहक महाड मध्ये गतवर्षी 22 जुलैला झालेल्या निसर्ग प्रकोपामुळे व्यथित झाले होते. पुराचा फटका बसलेली गावे, दरडग्रस्त गावे या ठिकाणी विविध संस्था मदत करत होत्या.अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ, गिर्यारोहण क्षेत्रातील शिखर संस्था ही देखील यात मागे नव्हती. रेशनचे किट, इतर जीवनावश्यक वस्तू, पिण्याचे पाणी अशा विविध रूपात मदत महासंघाकडून वाटली जात होती.
तालुक्यातील डोंगराळ भागात असलेली वस्ती देखील आपदग्रस्त होती. तिथे देखील मदत पोहोचवण्याचं काम गिर्यारोहकांनी केले .
शिवथरघळ परिसरामध्ये मदत वाटत असताना सह्याद्रीवाडी या दुर्गम भागातील शिक्षकांशी त्यांची भेट झाली. यावेळी गावातील शाळेसाठी काहीतरी मदत मिळावी अशी कैफियत शिक्षकांनी मांडली.सह्याद्री वाडी हे गाव दरडग्रस्त असल्यामुळे येथील ग्रामस्थ आपल्या मूळ जागेपासून दुसरीकडे स्थलांतरित झाले आहेत . त्यामुळे स्थलांतरीत ठिकाणी एका साध्या शेडमध्ये सध्या शाळा भरत होती..सह्याद्रीवाडी मध्ये एकूण 23 कुटुंब असून चौथीपर्यंत शाळेचा पट 11 आहे. महाड येथील गिर्यारोहक डॉ.राहुल वारंगे व सह्याद्री मित्र या गिर्यारोहण संघटनेने महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना ही गोष्ट सांगितली. आणि डोंगरात वणवण फिरणाऱ्या या गिर्यारोहकांनी डोंगरात नवीन शाळा उभारण्याचे एकमताने निश्चय केला . त्यानंतर अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ अर्थात AMGM चे पदाधिकारी मुंबई, पुणे येथून आले.आणि सरकरी यंत्रणे जवळ संपर्क करुन सह्याद्रीवाडीत नवीन शाळेची इमारत उभारण्याचे ठरवले .या नव्या इमारतीचे भूमिपूजन गतवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर पार पडले आणि पाहतापाहता यावर्षी नवीन शाळा उभीही राहिली.सह्याद्री मित्रचे राहुल वारंगे,शलाका वारंगे,संकेत शिंदे,अमोल वारंगे यांच्यासह इतर सदस्यांनी या दुर्गम भागात आळीपाळींने शाळेच्या बांधकामावर लक्ष ठेवले.सुरुवातीला येथील रस्ताच वाहुन गेल्याने शाळेचे काम पूर्ण करुन घेण्यासाठी हे सर्व सदस्य येथे पायी येत.अखेर त्यांच्या कष्टाचे चीज झाले.सुमारे सात लाख रुपये खर्च करुन येथे ज्ञानमंदिराची उभारणी झाली.या नव्या शाळेचे लोकार्पण चिखलगावचे ज्येष्ठ समाजसेवक व दापोली येथील ‘लोकसाधना’ सेवा संस्थेचे संस्थापक डॉ. राजाभाऊ दांडेकर यांनी केले.गिर्यारोहक महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे, कार्याध्यक्ष हृषिकेश यादव तसेच इतर गिर्यारोहक येथे आवर्जून उपस्थित होते. शाळेची पक्की इमारत नसल्याने झोपडीवजा शाळेत शिकणा-या सह्याद्रीवाडीतील शाळेची मुले या शैक्षणिक वर्षात आता नव्या इमारतीत शिकू लागली आहेत.
— सुनील पाटकर
Leave a Reply