दैनिक “प्रत्यक्ष”चा नववर्ष विशेषांक, “मी पाहिलेला बापू” पहिल्या पानावरील पूज्य समीरसिंह दत्तोपाध्ये यांचा अग्रलेख मुद्देसूद साधी सरळ भाषा व जीवनाचे ध्येय आणि उद्दिष्ट स्पष्ट करणारे परखड मत, सत्य, प्रेम आणि आनंदाच्या देवयान पंथावर चालणारे आणि कृतीतून व्यक्त करणारे आहे. डॉ.अनिरुद्ध जोशी यांची ओळख परमपूज्य सुचीतदादा यांच्यामुळे कशी झाली व पुढे दोन घरे एकत्र कशी आली आणि एकरूप कशी झाली हे कोणालाच कळले नाही. पूज्य समीरसिंह दत्तोपाध्ये यांच्या अग्रलेखातील एक प्यारा येथे लिहिण्याचा मोह आवरत नाही “लहानपणापासून दादाच्या शब्दाबाहेर जायचे नाही, हा आई-काकांनी मला घालून दिलेला नियम माझ्याकडून सदैव पाळला गेला, ही बापुंचीच कृपा. त्याचबरोबर बापूंच्या शब्दाबाहेर कधी जायचे नाही हा माझ्या दादाचा दृढनिश्चय, म्हणून मग माझ्याकडूनही आपोआपच बापूंच्या शब्दांचे पालन होऊ लागले, ही माझ्या दादाची कृपा” किती सत्य, प्रेम आणि आनंद करुणा व आपुलकी यातून व्यक्त होते ! परमपूज्य सदगुरु बापू नेहमी म्हणतात की कलीयुगात सुद्धा रामायण चालू आहे आणि त्याचा प्रत्यय सद्य रामायणातील भरताचा आदर्श या वाक्यातून व्यक्त होतांना दिसतो.
दैनिक प्रत्यक्षचा नववर्ष विशेषांक दिनांक १ जानेवारीला कधी एकदा हातात पडतो आणि संपूर्ण वाचून काढतो असे झाले होते. कारण दोन दिवस आधी पासूनच दैनिक प्रत्यक्षच्या पहिल्या पानावर त्या बद्दलची माहिती येत होती. आणि या वर्षीचा विषय खुपच निराळा, खूप जिव्हाळ्याचा, सत्य, प्रेम आणि आनंदाचा होता. “मी पाहिलेला बापू” म्हणजे “दुग्धशर्करा योग” आणि तो जुळून आणला होता प्रत्यक्षच्या विशेष कार्यकारी संपादक पूज्य समीरसिंह दत्तोपाध्ये यांनी त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि श्रीराम..!! या निमित्ताने तरी आम्हांला परमपूज्य बापूंचे लहानपण ते सर्वार्थाने मोठेपण असल्याचे मित्र/मैत्रिणींच्या अनुभवाच्या लिखाणांतून वाचायला व वाचतांना अनुभवतोच आहोत की काय असे वाटायला लागले कारण बापूंच्या सहवासात राहून बऱ्याच जणांना लेखन कसे करावे, विषयाची मांडणी कशी करावी, नेमके आणि सुटसुटीत कसे सांगावे ज्यात सर्व मुद्दे येतील याचे बाळकडू त्यांना त्यांच्या सहवासात मिळाले होते याचाही प्रत्यय ठाईठाई वाचतांना येत होता.
रत्नाच्या आकाराचा विचार करून त्यासाठी कोंदण बनविले जाते परंतू येथे डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी नावाच्या हिऱ्याला कोंदणात बसवितांना कोंदणचा आकार बदलावा लागत नाही तर स्वत: हिराच कोंदणाच्या आकाराचा होतो. डॉ. अनिरुद्ध जोशी ह्यांचे बालपण म्हणजे जोश्या, डॉ.अनिरुद्ध धैर्यधर जोशी ते परमपूज्य सदगुरु श्री. अनिरुद्ध बापू हा प्रवास विविध कंगोर्यांनी आणि पैलूंनी भरलेला असल्याचे सर्व लेख वाचतांना लक्षात येते. बहुआयामी हा शब्दसुद्धा जेथे फिका पडतो, आणि सर्व विशेषणे कमी पडतात. पावित्र्य हेच प्रमाण आणि मर्यादेची चौकट अंगी बाणलेल्या डॉ. अनिरुद्ध जोशींचे विविध पैलूंनी भरलेले व्यक्तिमत्व हीच एक मोठी व्याख्या आहे, चौकट आहे, मर्यादा आहे, सत्य, प्रेम व आनंदाने खचाखच भरलेला देवयान पंथ आहे. जीवनाच्या सर्व व्याख्या, पायऱ्या, ध्येय, उद्दिष्ट, आणि मर्यादा येथूनच सुरु होतात असे गर्वाने म्हणावेसे वाटते. || ॐ मन:सामर्थ्यदाता श्री.अनिरुद्धाय नम: ||
काही लेखांचा संक्षिप्त आढावा पुढे घेऊ :
दैनिक मराठा मधून पत्रकारितेची सुरुवात करणारे, आणीबाणीत दैनिक ‘पहारा’ सुरु करणारे, लोकप्रभा आणि संडे इंडियनचे संपादक श्री.प्रदीप वर्मा यांचा ‘बापू’चं वलय…,हा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातून डॉ.अनिरुद्ध जोशी यांची वैचारिक झेप, संघटन कौशल्याबरोबर नवा विचार, नवा दृष्टीकोन देण्याची बौद्धिक क्षमता आणि इतर कार्य बघून ते एकदम अचंबित झाले. डॉ.जोशींनी घडवलेली सुसंस्कृत माणसे जी समाज जीवनात शिस्त निर्माण करणार आहेत आणि या सामाजिक शिस्तीतून उभे राहणार आहे एक राष्ट्र जे जगाचे नेतृत्व तर करेलच पण संपूर्ण मानवजात नष्ट करण्याची ताकद असलेले तिसरे महायुद्धदेखील थोपावेल असा त्यांचा मानस आहे आणि तो खरा आहे.
सौ. पुष्पा त्रिलोकेकर, श्री. प्रदीप वर्मांच्या पत्नी, गेली साडेपाच दशके मुक्त पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पुष्पाताईंचा लेख ‘प्रिय बापू आगाऊपणा करू का थोडा?” वाचतांना खुपच उपयुक्त माहिती देऊन गेला. डॉ.अनिरुद्ध जोशीं हे “रॅशनल” विचारांचा जोडणारा महत्वाचा दुवा असल्यामुळे सौ.पुष्पाताई त्रिलोकेकर डॉ.जोशीशी जगातील कुठल्याही विषयावर बोलत असतं जसे राजकारण, इतिहास, विज्ञान, धर्मसंकृती, मानवीस्वभाव नी व्यवहारपर्यंत, यातूनच डॉ. अनिरुद्धांचे वेगळेपण आणि वाचनाचा व्यासंग ठळकपणे दिसून येतो.
डॉ. डी.वाय.पाटील ज्यांना सामाजिक कार्यासाठी १९९१ साली भारत सरकारने पद्मश्री पुरासाकाराने अन्मानीत केले आणि आत्ताचे त्रिपुरा राज्याचे राज्यपाल. डॉ.अनिरुद्धांच्या कार्याचे वर्णन करतांना म्हणतात “अस्सल आणि सत्यवचन सांगणाऱ्या ज्ञानदेवाप्रमाणे, कंटाळवाणे-किळसवाणे विधी पद्धती श्री.अनिरुद्ध बापुंनीही धुडकावून लावल्याचे माझ्या लक्षात येताच श्री.साईबाबा, श्री.गजानन महाराज, श्री.स्वामी सामर्थ या सर्वांचे एकत्रित दर्शन बापुरुपाने मज घडले” म्हणजेच अंधश्रद्धा निर्मुलन.
श्री.महेश अटाळे, राष्ट्रीय मल्लखांब समितीचे सदस्य, दादरचे समर्थ व्यायाम मंदिर, अंधेरीचे विजयनगर आणि पार्लेश्वर व्यायाम मंदिराचे प्रशिषक, आणि श्री.श्रेयश म्हसकर, मुंबई मल्लखांब असोसिएशनचे सचिव व समर्थ व्यायाम मंदिरात जिमनॅस्टिक आणि मल्लखांबचे शिक्षक. दोघांचे क्रमश: “सोलिड डॉजो” आणि “बापू साहेब” डॉ.अनिरुद्धांवरील लेख खुपकाही सांगून जातात. बापूंना व्यामाची कशी आवड होती ते कसा व्यायाम करीत असतं? आणि त्यात बरोबर त्यांच्या वयक्तिक जीवनात काय अनुभव आले तेही त्यांनी त्या लेखात व्यक्त केले आहेत.
कुठल्याही सर्वसामान्य मुलाचे बालपण ते मुल लहान असताना व्यतीत करतं तसेच डॉ.अनिरुद्ध जोशींचे बालपण आपल्याला त्यांच्या बालपणीचे मित्र/मैत्रीण श्री.सुरेश व स्वप्नजा परब यांच्या लेखातून व्यक्त होते. मित्र/मैत्रीण गरीब-श्रीमंत असो, ढ असो हुशार असो त्यांच्यात त्यांनी कधीही भेदाभेद केला नाही अर्थात त्या वयात एवढी समज सगळ्यांना नसते पण डॉ.जोशींचे विचारच वेगळे होते. त्यांना त्याही वयात खूप चांगली समज आणि उमज होती याचे श्रेय त्यांच्या आई व आजींना जाते. त्या बालवयात त्यांनी डॉ.जोशींच्या बाल मनावर फार चांगले आचार आणि विचार रुजवले आणि ते त्यांनी समर्थपणे पेलले आणि आचरणात आणले.
शालेय तसेच डॉक्टरी शिकत असतानंचे मित्र/मैत्रिणी डॉ.शिरीष दातार, डॉ.केशव नर्सिकर, तसेच शिष्य डॉ.विजय मेहता, डॉ. अनिरुद्ध जोशींच्या नायर हॉस्पिटल मधील सिस्टर सौ.मीरा पुरोहित व दमयंती पवार म्हणतात डॉक्टर साहेब त्यावेळी सर्वांशी हसत खेळत तसेच मोठया शिस्तीचे होते पेशंट व त्यांच्या कुटुंबियांना धीर देत असत. हेही अनुभव खूप काही सांगून जातात. पेशंट त्यांचे नातलग असोत कुणीही भेटले तरी त्यांची विचारपूस करीत त्यांना काही हवं नको याची चौकशी आस्थेने करीत असतं असे प्रत्येक मित्र/मैत्रिणीच्या आठवणींच्या लेखातून प्रगट होताना दिसते. एवढा मोठा एम.डी. डॉक्टर असूनही कधी हुशारी, देखणेपण, रुबाब आणि श्रीमंतीचा गर्व व बडेजाव त्यांच्या वागण्या बोलण्यातून दिसला नाही असे त्यांचे मित्र/मैत्रिणी लिहितात. कुठलाही बेगडी आणि मुखवटे घातलेला डॉ.अनिरुद्ध जोशी त्यांच्या ना बालपणीच्या, त्यानंतरच्या व परमपूज्य सदगुरु बापू झाल्यानंतर त्यांच्या वागण्या-बोलण्यात, स्वभावात आणि प्रत्यक्ष कृतीत कधीही आढळा नाही असे मित्र/मैत्रिणीने त्यांच्या लेखात लिहितात. उलट भेटीत लहानपणाच्या आठवणींना उजाळा देऊन मैत्री अधिक दृढ व घट्ट होत गेली असाच त्यांचा अनुभव आहे.
श्री.रत्नाकर शेट्टी भारतीय क्रिकेट प्रशासनाशी जोडलेलं नाव १९९६, १९९८, २००१ आणि २००३ या वर्षात मुंबई क्रिकेट असोसिएशनचे संयुक्त सचिव म्हणतात “बापूंकडे कुठल्याही प्रकारची सक्ती नसते, हे मला सर्वाधिक आवडलं. तुम्हीं बापूंकडे जाता, त्यांचं दर्शन घेता पण इथे तुमच्यावर कुठल्याही गोष्टी लादल्या जात नाहीत. ही मोकळीक आणि हे स्वातंत्र्य मला अतिशय भावत” “बापूंची अध्यात्मिक चळवळ चुकीच्या समजुती दूर करण्यापासून ते सामाजिक बांधीलकी वाढविण्यापर्यंत अनेक गोष्टी समाजाला देत आहे”. सॉलीसिटर दिव्या शहा सर्वोच्च न्यायालयातील विख्यात आणि निष्णात वकील त्यांना त्यांच्या जीवनात आलेल्या एका अनुभव नंतर सांगताना की “माझ्या मनाशी खुणगाठ पक्की झाली–बापू ही असामान्य शक्ती आहे, सर्वधारण मानवाच्या आवाक्यापलीकडची. त्यांच्या दृष्टीला जे दिसतं, ते कोणा मानवाला दिसण संभवच नाही. त्यांनी ठरवलेल्या गोष्टी घडतातच; त्यांच्या डायनॅमिक वृत्तीमुळे त्यांच्या संकल्पामध्ये कोणीही व काहीही त्यांना आडकाठी, अवरोध करूच शकत नाही” “जेव्हां जेव्हा मी त्यांना पाहतो, त्यांचं स्मरण करतो, तेव्हां तेव्हां मला शांततेचा, सुखद असाच अनुभव येतो आणि ते सैदव माझ्या मदतीला माझ्याबरोबर असतात अस जाणवत राहत”, गीतकार समीर म्हणतात त्यांच्या अलौकिक व्यक्तिमत्वने मी भारावून गेलो, तो एक वेगळा प्रकाश आहे., संगीत क्षेत्रातील फाल्गुनी पाठक म्हणतात की संगीत शिकण्यापेक्षा विविध भाषेतील संगीतकारांची गीते व शास्त्रीय संगीत कसे ऐकावे हे मला बापूंच्यामुळे समजले, मिलिंद गुणाजी एक उत्तम व्यावसाईक नट म्हणतात “मी बापू परिवाराशी संलग्न आहे हे मी माझं भाग्य मानतो”.
या सगळ्यांचे लेख वाचल्यावर मनात एकच एक भाव निर्माण होतो तो म्हणजे डॉ. अनिरुद्ध जोशींना जगातील कुठल्या क्षेत्राची उत्तम जाण, समज, व माहिती नव्हती असे नाही आणि त्यांनी त्यात प्राविण्यही मिळवले होते, बक्षीस मिळवली होती, स्वत: ते सगळ्या कला जगले. डॉ.अनिरुद्ध जोशी हे चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा स्त्रोत, माहेरघर व विद्यापीठ आहेत अशी माझी पक्की खात्री झाली आहे कदाचित अजून काही आपल्या ज्ञात अज्ञात असतील.
एकंदरच सर्व लेख वाचल्या नंतर प्रथम मनात विचार येतो की जोश्या पासून डॉ.अनिरुद्ध जोशी ते परमपूज्य बापू हा प्रवास एक विलक्षण दैवयोग आहे आणि असा सगळ्याच व्यक्तींच्या नशिबी येत नसतो त्यासाठी काहीतरी पूर्व पुण्याई किंवा नियंत्याची योजना असतेचं. त्यांचे लाघवी व्यक्तिमत्व, मर्यादा राखणारा स्वभाव, करारी बाणा, जनमानसावर आईसारखे निर्व्याज प्रेम करण्याची सवय, दुसऱ्याला मदतीला प्रथम धावून जाण्याचे संस्कार, जाती, धर्म, पंथ, लिंग यात त्यांनी कधीच भेदाभेद केला नाही हे सर्व लेखांतून वेळोवेळी प्रगट होतांना दिसते आणि आता परमपूज्य सदगुरु श्री. अनिरुद्ध बापू झाल्यावरही अजून ते सर्वांना आपले श्रद्धावानमित्र व आप्त मानतात. हरि ॐ !
जगदीश पटवर्धन, दादर
Leave a Reply