

डॉ. ड्वाईट हार्केन (१९१० ते १९९३)
दुसर्या महायुद्धाच्या काळात बॉम्बस्फोटात श्रापलेनचे तुकडे हृदयात घुसून सैनिक जखमी होत व त्यातच त्यांना प्राण गमवावे लागत. डॉ. हार्केन यांनी अशा सैनिकांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करून त्यांचे प्राण वाचविण्यात यश मिळविले. त्यांनी सुमारे १३० सैनिकांवर अशा प्रकारे शस्त्रक्रिया केल्या. यातील सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे ह्या सर्व १३० शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. आधुनिक उपकरणे जन्माला येण्याच्या आधीच्या काळातील ही कामगिरी हृदयशल्यचिकित्सेच्या क्षेत्रात क्रांती घडविणारीच होती. त्यापूर्वीपर्यंत हृदयावरच्या शस्त्रक्रिया अज्ञातच होत्या. भोसकल्यामुळे झालेली जखम दुरुस्त करून डॉ. लुडविग र्हेन यांनी हृदयशल्यचिकित्सेची एक महत्त्वाची पायरी ओलांडली होती. त्यानंतर हार्केन यांनी तितकेच महत्त्वाचे काम केले. हृदय अतिशय महत्त्वाचा अवयव असल्यामुळे त्यावर शस्त्रक्रिया करणे अत्यंत जोखमीचे होते. शल्यचिकित्सक अशी शस्त्रक्रिया करण्यात कचरत असत व बराच काळ ‘हृदय’ शल्यचिकित्सेच्या परिघाबाहेरच समजले जात होते. परंतु हार्केन यांनी अशक्य वाटणारी गोष्ट साध्य करून दाखविली व हृदयाच्या शल्यचिकित्सेला गती मिळाली.
सैनिकांवर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी हार्केन यांनी प्राण्यांवर प्रयोग करून पाहिले. १९४८च्या दरम्यान हार्केन व फिलाडेल्फिया शहरातील डॉ. चार्ल्स बेली यांनी स्पंदन करीत असलेल्या हृदयावर (beating heart),अरुंद झालेल्या ‘मायट्रल व्हॉल्व्ह’वर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करून अरुंद व्हॉल्व्ह रुंद केला व रक्ताभिसरणाची वाट रुंदावून दिली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली.दोघांनी स्वतंत्रपणे या शस्त्रक्रिया केल्या.
हार्केन जेव्हा शस्त्रक्रिया करीत असत तेव्हा ते हृदयक्रिया न थांबविता एक लहानसे छिद्र हृदयाच्या आवरणाला पाडीत व त्यातून बोट आत सरकवून श्रापलेनचा तुकडा बाहेर काढीत. कालांतराने त्यांनी ही पद्धत अधिक विकसित केली. यास ‘क्लोझ्ड हार्ट शस्त्रक्रिया’ अथवा ‘आंधळी शस्त्रक्रिया’ असे संबोधिले जाई.
१९४८च्या सुमारास अशाच प्रकारची पद्धत, अधिक सुधारणा करून,हार्केन यांनी विकसित केली व हृदयाची झडप थोडी रूंद करण्याची शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली.
दुसर्या महायुद्धानंतर हार्केन यांनी ‘टफ्टस’ विद्यापीठात’ दोन वर्षे अध्यापनाचे काम केले. त्यानंतर ते हार्वर्ड विद्यापीठात, ‘थोरॅसिक सर्जरी’चे प्रमुख म्हणून रुजू झाले व तेथे त्यांनी बावीस वर्षे काम पाहिले.
अमेरिकेतील आयोवा प्रांतातील ओसिओला गावात १९१० मध्ये हार्केन यांचा जन्म झाला. त्यांनी त्यांचे वैद्यकीय शिक्षण हार्वर्ड विद्यापीठातून पूर्ण केले. न्यूयॉर्क मधील ‘बेल व्ह्यू’ रुग्णालयात त्यांनी प्रशिक्षणार्थी म्हणून काम केले. त्यांना ‘न्यूयॉर्क अॅकॅडमी ऑफ फेलोशिप’ ही शिष्यवृत्ती देखील मिळाली. त्या दरम्यान त्यांनी हृदयाला होणार्या जंतुसंसर्गावर (एंडोकार्डायटिस)शल्यचिकित्सेच्या उपायाने रुग्ण बरे करण्यावर काम केले. हृदयाच्या झडपेतील दोष दूर करण्याचे कामव त्याआधी दुसर्या महायुद्धादरम्यान यशस्वी हृदयशस्त्रक्रिया करून शेकडो सैनिकांचे प्राण वाचविले यामुळे त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले. या व्यतिरिक्त हार्केन यांनी आणखी अशी उपचार प्रणाली विकसित करण्यावर भर दिला की ज्याशिवाय आपण आधुनिक वैद्यक व रुग्णसेवेचा विचारही करू शकत नाही. ती उपचार प्रणाली म्हणजे ‘अतिदक्षता विभाग’ (इंटेन्सिव्ह केअर युनिट). १९५१ मध्ये हार्केन यांनी ‘ब्रिगहॅम’ येथे प्रथम ‘अतिदक्षता विभागाची’ सुरुवात केली. केवळ हृदयशस्त्रक्रिया झालेले रुग्णच नव्हे तर इतर आजारांनी ग्रासलेलेअसे कितीतरी रुग्ण कीज्यांच्या जीविताला जंतुसंसर्गाचा धोका असतो अथवा आजाराचे स्वरूप असे असते की सतत लक्ष देणे गरजेचे असते;याव्यतिरिक्त इतरही (हृदयावरील सोडून) शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही काळपर्यंत त्या रुग्णांना सततच्या वैद्यकीय मदतीची गरज असते. अशा रुग्णांना काही काळ ‘अतिदक्षता विभागात’ ठेवण्यात येते. आज आपल्याला ही बाब नेहमीची वाटते पण असा विभाग असावा ही कल्पना हार्केन यांनी प्रथम मांडली. इतकेच नव्हे तर प्रत्यक्षात देखील आणली.
वैद्यकीय मदतीव्यतिरिक्त आजारी व्यक्तीला मनोधैर्याची सुद्धा गरज असते. डॉ. हार्केन यांनी हेओळखले. सुरुवातीला त्यांनी त्यांच्याकडे दाखल झालेल्या, हृदयरोगाने ग्रस्त असलेल्या चार रुग्णांचा एक गट तयार केला. त्यांच्या एकमेकांबरोबर असण्याने ताण हलका होण्यास मदत झाली. थोड्याच कालावधीत या प्रयत्नाला प्रचंड यश मिळाले. या संकल्पनेतून‘मेंडेड हार्टस्’ (बरा झालेला हृदयविकार) या संस्थेचा जन्म झाला. आज संपूर्ण विश्वात या संस्थेचे लाखो सदस्य आहेत.
डॉ. हार्केन हृदयविकार बरा करण्यासाठी सतत वेगवेगळे प्रयोग करीत. त्यामध्ये १९६० मध्ये त्यांनी शरिराच्या आत बसविता येईल असा ‘पेसमेकर’ विकसित केला. तसेच हृदयाचे स्पंदन-रक्ताभिसरणाचे कार्य अव्याहत चालू राहावे- म्हणून एक उपकरण, जे शरिरात बसविता येईल, विकसित केले.
तंबाखूचे सेवन व धूम्रपान यामुळे कर्करोगास निमंत्रण मिळते, त्यामुळे या दोन्ही गोष्टींपासून लांब राहण्याचे ते आवाहन करीत. ‘अॅक्शन ऑन स्मोकिंग अॅण्ड हेल्थ’ (धूम्रपानास नकार देऊन आरोग्य राखणे) या चळवळीचे डॉ. हार्केन सह-संस्थापक होते.
हृदयविकाराची व निगडित उपचारांची माहिती देणार्या‘हार्ट हाऊस’ची स्थापना करण्यात हार्केन यांचा मोलाचा सहभाग होता. सध्या ‘अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी’चे ‘हार्ट हाऊस’ हे मुख्यालय आहे. हार्केन यांनी ‘अमेरिकन बोर्ड ऑफ थोरॅसिक सर्जरी’ची स्थापना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
उपचार व निदान या बरोबरच अध्यापन हा देखील हार्केन यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांनी २०० पेक्षा अधिक शोधनिबंध लिहिले वा संपादित केले, पुस्तके लिहिली व संपादित देखील केली. आठपेक्षा जास्त नियतकालिकांच्या संपादक मंडळांवर सदस्य म्हणून काम केले. हृदयशल्यचिकित्सेला सुलभ करून ती आधुनिक वैद्यकाचा महत्त्वाचा हिस्सा बनविण्यात हार्केन यांचा मोलाचा वाटा आहे. अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया राज्यात एका महत्त्वाच्या रस्त्यावर (हायवे) डॉ. हार्केन यांच्या स्मरणार्थ एक शिला बसविण्यात आली आहे.
— डॉ. हेमंत पाठारे,डॉ. अनुराधा मालशे
Leave a Reply