दाजी भाटवडेकर मूळचे मुंबईचे. त्यांचा जन्म १५ सप्टेंबर १९२१ रोजी झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात दाजींचे आजोबा मुंबईतील एक प्रख्यात डॉक्टर होते. त्याकाळी त्यांना मुंबईचे महापौरपदही मिळाले होते. त्यांचे घराणे संपन्नत असले तरी घरांत धार्मिक आणि संस्कृती जपणारे वातावरण होते.दर एकादशीला घरात कीर्तन आणि भजनाचा कार्यक्रम होत असे. दर पंधरवड्याला होणार्या असल्या कार्यक्रमातील नाट्याचा आणि कथानकांचा दाजींच्या मनावर खोल परिणाम झाला. ते कीर्तनकार बुबांच्या आवाजाची आणि बोलण्याच्या ढंगाची हुबेहूब नक्कल करीत असत. भरदार आवाजाची देणगी मिळालेल्या दाजींनी संगीत नाटकांत भूमिका करायला सुरुवात केली.
दाजींच्या दुर्दैवाने पुढे मराठी संगीत रंगभूमीला उतरती कळा लागली. संभाषणात नाटकी अभिनिवेशाने बोलण्याच्या जागी वास्तव शैलीने बोलायची पद्धत पडू लागली. मग दाजींनी आपला मोहरा संगीत रंगभूमीकडे वळवला. दाजी स्वतः उच्चशिक्षित आणि संस्कृत नाटकांचे गाढे अभ्यासक असल्याने त्यांना संस्कृत रंगभूमीची चळवळ सुरू करायला फारशी अडचण पडली नाही.. मुंबईच्या ब्राह्मण सभेत त्यांनी १९५० ते १९८० या काळात दर वर्षाला एक नवे संस्कृत नाटक रंगभूमीवर आणले. कालिदास महोत्सवाच्या काळात दाजींनी ’अभिज्ञान शाकुंतल’ या संस्कृत नाटकाचा प्रयोग भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि अन्य सन्माननीय पाहुण्यांच्या उपस्थितीत सादर करून वाहवा मिळवली. संस्कृत नाटकांनाही पुढे प्रेक्षक मिळेनासे झाले. मात्र, ही नाटके सादर करताना काय काय अनुभव आणि अडचणी आल्या यावर दाजींनी लिहिलेला प्रबंध मुंबई विद्यापीठाने स्वीकारून त्यांनी डॉक्टरेट दिली.
दाजींच्या संस्कृत रंगभूमीवरील योगदानाबद्दल भारतरत्न महामहोपाध्याय डॉ. पां. वा. काणे यांनी त्यांच्या एका ग्रंथातील परिशिष्टात खास उल्लेख केला आहे. मराठी रंगभूमीबरोबरच इंग्रजी, संस्कृत आणि हिंदी रंगभूमीवरही त्यांनी काम केले. दाजी भाटवडेकर यांचे २६ डिसेंबर २००६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
दाजी भाटवडेकर यांचा अभिनय असलेली नाटके आणि त्यातील त्यांची भूमिका
एकच प्याला (सुधाकर), कृष्ण द्वीप (हिंदी), दुर्गा (जिवाजीराव), मानापमान (लक्ष्मीधर, विलासधर), मृच्छकटिक (शकार), बॉर्न येस्टरडे (इंग्रजी, दिग्दर्शक – हर्बर्ट मार्शल), भाऊबंदकी (तुळोजी, राघोबा, सखाराम बापू), भावबंधन (घनश्याम, धनेश्वर, मोरू), म्युनिसिपालिटी (पांडोबा), लग्नाची बेडी ( कांचन, गोकर्ण, तिमिर), शारदा ( कांचनशेट, भद्रेश्वर), संशयकल्लोळ (फाल्गुनराव, वैशाखशेठ), सौभद्र (बलराम)
स्वयंवर (रुक्मी).
Leave a Reply