डॉ. मोहंमद शकील जाफरी आणि माझी पहिली प्रत्यक्ष भेट यंदाच्या दिवाळी अंकांच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या कार्यालयात झाली. त्यापूर्वी आम्ही भेटल्याचे आम्हा दोघांनाही फुसटसेच आठवत होते. मी आमच्या मासिक साहित्य उपेक्षितांचे दीपावली विशेषांक 2015 ची प्रत त्यांना दिली. तशा मी माझ्या मासिकाच्या प्रती मला नव्याने भेटणार्या व्यक्तींना देत असतो पण अंक वाचून झाल्यावर त्याबद्दल स्वतःहून प्रतिक्रिया देणारे क्वचितच भेटतात. डॉ. मोहंमद शकील जाफरी यांनी दूसर्याच दिवशी मला फोन करून आमच्या दिवाळी अंकाबद्दलचे त्यांचे विचार मांडले पण सुचना केल्या नाहीत. मी त्यांना आमच्या मासिकासाठी साहित्य पाठविण्याची विनंती केली ती त्यांनी आनंदाने मान्य केली. त्यानंतर फेसबुकच्या माध्यमातून आमचा संवाद सुरू झाला आणि मला डॉ. मोहंमद शकील जाफरी हा देवमाणूस उलगडत गेला. सध्या ते पुण्यातील मंचर येथे वास्तव्यास असल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष भेटणे शक्य होत नव्हते. पण आमच्या पहिल्याच भेटीत मी त्यांना कधी मुंबईला आल्यास आपण भेटू आणि चर्चा करू असं म्ह्टल होतं.
काही दिवसापूर्वी मला त्यांचा अचानक फोन आला. ते मला म्हणाले मी घाटकोपरला आहे भेटूया का ? मी लगेच हो म्हणालो. मला भेटण्यासाठी म्हणून ते गोरेगांवला आले ठरल्या वेळेवर पण मलाच आर्धातास उशिर झाला माझ्या स्वभावानुसार त्याबद्दलची यकिंचितही चिडचिड मला त्यांच्या चेहर्यावर दिसली नाही. चहा पिता-पिता आमच्यात चर्चा रंगली आणि मला आपण एका देवमाणसासोबत चहा पित आहोत याचा आनंद झाला. सामाजिक कार्यासाठी त्यांना मिळालेले 150 हून अधिक पुरस्कार ही त्यांच्या सामाजिक कामाची पोचपावती होती. मनात असेल तर एक व्यक्तीही समाज कार्य करू शकते हे दाखविणारे ते एक जीवंत उदाहरण आहेत. हिंदी आणि उर्दू या भाषांवर प्रभूत्व असणार्या या अमराठी माणसाचे मराठी संत साहित्यावर असणारे प्रेम आणि मराठी साहित्याचे ज्ञान पाहून मी नतमस्तक झालो. डॉ. मोहंमद शकील जाफरी यांच्यासारखी स्वतःच्या व्यक्तीगत सुख-दुःखाचा विचार न करता इतरांसाठी जगणारी माणसे या जगात फार कमी असतात. त्यांनी आमच्या मासिकासाठी पाठविलेल्या कविता वाचूनच मला वाटले होते या माणसाला आपण पुन्हा भेटायला हवे शक्य होईल तेंव्हा ! त्यांच्या कविता समाजमनाच्या काळ्जात हात घालतात आणि आमच्या कविता काळजाला उब देतात. प्रत्येक कवीचं प्रतिबिंबच त्याच्या कवीतीतून छळकत असतं. डॉ. मोहंमद शकील जाफरी यांच्या कविता वाचता क्षणी हा माणूस समाजसेवक असणार याची जाणिव होते. मी कविता लिहतो पण त्यात रमत नाही म्हणूनच मी इतरांच्या कवीता मनापासून वाचून पचवू शकतो.
आमच्या भेटीत डॉ. मोहंमद शकील जाफरी यांनी मला त्यांचा ‘हे प्रेषिता’ हा सनय प्रकाशनाने प्रकाशित केलेला कवितासंग्रह भेट म्हणून दिला. माझ्या सवयी प्रमाणे मी त्यांना म्ह्णालो हा वाचून मी याबद्दल नक्कीच लिहीण. कोणत्याही कवितासंग्रहातील मनोगत आणि प्रस्तावना मी शेवटी वाचतो. या कवितासंग्रहातील पहिलीच कविता होती ‘समुद्र’ ही कविता आपल्या समुद्रासारखं जीवन जगण्याची प्रेरणा देते. सोप्प्या भाषेत सांगायच तर एक समाजसेवक समुद्राचे जीवन जगत असतो हे पटवून देते. त्यानंतरच्या काही कविता देवाचं अस्तित्व मान्य करणार्या, ‘शुभरात्री’ या कवितेत कवीने एका समाजसेवकाची समाजाप्रतीची तळमळ दर्शविली आहे. उपदेश या कवीतेत कवी उपदेशा पेक्षा कर्माला महत्व देताना दिसतो. कविता या कवितेत कवी कवितेच्या ताकदीची जाणीव करून देताना दिसतो. स्वातंत्र्य, स्वेच्छा, मातीचा माणूस न्याय सारख्या कविता आपल्या देशातील सामाजिक समस्यांवर भाष्य करताना दिसतात. ‘मौन’ या कवितेतून कवी जगातील अशांततेला वाचा फोडताना दिसतो. ‘परमसत्य’ या कवितेतून कवीची आध्यात्मिक विषयाची जाण अधोरेखीत होते. भूक, गरीबी, अनाथपणा, ग्रामिण जीवनातील समस्या आणि व्यथा मांडताना कवी प्रत्येक गरीब आई – बाबाची आणि त्यांच्या मुलाची व्यथा मांडताना दिसतो. या कवितासंग्रहातील शेवटची कविता आहे ‘सज्दा’ ही माणसाने जीवन कसे जगायला हवे हे सांगणारी आणि मातीचे ऋण मानायला शिकविणारी कविता आहे… डॉ. मोहंमद शकील जाफरी यांचा हा कवितासंग्रह भरल्यापोटी वाचता कामा नयी तो रिकाम्या पोटीच वाचायला हवे या निशकर्षा पर्यंत मी येवून पोहचलो. त्यानंतर मी या पुस्तकातील डॉ. ज्ञानेश्वर ब. थोरात यांची प्रस्तावना वाचली आणि मी ती पहिली नाही वाचली याचा मला आनंद झाला. कारण ती जर मी पहिल्यांदा वाचली असती तर मी या कवितासंग्रहातील कविता तटस्थपणे समजून घेऊच शकलो नसतो आणि या कवितासंग्रहावर आणखी एक ओळही लिहिण्याची हिंमत माझ्याच्याने झाली नसती कारण डॉ. ज्ञानेश्वर ब. थोरात यांची या पुस्तकावरील प्रस्तावनाच प्रस्तावना कशी असावी याच जीवंत उदाहरण आहे. डॉ. मोहंमद शकील जाफरी यांचे या पुस्तकातील मनोगत हे एका कवीचे नाही तर समाजसेवकाचे मनगोत आहे. डॉ. मोहंमद शकील जाफरी यांच्या रूपात मला एक कवी, लेखक, समाजसेवक भेटला पण माझ्या डोळ्यांना दिसला तो त्यांच्यातील देवमाणूस…
— निलेश बामणे
Leave a Reply