ज्येष्ठ संगीततज्ज्ञ आणि संगीतकार डॉ. अशोक रानडे यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९३७ रोजी झाला. मुंबईतील विल्सन महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. डॉ. रानडे यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण पं. गजाननराव जोशी, पं. लक्ष्मणराव बोडस आणि प्रा. बी. आर. देवधर यांच्याकडून घेतले.
संगीतशास्त्राचे गाढे विद्वान, अशी ख्याती असलेल्या डॉ. रानडे यांनी भारतीय लोकसंगीत आणि पाश्चिीमात्य शास्त्रीय संगीताचा सखोल अभ्यास केला होता. मुंबई विद्यापीठाच्या संगीत केंद्राचे पहिले संचालक असलेल्या डॉ. रानडे यांनी अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज आणि नॅशनल कौन्सिल फॉर परफॉर्मिंग आर्टस् या संस्थांमध्ये महत्त्वपूर्ण पदे भूषविली होती. डॉ. रानडे यांनी तब्बल १६ वर्षे या पदाची धुरा वाहिली. त्यांना फुलंब्रीकर पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
बडोदा येथील महाराज सयाजीराव विद्यापीठातील टागोर अध्यासनावर त्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांना १९९० मध्ये व्यावसायिक रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. डॉ. रानडे यांनी अनेक विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीत आणि “व्हॉईस कल्चर’चे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले होते. संगीताचे सौंदर्यशास्त्र, लोकसंगीत शास्त्र, ऑन म्युझिक अँड म्युझिशियन्स, स्टेज म्युझिक इन महाराष्ट्र, महाराष्ट्र आर्ट म्युझिक यासारख्या संगीताचं महत्त्व सांगणारी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली.
संगीत क्षेत्रातील विविध प्रवाहांबाबत डॉ. रानडे यांनी सदोदित स्वागतशील भूमिका घेतली होती. त्यांना याच वर्षी संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. डॉ. अशोक रानडे यांचे ३० जुलै २०११ रोजी निधन झाले. डॉ. अशोक रानडे यांनी तब्बल चार दशकांच्या संशोधन-व्यासंगातून ‘पाश्चात्त्य संगीतसंज्ञा कोश’ या कोशाचे काम जवळजवळ पूर्णत्वास नेले होते. मात्र, तो प्रसिद्ध होण्याआधीच त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर त्यांचे शिष्य संगीतज्ञ चैतन्य कुंटे यांनी या कोशाचे संपादन पूर्ण केले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply