प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. भालचंद्र नीळकंठ पुरंदरे यांचा जन्म २७ ऑक्टोबर १९११ रोजी मुंबई येथे झाला.
डॉ.भालचंद्र पुरंदरे यांचे वडील डॉ.नीळकंठ अनंत पुरंदरे प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ होते व त्यांचे गिरगाव चौपाटीला स्वत:चे रुग्णालय होते. डॉ.भालचंद्र पुरंदरे यांना वैद्यकीय शिक्षणाचे बाळकडू घरातच मिळाले होते. साहजिकच, त्यांचा कल प्रसूती व स्त्री-रोगविज्ञानाकडे होता. त्यांचे इंटरसायन्स पर्यंतचे शिक्षण मुंबईच्या विल्सन महाविद्यालयामध्ये झाले. इंटरसायन्सला उत्तम गुण मिळवून मुंबईच्या जी.एस. वैद्यकीय महाविद्यालया मधून ते एम.बी.बी.एस. झाले. हुशार विद्यार्थ्यांत त्यांची गणना असल्यामुळे त्यांना बऱ्याच शिष्यवृत्त्याही मिळाल्या होत्या.
१९३७ साली त्यांना प्रसूति विज्ञान व स्त्री-रोगविज्ञान या विषयांत एम.डी. पदवी मिळाली. १९३९ साली इंग्लंड मधील एडिंबरा येथील रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सची एफ.आर.सी.एस. पदवी मिळाली. मुंबईत परत आल्यावर कॉलेज ऑफ फिजिशियन्स व सर्जन यांची अभिछात्रवृत्ती मिळवून ते एफ.सी.पी.एस. झाले. मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयात १९४१ ते १९४५ स्त्री-रोगशास्त्र व प्रसूतिशास्त्र या विभागात साहाय्यक सन्माननीय विशेषज्ञ म्हणून त्यांनी काम केले. १९५७ साली त्यांनी त्याच विभागाचे प्रमुख म्हणून काम केले.
त्यांच्याच प्रयत्नामुळे प्रसूतिविद्या व कुटुंबनियोजन या विषयाच्या संशोधनाकरिता खास संशोधन केंद्र के.ई.एम.मध्ये स्थापन झाले. डॉ. पुरंदरे त्याचे संचालक होते. त्या केंद्राला त्यांच्या वडिलांचे, डॉ.नीळकंठ अनंत पुरंदरे यांचे नाव दिले गेले.
१९६९ साली निवृत्त होईपर्यंत ते विभागप्रमुख व संशोधन केंद्र संचालक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जननमार्गासंबंधी अनुप्रयुक्त जीवविज्ञानाच्या एम.डी. व पीएचडी. या पदव्युत्तर परीक्षांच्या अभ्यासाची सोय करण्यात आली. ते वाडिया रुग्णालयाचे प्रमुख अधिकारी होते. याशिवाय बॉम्बे रुग्णालय व पश्चिम रेल्वेचे जगजीवनराम रुग्णालय यांचे सन्माननीय विशेषज्ञही होते.
त्यांचे विशेष संशोधन म्हणजे गर्भाच्या खांद्याच्या (अॅ्ण्टिरियर शोल्डर) हालचालीवरून प्रसूतीच्या प्रगतीचा अंदाज घेणे. गर्भाशयाच्या स्खलनाची शस्त्रक्रिया त्यांनी सुधारली. पोटाच्या पुढच्या भागातील स्नायूच्या आवरणाचा (अॅकपोन्युरोसिस) दोरीसारखा उपयोग करून, गर्भाशय या दोरीने वर उचलून पोटाच्या पुढच्या भागाला बांधून ठेवायचे म्हणजे ते खाली घसरणार नाही, असे शस्त्रक्रियेचे स्वरूप असे. या शस्त्रक्रियेनंतर जर स्त्रीला मूल हवे असेल, तर ते होऊ शकेल. प्रसूतीच्या वेळी जर काही कारणास्तव प्रसूती नैसर्गिकरीत्या होत नसेल, तर बाळाच्या डोक्याला इजा न होता प्रसूती होऊ शकेल.
कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया योनिमार्गे करण्याची पद्धत त्यांनी सुरू केली. या पद्धतीत फॅलोपियन बीजवाहिनी योनिमार्गे छोट्या छिद्रातून काढायची व ती दुमडून, तिला टाके मारून पुन: पोटात ठेवायची. या पद्धतीमुळे स्त्रीचे रुग्णालयातील वास्तव्य कमी झाले व नंतर मूल हवे असल्यास ते टाके काढून बीजवाहिनी मोकळ्या करू शकतात. याला ‘पुरंदरे तंत्र’ म्हणतात.
गर्भाशय काही कारणास्तव काढावे लागले, तर डॉ.पुरंदरेंनी ते योनिमार्गे काढण्याची पद्धती चालू केली. यामध्ये कमीतकमी रक्तस्त्राव होतो व पोटावर एरवी होणारा व्रणही होत नाही. या शस्त्रक्रियेसाठी लागणारी उपकरणे त्यांनी स्वत:च तयार केली. ती सर्व त्यांच्याच नावाने प्रसिद्ध आहेत.
डॉ. पुरंदरेंनी कुटुंबनियोजनासाठी विशेष कामगिरी बजावली आहे. गर्भपातविषयक कायद्यासंबंधी नेमलेल्या ‘शांतिलाल शाह समिती’चे ते सभासद होते. डॉ.पुरंदरेंच्या कार्याबद्दल त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार देण्यात आला.
डॉ.पुरंदरेंना अनेक मानसन्मान मिळाले. त्यांतील काही मानसन्मान : अधिष्ठाता- वैद्यकीय विद्याशाखा, मुंबई विद्यापीठ, अध्यक्ष- कॉलेज ऑफ फिजिशियन्स अॅ ण्ड सर्जन्स, मुंबई, सन्मान्य सदस्य- एडिंबरो ऑब्स्टेटिक्स सोसायटी, अध्यक्ष- इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ गायनॅकोलॉजी अॅबण्ड ऑब्स्टेटिक्स, सन्मान्य सदस्य- इंडियन अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेस, अध्यक्ष- इंडियन अकॅडमी ऑफ सायटॉलॉजिस्ट.
स्त्री-रोगविज्ञान व प्रसूतिविद्या या विषयांवर त्यांचे बरेच संशोधन असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकांतून त्यांचे संशोधनपर लेख प्रसिद्ध झालेले आहेत. ते सहलेखक असलेल्या पुस्तकाच्या दहा आवृत्त्या निघाल्या आहेत. त्यांना संगीतात खूप रस होता व ते उत्तम तबलावादक होते. त्यांचे आत्मचरित्रही प्रकाशित झाले आहे.
१० नोव्हेंबर १९९० रोजी डॉ. पुरंदरे यांचे निधन झाले.
– संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ : डॉ.अरूण मांडे, डॉ.शशिकांत प्रधान
Leave a Reply