टाळ्यांचा कडकडाट सुरूच होता .
उभं राहून अभिवादन करणारी गर्दी खाली बसत नव्हती .
निवेदक वारंवार विनंती करीत होता , पण गर्दी अनावर झाली होती .
विशेष म्हणजे सगळं व्यासपीठ उभं राहून टाळ्या वाजवत होतं .
– आणि निओफ्लाय व्हीलचेअरवर बसलेला अभिराम , भांबावून गेला होता .
भांबावल्या नजरेनं तो सर्वांकडे पहात होता .
आणि कौतुकभरल्या नजरेनं सगळे त्याच्याकडे पहात होते .
हे सगळं कशासाठी चाललंय , हेच त्याला कळत नव्हतं . अशा सत्काराची , कौतुकाची खरंतर गरज नव्हती . फार मोठं काही केलंय , मोठा डोंगर पालथा घातलाय असंही काही नव्हतं.
मग हे सगळं का ? कशासाठी ?
हाच भुंगा त्याचं डोकं कुरतडत होता .
– सैन्यात जाण्याचं आकर्षण अगदी लहानपणापासून होतं . आणि जाणत्या वयात त्या आकर्षणाला ध्यास लागला तो निरीक्षणाचा , तयारीचा . मिलट्री स्कूल , एन सी सी कॅम्प , पोलीस परेड ग्राऊंडवरच्या परेड , सव्वीस जानेवारीचं दिल्लीतील संचलन… सगळं सगळं डोळे भरून पाहायचा तो . स्वतःला त्या जागी कल्पून परेड करायचा . दहा बाय दहाच्या घरात .
भिंती त्याला हसायचा . फाटके कपडे हसायचे . मोलमजुरी करणारे आई बाबा हसायचे . पण तो सगळ्यांकडे दुर्लक्ष करायचा .
– सगळ्यांकडे दुर्लक्ष करण्याच्या नादात , एके दिवशी रस्त्यावरून चालताना फोर व्हीलरने त्याला उडवलं …
आणि हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळताना त्याच्या लक्षात आलं , आता आपण कायम व्हीलचेअरवर असणार आहोत . आपलं करिअर कायम व्हीलचेअरवर .
नंतरचे त्याचे दिवस पडझडीचे होते .
खंत .
नैराश्य .
परावलंबनाच्या जाणिवेचा मनाला लागलेला भुंगा .
म्हाताऱ्या आईवडिलांचे कष्ट .
अस्वस्थता , त्यातून येणारी पोकळी .
आणि जगण्याचा निरर्थकपणा.
व्हीलचेअरवर बसल्यावर खोलीच्या दारातून दिसणारा आकाशाचा तुकडा आणि आईच्या डोळ्यातून ठिबकणाऱ्या आसवात भिजलेला भाकरीचा तुकडा …
त्याला त्या दोन तुकड्यांची सांगड कशी घालावी हेच उमगत नव्हतं .
पण भाकरीच्या तुकड्यासाठी आकाशाची हाक ऐकायला हवी असं त्याला मनोमन वाटत होतं .
रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांचं निरीक्षण करणं हा त्याचा आता छंदच झाला होता .
कोण काय करतं , जगण्यासाठी कोण कसं धडपडत या सगळ्याचं निरीक्षण करता करता त्याला अचानक जाणीव झाली .
आपण व्हीलचेअर वरून सकाळी , संध्याकाळी घरोघरी पेपर टाकू शकतो .
किंवा व्हीलचेअर वरून चहा विकू शकतो .
किंवा शाळेच्या गेटबाहेर ,
किंवा गार्डनच्या गेटबाहेर गोळ्या , बिस्किट्स विकू शकतो .
किंवा मिनरल वॉटर च्या बाटल्या विकू शकतो .
किंवा हे सगळं वेगवेगळ्या वेळी , वेगवेगळ्या ठिकाणी …
आता त्याला कमालीचा उत्साह आला . आकाशाचा तुकडा हाती आल्याचा भास झाला .
पण पुढच्याच क्षणी तो दाणकन जमिनीवर आला .
हे सगळं करायचं तर हाताशी थोडं तरी भांडवल हवं . वस्तू ठेवता येतील अशी व्हीलचेअर हवी . तिला इंजिन हवं . जरा तरी चांगले कपडे हवेत …
कोण देणार हे ?
मग त्याची फिरंती सुरू झाली . चौकशीसाठी , मदतीसाठी .
बँका , दिव्यांगासाठी साठी असणाऱ्या यंत्रणा …
आपापले राजकीय झेंडे आणि कॅमेरे घेऊन काही राजकीय पक्षसुद्धा पुढे आले .
त्यांचा राजकीय अजेंडा राबवायला सोयीचा माणूस दिसतोय म्हणून .
पण त्याने त्यांना नम्रपणे नकार दिला .
पंधरा वीस दिवस तो वेड लागल्यासारखा फिरत होता .
मग्रूर नोकरशाही , नियमांची बेडी पुढं करून त्याला मदत नाकारणाऱ्या आस्थापना , फिदीफिदी हसणारे समवयस्क आणि खच्चीकरण करणाऱ्या समाजातील नारोशंकराच्या नकारघंटा …स्वाभिमान , बाणेदारपणा यांची पदोपदी कसोटी पाहणारा काळ…
अभिराम पुन्हा हताश झाला .
हतबल झाला .
कोलमडून पडलेला अभिराम उदास होऊन झाडाच्या सावलीत व्हीलचेअर वर बसलेला असताना देवदूत धावून यावा तसा ‘ तो ‘ आला .
‘ त्या ‘ च्या हाती पाण्याची बाटली होती . व्हीलचेअर वरच्या तरुणाला तहान लागली असेल म्हणून ‘ तो ‘ कार मधून उतरून आला होता .
अभिरामने नकार दिला . पण ‘ तो ‘ जिद्दी होता .
‘ त्याने ‘ चौकशी केली , बोलतं केलं .
अभिरामनं सगळं सांगून टाकलं .
” हे बघ मित्रा , मी फार मोठा पैसेवाला नाही , पण तू उभा रहावास म्हणून मी तुला नक्कीच मदत करीन . देवाच्या कृपेनं तेवढा पैसा आहे माझ्याकडे . तुला हवी तशी व्हीलचेअर , कपडे , विक्रीसाठी प्रारंभिक वस्तू सगळं देईन मी , पण एका अटीवर . मी तुला मदत करतो आहे हे कुणाला सांगायचं नाही , माझी जाहिरात करायची नाही , आणि दिलेल्या मदतीची परतफेड करायची नाही . आपली ओळख नाही , पण तरीही मित्र म्हणून आपण आजपासून नवं नातं सुरू करू या , हे माझं कार्ड , उद्या आपण भेटू .”
‘ तो ‘ निघून गेला आणि अभिराम बघत राहिला .
– पुढच्या काही दिवसात त्याला हवी तशी निओफ्लाय व्हीलचेअर मिळाली .
आणि अभिराम चं नवं आयुष्य सुरू झालं .
महिन्याभरानं अभिराम ‘ त्याच्या ‘ ऑफिसात पोहोचला आणि एक हजार रुपये त्याच्या पुढ्यात ठेवले .
‘ तो ‘ बघत बसला.
” हे काय ? हे पैसे मी घेणार नाही . मी मदत केली होती . कर्जाऊ रक्कम दिली नव्हती . मैत्री माणुसकी म्हणून काही आहे की नाही ? …”
अभिरामनं त्याला थांबवलं .
” तुम्ही दिलेल्या मदतीचा मी अपमान करत नाही . ही रक्कम परतफेड म्हणूनही आणली नाही . माझ्या आई बाबांच्या शिकवणुकीचा हा भाग आहे . डोंगरावर पडणारा पाऊस , डोंगर साठवून घेतो आणि मग केव्हातरी झऱ्याच्या रूपाने पाणी बाहेर येतं. ते अनेकांची तहान भागवत असतं . झरा वाहता होतो . पुढे त्याला अनेक झरे येऊन मिळतात . मग त्याची नदी होते . आणि असंख्याना जगवू लागते . मला हेच म्हणायचं आहे . मी आता स्थिरावेन, पण माझ्यासारखे अन्य कुणी असतील त्यांना मदतीची गरज असेल . त्यावेळी तुम्ही त्यांना हे पैसे देऊ शकाल . म्हणून घ्या . नाही म्हणू नका . झरा वाहू लागला आहे , तो असाच पुढं जाऊ द्या . मी दरमहा तुम्हाला पैसे आणून देत जाईन माझ्या कुवतीप्रमाणे .”
‘ त्याला ‘ काही कळायच्या आत अभिराम निघून गेला .
‘ त्याच्या ‘ ऑफिस मधल्या लोकांनी हे सगळं ऐकलं होतं.
ते सोशल मीडियावर कुणीतरी टाकलं . ते खूप व्हायरल झालं .
आणि संवेदनशील संस्था एकत्र येऊन त्यांनी अभिरामच्या सत्काराचा घाट घातला , निःस्वार्थी मदत करणाऱ्या ‘ त्याच्याच ‘ हस्ते .
— अभिराम अजूनही भांबावलेल्या स्थितीत होता .
कुणीतरी त्याच्या हाती माईक आणून दिला . आणि मनोगत व्यक्त करण्याची आग्रहपूर्वक विनंती केली .
“…मला बोलता येतं नाही , पण झरा मात्र माझा आदर्श आहे इतकंच सांगतो . शक्य असेल तर डोंगरातल्या पाण्याचा आदर्श घ्यायला हवा . आपण कृतीतून झरा होऊ या . आपल्याला अनेकजण मदत करतात . मूलभूत गरजा भागवण्यासाठी अनेकजण पुढे येत असतात . समाज , शासन , सेवाभावी संस्था … आपण मात्र आणखी कोण काय काय देतोय याची वाट बघत बसतो . फुकट मिळणारी प्रत्येक गोष्ट आपण स्वीकारत असतो , मग त्याची गरज असो वा नसो . हे चांगल्या माणसाचं लक्षण नाही . त्यापेक्षा मला जेवढं मिळालं आहे , त्यातून गरज भागली की आपण दुसऱ्याची गरज भागवण्यासाठी काहीतरी द्यायला पाहिजे . झरा वाहता असला पाहिजे , म्हणजे सगळ्यांचीच तहान भागेल . मी जे काही केलं ते अत्यंत क्षुल्लक आहे , पण आपण सर्वांनी दखल घेतली यात भरून पावलो मी …”
तो बोलत होता .
प्रेक्षागृहात शांतता पसरली होती .
आणि ती शांतता सर्वांना अंतर्मुख करत होती .
( सत्य घटनेवर आधारित )
डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
९४२३८७५८०६
____
आवडल्यास अभिप्राय द्यालच .
नावासह सर्वत्र पाठवायला हरकत नाही . त्यातून समाज जागृती होऊ शकेल .
Leave a Reply