डॉ.गंगाधर पानतावणे यांचा जन्म २८ जून १९३७ रोजी नागपूर येथे झाला.
गंगाधर पानतावणे हे मूळचे विदर्भातले. डी.सी. मिशन स्कूल येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले तर नवयुग विद्यालय आणि पटवर्धन हायस्कूल नागपूर येथे माध्यमिक शिक्षण झाले. १९५६ साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नागपूर महाविद्यालयातून त्यांनी बी. ए. आणि एम. ए. ची पदवी मिळवली. मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी पी. एच. डी. ची पदवीही मिळवली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले होते.
डॉ. गंगाधर पानतावणे यांनी २००९ साली अमेरिकेतील सान होजे येथे झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. दलित साहित्याचा त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यामुळे त्यांनी केलेले बरेचसे लेखन हे दलित साहित्याच्या अनुषंगाने असेच आहे. त्यापैकी `धम्मचर्चा` `मूल्यवेध`, मुकनायक, विदोहाचे पाणी पेटले आहे, वादळाचे वंशज, दलित वैचारिक वाड्गमय, किल्ले पन्हाळा ते किल्ले् विशाळगड, साहित्य, प्रकृती आणि प्रवृत्ती, साहित्य शोध आणि संवाद हे सर्व ग्रंथ वैचारिक आणि समीक्षात्मक असे आहे. अस्तितादर्श` या नियतकालिकाच्या संपादकपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारीही त्यांनी घेतली होती. तसेच दलित आत्मकथा, दलित साहित्य, चर्चा आणि चिंतन, लोकरंग, स्त्री आत्मकथन, महारांचा सांस्कृतिक इतिहास हे त्यांनी संपादन केलेले काही ग्रंथ. चळवळीला वैचारिक अधिष्ठान देणारे नियतकालिका म्हणून अस्मितादर्शकडे पाहिले जाते.
डॉ. गंगाधर पानतावणे यांचे निधन २७ मार्च २०१८ रोजी झाले.
Leave a Reply