कवी, नाटककार, कादंबरीकार, समीक्षक, विचारक, प्राध्यापक,म्हैसूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. कुप्पलि वेंकटप्पा पुटप्पा यांचा जन्म २९ डिसेंबर १९०४ रोजी झाला. महाकवी, राष्ट्रकवी, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, तत्त्वचिंतक, समीक्षक, विज्ञाननिष्ठ अशा अनेक अंगांनी कुवेंपु यांचा कन्नड साहित्य आणि कर्नाटकावर प्रभाव पडलेला दिसून येतो.
कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्य़ातील तीर्थहळ्ळी तालुक्यातील माळेनाड क्षेत्रातील कुप्पळ्ळा गावी एका प्रतिष्ठित, सुसंस्कृत कन्नड भाषिक घरात त्यांचा जन्म झाला. पुटप्पांचे व्यक्तिमत्त्व देखणे, प्रभावी होते. राहते घर, भरपूर शेतीवाडी, अशा सधन, समृद्ध कुटुंबात त्यांचा जन्म झाला. १९१८ मध्ये हायस्कूलच्या शिक्षणासाठी ते म्हैसूरला आले. या शहरी वातावरणात, शाळेपेक्षा ते सार्वजनिक वाचनालयातच जास्त वेळ रमत. इंग्रजी वाचनाने ते विलक्षण प्रभावित झाले. या काळातच त्यांनी शेक्सपीअरपासून टॉलस्टॉयपर्यंत, सगळ्या महान साहित्यकारांच्या साहित्याचे पारायण केले. रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद यांच्या जीवनाचाही परिचय झाला.
वर्डस्वर्थ हा त्यांचा आवडता कवी. याच शालेय वर्षांमध्ये ‘कुवेंपु’ यांनी इंग्रजीत काव्यरचना करायला सुरुवात केली. इंग्रजीबरोबर कन्नड साहित्याचे अनेक ग्रंथ त्यांनी वाचायला सुरुवात केली. व्यासांचे ‘महाभारत’ त्यांच्या अत्यंत आवडीचे महाकाव्य होते. शालेय शिक्षणानंतर त्यांनी ऐच्छिक विषय म्हणून ‘विज्ञान’ घेतले आणि ‘तत्त्वज्ञान’ विषयात बी.ए. केले. एम.ए. झाल्यावर म्हैसूर विद्यापीठात ते कन्नड शिकवू लागले. १९५५-५६ मध्ये ते महाराजा कॉलेजचे प्राचार्य होते. १९५६-६० या कालावधीत ते म्हैसूर विद्यापीठाचे कुलगुरू होते. या सर्व शैक्षणिक प्रवासात त्यांचे काव्यलेखन सुरू होते.
भारतीय ज्ञानपीठाचा १९६७ चा सर्वश्रेष्ठ साहित्य पुरस्कार डॉ. कुप्पलि वेंकटप्पा पुटप्पा यांना त्यांच्या ‘श्रीरामायण दर्शनम्’ या कन्नड महाकाव्यासाठी प्रदान करण्यात आला होता. १९३५ ते १९६० या कालावधीत भारतीय भाषेतील प्रकाशित सर्जनात्मक साहित्यातील सर्वश्रेष्ठ साहित्यकृतीबद्दल देण्यात आला. १९६७चा ज्ञानपीठ पुरस्कार, गुजराती लेखक उमाशंकर जोशी यांच्यासह विभागून देण्यात आला होता. कुप्पलि वेंकटप्पा पुटप्पा यांचे ११ नोव्हेंबर १९९४ साली निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट