डॉ ऱ्हेन यांनी १८९६ सालात हृदयावर पहिली यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्याआधी तीन वर्षे डॉ विल्यम्स यांनी असेच धाडस करून एका रुग्णाचा जीव वाचविला. डॉ ऱ्हेन यांच्याप्रमाणेच डॉ विल्यम्स यांचेदेखील हृद्य-शल्यचिकित्सेसाठीचे महत्त्वाचे योगदान मानले जाते. अमेरिकेत जेव्हा वर्णभेद मानला जात होता त्या काळात डॉ विल्यम्स यांनी शल्यचिकित्सा व वैद्यकीय उपचार-पद्धतीत भरीव कामगिरी केली.
हृदयाच्या बाह्य आवरणावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्याचे श्रेय डॉ विल्यम्स यांना जाते. १० जुलै १८९३ रोजी जेम्स कॉर्निश या नावाच्या कृष्णवर्णी रुग्णावर डॉ विल्यम्स यांनी शस्त्रक्रिया केली. डॉ विल्यम्स स्वतः कृष्णवर्णी होते. अमेरिकेत कृष्णवर्णी जनतेला जेव्हा समान हक्क प्राप्त झाले नव्हते तेव्हा एका कृष्णवर्णी रुग्णावर यशस्वी हृद्य शस्त्रक्रिया करून डॉ विल्यम्स यांनी इतिहास घडविला असेच म्हटले पाहिजे. डॉ ऱ्हेन यांच्याकडे आलेल्या रुग्णाप्रमाणेच जेम्स कॉर्निशलाही भोसकल्यामुळे जखम झाली होती. बारमध्ये झालेल्या वादावादीचे पर्यवसान भोसकण्यात झाले व जखमी कॉर्निशला प्रॉव्हिडंट रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याआधी दोनच वर्षे डॉ विल्यम्स यांनी प्रॉव्हिडंट रुग्णालयाची मुहूर्तमेढ रोवली होती.
हृदयावर शस्त्रक्रिया करणे अतिशय जोखमीचे व खरेतर प्राणांवर बेतणारेच आहे अशी ठाम समजूत तेव्हा प्रचलित होती. एक्स-रे, अॅनास्थेशिया (रुग्णाला भूल देण्याचे तंत्र), यासारखे आधुनिक वैद्यकशास्त्रातील तंत्रज्ञान अद्यापी पूर्ण विकसित झाले नव्हते. आजच्यासारखी अद्ययावत उपकरणे नव्हती. अशा परिस्थितीत सुद्धा डॉ विल्यम्स यांनी हे धाडस केले. कॉर्निश जेव्हा रुग्णालयात दाखल झाला तेव्हा त्याच्या जखमेतून रक्तस्त्राव होत होता. डॉ विल्यम्सनी त्याच्या छातीला लहानसे छिद्र पाडून त्याच्या धडधडणाऱ्या हृदयाची परीक्षा केली. सुदैवाने जखम त्याच्या हृदयापर्यंत पोहोचली नव्हती. पण एका रोहिणीला बरीच इजा झाली होती. डॉ विल्यम्सनी टाके घालून ती जखम बंद केली. परंतु कॉर्निशच्या हृदयाच्या बाह्य आवरणाला (पेरीकार्डीअम- हृदयाच्या बाहेरील पिशवीसारखे आवरण) बरीच मोठी जखम झाली होती व ते त्यामुळे उसवे होते. डॉ विल्यम्सनी टाके घालून ते ही शिवून पूर्ववत केले. ५१ दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर कॉर्निशला घरी सोडण्यात आले. (या घटनेनंतर तो २० वर्षे जगला)
१८९३ सालातील अमेरिकेतील, शिकागो शहरातील ही घटना हृदयावरील उपचारांसाठी पथदर्शी ठरली. पण एवढ्यावरच या घटनेचे माहात्म्य मर्यादित नाही. डॉ विल्यम्स यांची ही कृती इतरही अनेक कारणांमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरली. या मागचे महत्त्वाचे कारण म्हणजे डॉ विल्यम्स व त्यांचा रुग्ण कॉर्निश दोघेही कृष्णवर्णीय होते व ज्या प्रॉव्हिडंट रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले ते प्रॉव्हिडंट रुग्णालय वर्णभेद न स्वीकारणारे अमेरिकेतील पहिले रुग्णालय होते. त्याची स्थापना देखील डॉ विल्यम्स यांनीच केली होती.
डॅनिएल हेल विल्यम्स (III) यांचा जन्म १८ जानेवारी १८५६मध्ये हॉलीडेजबर्ग येथे झाला. त्यांचे वडील केशकर्तनकार होते. ते नऊ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. दोन मुलगे व पाच मुली अशा सर्वांची भरण-पोषणाची जबाबदारी पेलणे त्यांच्या आईला आवाक्याबाहेर होते. म्हणून तिने मुलांना नातेवाईकांकडे रहाण्यास पाठविले. सुरुवातीला विल्यम्स एका बूट तयार करणाऱ्या माणसाकडे उमेदवारी करीत पण लवकरच त्यांनी तेथून पळ काढला व ते आपल्या आईजवळ वास्तव्यास आले. तेव्हा त्यांची आई रॉक्फोर्ड, इलिनॉय येथे रहात होती. त्यानंतर ते त्यांच्या बहिणीकडे एडगर्टन, विस्कॉन्सीन येथे रहावयास गेले. कालांतराने ते शेजारच्या गावी जॅनसनव्हील येथे रहावयास गेले. तेथे असताना ते तेथील प्रख्यात डॉक्टर हेन्री पामरच्या सहवासात आले. डॉक्टर पामरच्या दवाखान्यात काम करीत असताना त्यांच्या कार्याने प्रभावित झाले व वैद्यकीय शिक्षण घेण्याचे त्यांच्या मनाने पक्के केले.
१८८० मध्ये त्यांनी शिकागो वैद्यकीय महाविद्यालयात (सध्याचे नॉर्थवेस्टर्न विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय) प्रवेश घेतला व तीन वर्षांनी ‘डॉक्टर ऑफ मेडिसीन’ची पदवी मिळविली. पद्वीनंतर त्यांनी शिकागो येथे स्वतःचा दवाखाना काढला. त्याचबरोबर ते महाविद्यालयात शरीरविज्ञानशास्त्राचे अध्यापनही करू लागले. अमेरिकेत तेव्हा वर्णभेद होता व कृष्णवर्णीय व गौरवर्णीय यांना समान हक्क नव्हते. रुग्णालयांमध्येही कृष्णवर्णीय डॉक्टरांना समान कर्मचारी हक्क देण्यात येत नसत. डॉ विल्यम्स यांनी त्यामुळे कोणत्याही रुग्णालयात नोकरी न करता पर्यायाने स्वाकारावा लागणारा दुय्यम दर्जा टाळला. त्याऐवजी ते प्रॉव्हिडंट रुग्णालयाचे सह-संस्थापक झाले. १८८१मध्ये जेव्हा प्रॉव्हिडंट रुग्णालयाची स्थापना करण्यात आली तेव्हा अशी परिस्थिती होती की ७५ लाख आफ्रिकन-अमेरिकन लोकसंख्येसाठी फक्त ९०९ कृष्णवर्णी डॉक्टर होते. कृष्णवर्णीय डॉक्टरांना अतिशय मर्यादित संधी उपलब्ध आहेत या वास्तवाची डॉ विल्यम्स यांना सखेद जाणीव होती. इतकेच नव्हे रुग्णालयात दाखल झालेल्या कृष्णवर्णीय रुग्णांना दुय्यम दर्जाचे उपचार व सापत्नभावाची वागणूक सहन करावी लागत असे हेही सत्य सतत त्यांच्या नजरेसमोर होते. खरेतर शिकागो येथे जेव्हा डॉ विल्यम्स यांनी दवाखाना काढला तेव्हा ते सोडून फक्त तीन कृष्णवर्णीय डॉक्टर शहरात होते. प्रॉव्हिडंट रुग्णालयाची स्थापना करण्यामागे ही सारी पार्श्वभूमी होती. त्यावेळी संपूर्णपणे कृष्णवर्णीय कर्मचार्यांनी चालविलेले प्रॉव्हिडंट हे पहिलेच रुग्णालय ठरले.
१८९१ पासून १९१२ पर्यंत डॉ विल्यम्सच्या मार्गदर्शनाखाली प्रॉव्हिडंट रुग्णालय उत्तम रुग्णसेवेचा मानदंड ठरले. याचे प्रमुख कारण होते, तेथे दाखल झालेल्या रुग्णांपैकी ८७% रुग्ण खडखडीत बरे होऊन घरी जात. आधुनिक वैद्यकशास्त्राची प्रगती होत होती पण त्यामध्ये सुधारणेसाठी तसेच तांत्रिक विकास करण्यासाठी खूप वाव होता, अशा काळात ८७% हा आकडा अद्भुत वाटावा असाच होता.
शिकागो येथे कार्यरत असताना सिटी रेल्वे कंपनी व प्रॉटेस्टंट ऑरफन असायलम (प्रॉटेस्टंट अनाथालय) यांच्यासाठीदेखील डॉ विल्यम्स यांनी काम केले. १८८९ मध्ये इलीनॉय स्टेट बोर्ड ऑफ हेल्थवर (इलीनॉय राज्य आरोग्यविभाग) त्यांची नेमणूक झाली. तेव्हा त्यांनी रुग्णालय व्यवस्थापन व मेडिकल स्टँडर्डचा अभ्यास केला. तेव्हा परत एकदा वर्णभेदाचे वास्तव त्यांच्या दृष्टोत्पत्तीस आले. १८९१च्या मे महिन्यात प्रॉव्हिडंट रुग्णालयाची स्थापना करण्यात आली पण डॉ विल्यम्स एवढ्यावरच थांबले नाहीत. १८९१ला त्यांनी परिचारिकांसाठी ट्रेनिंग स्कूलही स्थापन केले. रेव्हरंड लुईस रेनॉल्ड्स यांच्या भगिनी एमा यांना त्या कृष्णवर्णी असल्यामुळे परिचारिकांच्या प्रशिक्षण संस्थेत प्रवेश नाकारण्यात आला. रेव्हरंड रेनॉल्ड्स डॉ विल्यम्सना भेटले व त्यांनी मदतीसाठी विनंती केली. डॉ विल्यम्सना या भेदाची जाणीव होतीच. त्यांनी नर्सिंग ट्रेनिंग स्कूलचीही उभारणी केली. १८९६सालात स्वयंसेवकांच्या भक्कम पाठींब्यावर रुग्णालयाचा विस्तार करण्यात आला व ६५ खाटांचे नवीन रुग्णालय आकाराला आले. या कालावधीतच मध्यंतरी डॉ विल्यम्सचे स्नेही न्यायमूर्ती वॉल्टर ग्रिशॅम यांनी त्यांना विनंती केली की वॉशिंग्टन डी.सी. येथील फ्रीडमन रुग्णालयात मुख्य-शल्यविशारद पदासाठी डॉ विल्यम्सनी अर्ज करावा. त्यानुसार डॉ विल्यम्स यांनी १८९४ ते १८९८ फ्रीडमन रुग्णालयात मुख्य-शल्यविशारद म्हणून काम पाहिले. तेथे त्यांनी कितीतरी नवीन प्रकल्प सुरू केले. कृष्णवर्णी परिचारिकांसाठी प्रशिक्षण, वर्णभेद बाजूस ठेवून कर्मचाऱ्यांची नेमणूक, रुग्णवाहिका सेवेचा विकास, कृष्णवर्णी कर्मचाऱ्यांसाठी समान संधी असे बरेच प्रकल्प राबविण्याबरोबरच शस्त्रक्रिये- दरम्यानच्या व रुग्णालयात उपचारदरम्यान होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत मोठी घट करून दाखविली.
१८९५ला डॉ विल्यम्स नॅशनल मेडिकल असोसिएशनचे सह-संस्थापक झाले. त्यापूर्वी अमेरिकन मेडिकल असोसिएशन अस्तित्वात होती पण त्यात कृष्णवर्णीय डॉक्टरांना प्रवेश दिला जात नव्हता. १९१३ साली डॉ विल्यम्स अमेरिकन कॉलेज ऑफ सर्जन्सचे पहिले कृष्णवर्णीय सदस्य झाले.
डॉ विल्यम्सचा प्रवास थक्क करणाराच आहे. हृद्य-शल्यचिकित्सेला तर त्यांनी खूप वरच्या प्रतलावर नेऊन ठेवलेच पण आपल्या कारकीर्दीत वैद्यकीय उपचार पद्धतीतील कितीतरी मैलाचे दगड रचले. आधुनिक वैद्यकशास्त्राच्या इतिहासातील डॉ विल्यम्स हे एक सोनेरी पान आहे.
— डॉ हेमंत पाठारे, डॉ अनुराधा मालशे
Leave a Reply