१९४३ साली जन्मलेल्या रघुनाथ अनंत माशेलकर यांनी यथावकाश मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमधून रसायन अभियंता म्हणून आपले शिक्षण पूर्ण केले. नंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून पीएच.डी. ही केली. त्यानंतर ते इंग्लंडच्या सालफोर्ड विद्यापीठात गेले व तेथे त्यांनी पॉलिमर इंजिनिअरिंगमध्ये संशोधन केले. तेथून परत आल्यावर ते पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये काम करू लागले. सहा वर्षे ते या लॅबोरेटरीचे संचालक होते. नंतर ते काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड रिसर्च इंडस्ट्रियल (CSIR) या संस्थेचे महासंचालक झाले.
डॉ. माशेलकरांनी, ‘द्रवांवर दाब दिला असता त्यांच्या प्रवाहीपणात होणारे बदल’ याविषयी संशोधन केले. हे फुगणाऱ्या आणि आक्रसणाऱ्या बहुवारीकांच्या (पॉलिमर्स) उष्मागतिकी आणि वहन पद्धतीबद्दलचे संशोधन आहे. जेव्हा एखादा पदार्थ विद्रावकात विरघळतो तेव्हा त्या द्रावणाचे तापमान, दाब, त्यातील क्षारांचे प्रमाण वेगवेगळ्या परिस्थितीत बदलू शकतात. काही विशिष्ट पदार्थांचे प्रवाहितेच्या संबंधीचे काही आगळेवेगळे गुणधर्म असतात, जे औद्योगिक क्षेत्रात महत्त्वाचे ठरतात. काही द्रावणावरील दाब जसा वाढतो तसतशी त्याची वाहकता किंवा प्रवाहीपणा वाढत जातो. रंगारी जेव्हा रंगामध्ये ब्रश बुडवतो तेव्हा डब्यातील रंग घट्ट असतो. पण जेव्हा रंगारी भिंतीवर ब्रश दाबून रंग देतो तेव्हा तो रंग तेवढ्या क्षणी काहीसा पातळ होतो. येथे ब्रशने दाब दिल्यावर दाब असेपर्यंत रंगाचा प्रवाहीपणा वाढतो. चॉकलेट तोंडात टाकल्यावर आपण ते जिभेने टाळूवर दाबतो तेव्हा ते काहीसे विरघळते. पण, जिभेवर नुसते चॉकलेट ठेवले तर ते हळूहळू विरघळते. नेहमीचे पाणी असे गुणधर्म दाखवीत नाही. काही बहुवारीक रसायने पाणी शोषून घेतात व ती फुगतात तर काही आक्रसतात. हे रसायनांच्या गुणधर्म आण्विक किंवा रेणवीय पातळीवरील संरचनेशी संबंधित असतात. माशेलकरांनी ही संरचना समजून घेऊन, इतर विविध रसायने तयार केली.
डॉ. माशेलकरांनी अमेरिकेच्या ताब्यात गेलेली हळद, कडुलिंब व बासमती तांदळाची पेटंट्स परत मिळवली. त्यानंतर त्यांनी भारतात फार मोठ्या प्रमाणावर पेटंट शिक्षणाचा प्रचार केला.
Leave a Reply