नवीन लेखन...

दोष कोणाचा? पालकांचा का मुलांचा !

|| हरी ॐ ||

<दोष कोणाचा? पालकांचा का मुलांचा !

बऱ्याच वृत्तपत्रातून खून, मारमारी, दरोडा, बलात्कार, आत्महत्या, व्यसनाधीनतेने घडणारे अपघात, भ्रष्टाचार तो तर आपल्या पाचवीलाच पुजला आहे आणि बरेच काही वाचायला मिळते आणि आता त्यात भर पडली आहे ती अल्पवयीन तरुणांच्या बातम्यांची. काही दिवसापूर्वी हैद्राबाद शहरातून एक अठरा वर्षाची मुलगी पालकांना न सांगता मुंबईत पळून आली आणि तीने हॉटेलातील सिलिंग फॅनला लटकून आत्महत्या केली. काही अल्पवयीन मुले सिनेमा, टीव्ही मालिकांतील गोष्टी आणि इंटरनेटच्या माध्यमांतून बरेच चांगले/वाईट ज्ञान मिळवत असतात आणि हेच सत्य समजून प्रत्यक्ष जीवनात उतरविण्याचा अयसस्वी प्रयत्न करताना दिसतात. काय झाले आहे मुलांना?

देशातील तरुणाईला आणि विद्यार्थ्यांना चांगल्या आदर्शांची वानवा असावी आणि संस्कारात पालक, शिक्षक आणि समाज कुठेतरी कमी पडतो आहे की काय अश्या संशयाच्या सावटाखाली एकामागोमाग एक भयंकर आणि हृदय हेलावून टाकणाऱ्या घटना घडताना दिसतात आणि मन विषण्ण होते.

अशीच एक घटना पुणे येथे रविवार दिनांक १ एप्रिल २०१२ रोजी घडली ज्याने समाज व्यवस्थेला आव्हान दिले आणि कुटुंब प्रमुखांना शरमेने मान खाली घालायला लावली. पन्नास हजार रुपयांच्या खंडणीसाठी दोन अल्पवयीन मुलांसह तिघांनी आपल्याच मित्राचे अपहरण करून खून केला. टीव्हीवरील गुन्हेगारीविषयक मालिका पाहून हा प्रकार केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. सगळीच मुलं अश्या स्वभावाची असतात असे नाही परंतू त्यांच्यावर पालकांनी बारीक लक्ष देणे गरजेचे आहे. तो कोठे जातो? मित्र कोण? घरात आईकडे किंवा भावाकडे इतर कारणांसाठी पैसे मागतो का? त्याचा हिशोब देतो का? या गोष्टी तपासणे आवश्यक आणि गरजेचे आहे. मला तरी असे वाटत नाही की टीव्हीवरील गुन्हेगारीविषयक मालिका पाहून हा प्रकार करण्यात आला. कारण टीव्हीवर आणि आपल्या आजूबाजूला बऱ्याच चांगल्या गोष्टीही घडतात आणि दिसतात मग त्या का नाही स्वीकारल्याजात? कारण कुठल्याही वाईट सवयी पटकन आत्मसात केल्या जातात आणि चांगल्या सवयी अंगीकारण्यासाठी श्रम, श्रद्धा, सबुरी आणि मेहेनत लागते ती कुठेतरी तरुणाईत कमी पडते असे वरील उदाहरणा वरून वाटते. या घटनेने स्थानिकांना जबरदस्त धक्का बसला आणि मनस्वी दु:ख झाले. चैनीसाठी शॉर्टकर्टने पैसा कमावण्याच्या उद्देशाने दोन अल्पवयीन मुलांनी आपल्याच मित्राचा बळी घेतला. वरील घटनेत कोण कमी पडले? दोष कोणाचा? पालक, शिक्षक, समाजव्यवस्था, संस्कार, कायदे का अजून काही करणे आहेत? मुलांना शिक्षा झाल्याने, ओरडल्याने किंवा मारल्याने हा प्रश्न सुटणार आहे का? त्या निष्पाप मरण पावलेल्या मुलाचे जीवन त्याच्या पालकांना मिळणार आहे का? तर नाही ! पण त्यासाठी मुलांची मानसिकता बदलण्यासाठीची कृती फार आवश्यक आहे आणि त्यासाठी त्यांना समुपदेशनाची व सुसंस्कारांची आवश्यकता आहे आणि ती फक्त पालक, शिक्षक आणि समाजच देऊ शकतो. जसे व्यसनी माणसांना वाईट व्यसन सोडण्यासाठी स्वत:ची सकारात्मक मानसिकता आणि जबरदस्त इच्छाशक्ती असावी लागते आणि वाईट व्यसन मनापासून न करण्याचा स्वत:वरील दृढ विश्वास असावा लागतो तरच वाईट व्यसन सुटू शकते बळजबरीने कुठलीही गोष्ट होऊ शकत नाही. असो.

आज तरुण मुलामुलींची डोकी नेहमीच भडकलेली असतात असे पाहण्यास व अनुभवास मिळते. शाळा व कॉलेजांतून विद्यार्थ्यांचे अतिरेकी वागणे. प्रेयसीवर अॅसिड फेकणे, जाळणे किंवा मारणे असे होताना आपण बघतो. सगळ्या स्पर्धा व अतृप्तीचे कारण अतिरेक व त्याला भक्ती, सेवा, श्रद्धा व सबुरीचा अभाव असेच म्हणावे लागेल. सत्ता, स्पर्धा, हाव आणि अतृप्तइर्षा ही खऱ्या अर्थाने मानवाच्या मनाला अस्वस्थ करत असते. याने मन तापायला लागते. मनात योजिलेल्या सर्व गोष्टी हस्तगत करण्यासाठी मन प्रथम नैतिक आणि मग अनैतिक मार्गाचा अवलंब करते. हे करून सुद्धा काही गोष्टी मिळाल्या नाही तर कोठल्याही थराला जाते (वरील उदा.) व खऱ्या अर्थाने स्पोट होतो. अमर्याद बेछूट जीवन, शांती-तृप्तीचा अभाव, हव्यास, अनावश्यक गरजा, काळापैसा, आत्मप्रौढी या सारखी करणेही याला जबाबदार आहेत. यासाठी बालवयातच चांगले संस्कार मुलाबाळांवर होणे गरजेचे आहे. जन्मताच कोणी दुष्ट, वाईटचालीचा, अवगुणी नसतो पण कुठला मित्र/नातलग/शेजारी चांगला/वाईट हे ओळखण्याचे तंत्र जितके चांगले अवगत तेवढे धोके कमी, संस्कार, आर्थिक परिस्थिती, संधी आणि कुठे नाही/कुठे हो म्हणावे तसेच थांबावे हे माहित असणे याने बऱ्याच चांगल्या गोष्टी जीवनात घडतात. वरील उदाहरणा वरून सर्व पालक आपल्या पाल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलतील व अश्या घटना न घडण्याचा काशोशीने प्रयत्न करतील अशी अशा आहे. सर्व तरुणाईला विशेषत: अल्पवयीन मुलांना चांगले वागण्याची आणि चांगले विचार आत्मसात करण्याची परमेश्वर सदबुद्धी देओ हीच सद्इच्छा…! आणि येणाऱ्या काळात अश्या घटना न होवोत.

<जगदीश पटवर्धन, बोरिवली (प)

— जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..