नवीन लेखन...

पहिली मानवी हृदय-प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया करणारे डॉ. ख्रिश्‍चन बर्नार्ड

डॉ. ख्रिश्‍चन बर्नार्ड यांचा जन्‍म ८ नोव्‍हेंबर १९२२ रोजी दक्षिण आफ्रिकेतील केप प्रांतात ब्‍युफोर्ट वेस्‍ट नावाच्‍या खेड्यात झाला. त्‍यांचे वडील डच मिशनरी होते.

डॉ. ख्रिश्‍चन बर्नार्ड

मिश्रवंशीय लोकांच्‍याबरोबर काम करीत असल्‍यामुळे बाकीच्‍या गौरवर्णियांकडून त्‍यांना दूरच ठेवले जाई. तो काळ दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषी राजवटीचा होता. त्‍यामुळे गौरेतर जनतेसाठी काम करणार्‍या, त्‍यांच्‍यात मिसळणार्‍या गौरवर्णियांना देखील बहिष्‍काराचा सामना करावा लागत असे.

अतिशय गरीब परिस्थितीत लहानाचे मोठे होत असताना बर्नार्ड यांनी कायम उच्‍च शिक्षणाची आस धरली होती. आई-वडील व चार भावंडे, वडिलांचे तुटपुंजे उत्पन्न तरीही सर्व भावंडांनी महाविद्यालीयन शिक्षण पूर्ण केले. याचे श्रेय ते आपल्‍या आईला देतात. आईने आमच्‍यात आत्‍मविश्वास रुजविला. आपण आपल्‍या ध्‍येयाची वाट जर का निर्धारपूर्वक चालत राहिलो तर खात्रीने यश मिळते हा विश्‍वास तिने आम्‍हाला दिला, म्‍हणून आज मी हे यश संपादन करू शकलो;असे ते नेहमी म्‍हणत.

शाळेत असतांना अभ्‍यासाव्‍यतिरिकत खेळांतसुद्धा बर्नार्ड यांनी प्राविण्‍य मिळविले होते. धावण्‍यासाठी बूट घेण्‍याची देखील त्‍यांच्‍याकडे ऐपत नव्‍हती. पण अनवाणी धावून त्‍यांनी स्‍पर्धेत यश मिळविले. शाळेत असतांना टेनिसच्‍या स्‍पर्धेत उसनी घेतलेली रॅकेट व पुठ्ठ्याचा वापर करून बुटातील भोके बुजवून बर्नार्ड यांनी त्‍याही स्‍पर्धेत बक्षीस मिळविले. घरची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की चुलीच्‍या प्रकाशात त्‍यांना अभ्‍यास करावा लागत असे. त्‍याही परिस्थितीत त्‍यांनी प्रथम क्रमांक कधीही सोडला नाही.

१९४६ला त्‍यांनी केप टाऊन विद्यापीठातून वैद्यकीय पदवी मिळविली. त्‍यानंतर दोन वर्षे एका लहान खेड्यात वैद्यकीय सेवा केल्‍यावर परत एकदा केप टाऊन विद्यापीठात उच्‍च शिक्षणासाठी प्रवेश घेतला. पुढे १९५५ मध्‍ये अमेरिकेतील मिनीआपोलिस येथील मिनेसोटा विद्यापीठात डॉ. ओवेन वांगेनस्‍टीन यांच्‍या हाताखाली जनरल सर्जरीतील प्रशिक्षणासाठी ते रुजू झाले. अमेरिकेत पुढील शिक्षण घेण्‍याचे त्‍यांचे स्‍वप्‍न होते. ते अशाप्रकारे पूर्ण तर होणार होते पण पैशाची अडचण येथेही सतावत होतीच. बर्नार्ड यांच्‍याकडे इतके कमी पैसे होते की दोन वेळच्‍या जेवणाची देखील भ्रांत होती. सुरुवातीला त्‍यांनी मिळेल ते काम केले. अगदी गाड्या धुणे, गवत कापणे हीसुद्धा कामे केली.

डॉ. बर्नार्ड जेव्‍हा मिनीआपोलिस येथे आले तेव्‍हा ओपन हार्ट सर्जरीला नुकतीच सुरुवात होत होती. याच क्षेत्रात काम करण्‍याचे त्‍यांनी ठरविले. अमेरिकेतीलच व्‍हर्जिनिया येथील वैद्यकीय महाविद्यालयात पुढील शिक्षण घेऊन दक्षिण आफ्रिकेत शल्‍यविशारद म्‍हणून काम करण्‍याचे त्‍यांनी ठरविले. केप टाऊन येथे परत गेल्‍यावर त्‍यांनी पुढे आणखी काही वर्षे प्राण्‍यांवर प्रायोगिक तत्त्वावर शस्‍त्रक्रिया केल्‍या. त्‍यासाठी त्‍यांनी एक तज्‍ज्ञ शल्‍यविशारदांचा चमू तयार केला. त्‍यात त्‍यांच्‍या भावाचा डॉ. मारीयस बर्नार्ड याचाही समावेश होता. अशी बरीच पूर्वतयारी केल्‍यावर मग १९६७च्‍या डिसेंबर महिन्‍यातील तो ऐतिहासिक दिवस उजाडला व जगातील पहिली हृदय-प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली.

डॉ. बर्नार्ड यांनी केलेली हृदय-प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया यशस्‍वी झाली परंतु दुर्दैवाने १८ दिवसांनंतर न्‍युमोनियामुळे त्‍या रुग्‍णाचे निधन झाले. मानवी हृदयाचे प्रत्‍यारोपण यावर काम चालू होते परंतु अद्यापि मानवी शरीरात हृदयाचे प्रत्‍यारोपण करण्‍यात आले नव्‍हते. डॉ. बर्नार्ड यांनी धाडसीपणे निर्णय घेऊन ही शस्‍त्रक्रिया केली. अशक्‍य वाटणारी गोष्‍ट त्‍यांनी शक्‍यतेच्‍या आवाक्‍यात आणली. या शस्‍त्रक्रियेला जगात उदंड प्रसिद्धी मिळाली व त्‍याचबरोबर डॉ. बर्नार्डही प्रकाशझोतात आले. यानंतर त्‍यांनी दुसरी हृदय-प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रियाफिलिप ब्लायबर्ग या रुग्‍णावर केली. ही गोष्‍ट आहे १९६८च्‍या सुरुवातीची. डॉ. बर्नार्ड यांनी केलेली ही दुसरी हृदय-प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया. या शस्‍त्रक्रियेनंतर ब्लायबर्गला घरी सोडण्‍यात आले व त्‍याला १९ महिने आयुष्‍य मिळाले.

डॉ. ख्रिश्‍चन बर्नार्ड व फिलिप ब्लायबर्ग

पहिली मानवी हृदय-प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया करणारे डॉ. ख्रिश्‍चन बर्नार्ड अशी त्‍यांची ओळख निर्माण झाली असली तरी त्‍यापूर्वी देखील त्‍यांनी महत्त्वाचे संशोधन केले होते.

जन्‍मतःच आतड्यांमध्‍ये असणार्‍या दोषांवर त्‍यांनी काम करण्‍यास सुरुवात केली. त्‍यासाठी त्‍यांनी श्‍वानांवर प्रयोग केले व त्‍यांच्‍या असे निदर्शनास आले की गर्भाला कमी रक्‍तपुरवठा झाला असेल तर जन्‍माला येणार्‍या बाळास संबंधित दोष जन्‍मतःच असतो. त्‍यासाठी शस्‍त्रक्रिया करून आतड्याचा तो हिस्‍सा काढून टाकला तर बाळ वाचते. या पद्धतीने शस्‍त्रक्रिया केल्‍यामुळे केप टाऊन येथील रुग्‍णालयातील दहा नवजात शिशूंचे प्राण वाचले. कालांतराने अमेरिकेत व इंग्‍लंडमध्‍येही सदर पद्धती अवलंबिली गेली.

डॉ. बर्नार्ड १९५५ साली शिष्‍यवृत्ती मिळून दोन वर्षांसाठी अमेरिकेतील मिनेसोटा येथील विद्यापीठात गेले. तेथे ते डॉ. ओवेन वांगेनस्‍टाईन यांच्‍याकडे काम करीत होते. वांगेनस्‍टाईन यांनी त्‍यांना आतड्यांवर अधिक संशोधन करावयास सांगितले. तेथे बर्नार्ड यांचा डॉ. लिलेहाय यांच्‍याशी परिचय झाला. तो ही एक सुदैवी योगायोगच म्‍हणावा लागेल. प्रयोगशाळेत काम करीत असतांना डॉ. बर्नार्डथकवा दूर करण्‍यासाठी विरंगुळा म्‍हणून एक फेरफटका मारावयास जात. त्‍यांच्‍यातील प्रबळ ज्ञानलालसा त्‍यांना आसपास काय काम चालले आहे ते पाहण्‍यास उत्‍सुक करीत असे. त्‍या दरम्‍यान बर्नार्ड यांची व्हिन्‍स गॉट यांच्‍याशी भेट होत असे. गॉट डॉ. लिलेहाय यांच्‍या प्रयोगशाळेत काम करीत. एकदा (१९५६ च्‍या मार्च महिन्‍यात) गॉट यांनी बर्नार्ड यांना डॉ. लिलेहाय यांच्‍याकडे ‘हार्ट-लंग’ मशीन चालविण्‍यासाठी सहाय्य करण्‍यास बोलाविले. त्‍यानंतर बर्नार्ड यांनी वांगेनस्‍टाईन यांच्‍या परवानगीने लिलेहाय यांच्‍याकडे काम करण्‍यास सुरुवात केली. येथेच बर्नार्ड यांची डॉ. नॉर्मन शुमवे यांच्‍याशी ओळख झाली. दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन येथेबर्नार्ड यांनीपहिलीहृदय-प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया केली त्यापूर्वीबर्नार्ड, डॉ. नॉर्मन शुमवे यांच्याकडे स्टॅन्फोर्ड विद्यापीठात काम करीत होते.स्टॅन्फोर्ड विद्यापीठात डॉ. नॉर्मन शुमवे प्राण्यांवरहृदय-प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया करीत. तेव्हा प्रयोगशाळेतबर्नार्ड,डॉ. नॉर्मन शुमवे यांना सहाय्य करीत असत.

अमेरिकेत काम करीत असताना १९५८ साली बर्नार्ड यांना एम.एस. ची पदवी मिळाली. याआधी दक्षिण आफ्रिकेत असतांना त्‍यांनी एम.डी. ची पदवी घेतली होती. १९५८ साली त्‍यांना पी.एच.डी. देखील मिळाली. पी.एच.डी.साठी जन्‍मतःच उद्भवणार्‍या आतड्यांतील विकारांवर त्‍यांनी संशोधन करून प्रबंध लिहिला होता. ही बर्नार्ड यांची दुसरी पी.एच.डी. या आधी दक्षिण आफ्रिकेत असतांना क्षयरोगावर संशोधन करून प्रबंध सादर केला होता व त्‍यांना पी.एच.डी. मिळाली होती.

दक्षिण आफ्रिकेत परत आल्‍यावर ते ग्रुटेशूर रुग्‍णालयात प्रायोगिक शस्‍त्रक्रिया विभागाचे प्रमुख झाले. तसेच केप टाऊन विद्यापीठातही शल्‍यचिकित्‍सा विभागप्रमुख झाले. १९६० मध्‍ये बर्नार्ड यांनी रशिया भेटीवर असतांना डॉ. डेमिखॉव्‍ह यांची भेट घेतली. त्‍यांच्‍या भेटीने बर्नार्ड अतिशय प्रभावित झाले. कालांतराने एका मुलाखती दरम्‍यान त्‍यांनी डेमिखॉव्‍ह बद्दल बोलतांना असे म्‍हंटले आहे की, ‘डेमिखॉव्‍ह हे हृदय व फुफ्फुस प्रत्‍यारोपणाचे जनक आहेत’.

बनॉर्ड यांना आर्थरायटीसचा (rheumatoid arthritis) विकार सतावू फार लवकर अगदी तरुणपणीच सतावू लागला व त्‍यामुळे कालांतराने त्‍यांना शस्‍त्रक्रिया करणे अवघड होऊन बसले. त्‍यामुळे १९८३मध्‍ये ते केप टाऊन मधील शस्‍त्रक्रिया विभागप्रमुख म्‍हणून निवृत्त झाले.

विपुल मानसन्‍मानांनी त्‍यांना गौरविण्‍यात आले. डॉ. ख्रिश्‍चन बर्नार्ड या नावाला एक अनोखे वलय प्राप्‍त झाले. निवृत्तीनंतर त्‍यांनी समाजकार्याला वाहून घेतले. जगभरातील वंचित मुलांच्‍या मदतीसाठी त्‍यांनी ख्रिश्‍चन बर्नार्ड प्रतिष्‍ठानची स्‍थापना केली. निवृत्तीनंतरचा पुष्‍कळसा काळ ते युरोपमधील ऑस्ट्रिया येथे व्‍यतीत करत.

सायप्रस येथे सुट्टीवर असतांना २ सप्‍टेंबर २००१ रोजी डॉ. ख्रिश्‍चन बर्नार्ड यांचे निधन झाले.

— डॉ. हेमंत पाठारे, डॉ अनुराधा मालशे 

 

 

Avatar
About डॉ. हेमंत पाठारे, डॉ अनुराधा मालशे 20 Articles
डॉ. हेमंत पाठारे हृदय-शल्यविशारद आहेत. ते हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (हार्ट-लंग ट्रान्स्प्लांट) करतातच पण त्याशिवाय अशा शस्त्रक्रिया करण्यास उत्सुक शल्यचिकित्सकांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या कामाची चिकित्सा करणे व परीक्षण करणे हे देखील ते करतात. भारतातील विविध शहरांतील हृदयशल्यचिकित्सकांना त्यांच्या शहरात हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण कार्यक्रम सुरु करणे व राबविणे यासाठी डॉ. हेमंत पाठारे प्रशिक्षक व निरीक्षक आहेत. डॉ अनुराधा मालशे इंग्लंडमधील केंब्रीज विद्यापीठातील डॉ. एल. एम. सिंघवी फेलो आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..