दूर लोटते ही माती, म्हणून का खिन्न होशी?
तुझी माझी वाटचाल दूर नक्षत्रांच्या देशी
राजहंसाचे कौतुक बगळ्यांनी का करावे?
तुझ्या-माझ्या डोळ्यातील इथे परकेच रावे
स्वर्गभूमीची ही स्वप्ने धरेवरी परदेशी
दीड वितीचे हे जग म्हणायचे ते म्हणू दे
चार काचमण्यांसाठी ऊर फाटेतो धावुदे
नाते आपले जडले आगळ्याच प्राक्तनाशी
तिथे अमृताचा चंद्र रोज चांदणे सांडतो
कल्पवृक्षाच्या तळाशी जीव थोडा विसावतो
लीन होऊनिया येते दुःखसुध्दा उंबऱ्याशी !
–सौ. राजलक्ष्मी देशपांडे
Leave a Reply