डॉक्टर राजेश बर्वे या व्यक्तिमत्त्वाला मी सर्वप्रथम भेटलो १९९३ साली. आणि त्यानंतर मीच नव्हे तर माझ्या परिवारातील सारेच त्यांच्या उपचाराचे fan झालो. अगदी क्रमच लावायचा झाला तर सर्वप्रथम माझी मुलगी , नंतर मी , मग माझा मुलगा आणि पत्नी असे सगळेच त्यांचे fan patient झालो.
वीले पार्ले पूर्वेला पार्लेश्र्वर मंदिराच्या जवळील गणेश प्रसाद या इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर असलेल्या त्यांच्या क्लिनिक मध्ये जेव्हा आम्ही पहिल्यांदा दाखल झालो तेव्हा बाहेर तीन चार रुग्ण बसलेले होते. या फ्लॅटच्या अर्ध्या भागात सुरेश बर्वे (डॉक्टरांचे वडील) यांची आर्किटेक्चरल फर्म आहे.
क्लिनिकच्या काचेच्या दरवाजावर नाव होतं, डॉ.राजेश बर्वे , B.H.M.S.डॉ.वृषाली राजेश बर्वे B.H.M.S. (पुढे होमिओपॅथी मध्ये दोघांनीही M.D. केलं ) आमचा नंबर आल्यावर आम्ही आत गेलो आणि डॉक्टर राजेश बर्वेंचं पाहिलं दर्शन झालं. गोरेपान , मध्यम उंची , मोठे घारे डोळे , चेहेऱ्यावर मार्दव , असे डॉक्टर राजेश पहिल्याच दृष्टीत आपलेसे झाले. गम्मत म्हणजे प्रथेप्रमाणे डॉक्टरांना पाहून मुलं भोकाड पसरतात किंवा घाबरून जातात तसं मुलीने काहीही केलं नाही. ती फक्त त्यांना एकटक पहात होती.
होमिओपॅथी उपचाराच्या नियमाप्रमाणे डॉक्टरांनी अनेक प्रश्न विचारले , आमच्याकडून आलेल्या उत्तराना जाणून घेतलं. केसपेपर लिहिताना दिसलं ते त्यांचं सुंदर हस्ताक्षर. डॉक्टरांच्या बोलण्यात आम्हाला एक प्रकारचा विश्वास जाणवत होता. त्यावेळी डॉक्टरांकडे कंपाऊंडर नव्हता. त्यामुळे तपासण्याचा कार्यभाग आटोपल्यावर बाहेर येऊन तेच औषध देण्याचं काम करत होते. डॉक्टरांच्या प्रत्येक क्रियेत म्हणजे आजार जाणून घेण्यात , प्रश्न विचारण्यात , आम्ही दिलेली उत्तरं टिपून घेण्यात , निदान करण्यात ते अगदी औषध बनवण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत एक व्यवस्थितपणा आणि शिस्तबद्धता होती. कुठेही व्यावसायिक दृष्टिकोन जाणवत नव्हता.
आता या सगळ्याची पार्श्वभूमी आपण जाणून घेऊ.
बर्वे कुटुंब पार्ल्यामध्ये खूप वर्षांपासून राहत आहे. डॉक्टरांचे आजोबा तर पार्ल्यातील पूर्वीच्या काही प्रतिष्ठित सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या व्यक्तींपैकी एक होते. त्यांनी पार्ल्यावर एक पुस्तकही लिहिलं होतं. आजोबा दिसायलाही गोरेपान आणि सडसडीत देहयष्टीचे होते. आता तुम्ही म्हणाल हे सगळं मला कसं कळलं . तर त्याचं उत्तर पुढे येईलच. डॉक्टरांचे वडील सोडले तर सगळे बर्वे कुटुंबीय अत्यंत उजळ वर्णाचे. डॉक्टरांचे वडील , भाऊ आणि वहिनी तिघही वास्तुविशारद तर आई आयुर्वेदाचार्य. पार्ल्यातील एक सुसंस्कृत , सुशिक्षित आणि सुपरिचित कुटुंब आहे बर्व्यांचं.
आणि त्यानंतर डॉक्टर राजेश बर्वे हे आमचे शब्दशः family doctor झाले. मला हे अगदी मनापासून जाणवलं की त्यांना रुग्णाच्या आजाराची समज अचूक येते. त्यांचं रोगनिदान रुग्णाच्या फक्त इतिहास भुगोलावर न थांबता व्यवस्थित तपासणीनंतर केलं जातं. मला नेमकं नाही सांगता येणार परंतू त्यांच्या व्यक्तिमत्त्वात रुग्णाला हवा असलेला आधार , आशा आणि आस्था या तीनही गोष्टींचं मिश्रण आहे. त्यामुळे आपल्याला काय होतंय हे डॉक्टरना नेमकं कलय हे समाधान रुग्णांना मिळतं.
डॉक्टर राजेश शी हळुहळु आमचा घनिष्ट संबंध जडला. तपासणीनंतर मोजक्याच अवांतर गप्पा व्हायच्या. ते हाडाचे शिक्षक आहेत. विरारला असलेल्या होमिओपॅथी मेडिकल महाविद्यालयात अध्यापक तसच अस्थिरोग , संधिवात बाह्यरुग्ण विभागाचे विभाग प्रमुख (HOD) म्हणूनही ते कार्यरत होते. विद्यार्थीप्रिय असलेले डॉ. राजेश आपल्या पेशाला व्यवसाय न मानता एक सेवा म्हणून त्याकडे पहातात.
डॉक्टरांच्या आजोबांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा झाला होता त्यावेळी संपूर्ण बर्वे कुटुंबाला पाहण्याचा योग आला. अत्यंत मितभाषी , शिष्टाचार पाळणाऱ्या , सुसंस्कृत आणि जमिनीवर पाय घट्टपणे रोवून असलेल्या कुटुंबाला पहण्याचं आणि भेटण्याचं समाधान मिळालं.
डॉक्टरांना अधिक जाणून घेण्यासाठी दोन किस्से सांगतो ,
एका श्रीमंत वस्तीत आपलं क्लिनिक असलेल्या डॉक्टरांच्या एका मित्राचा एक धनाड्य इसम पेशंट होता. बऱ्याच कुबेरांना सतत आपल्याला काहीतरी आजार आहे असं उगीचच वाटत असतं. त्याला प्रचंड पैशामुळे येणारी असुरक्षितता हे प्रमुख कारण असतं. त्यानुसार या इसमाला जो काही तथाकथित आजार होता त्यावर त्या डॉक्टर राजेशच्या मित्राचे उपचार सुरू होते. तरीही त्यांनी या आजारावर दुसरं एक मत घ्यायचं ठरवलं आणि त्यानुसार त्यांनी राजेशना या पेशंटला तपासून आपलं मत द्यायला सांगितलं. शिवाय एक टीपही दिली , की फी अगदीच कमी घेऊ नकोस तर जरा जास्तीच सांग (मित्राला डॉक्टर राजेशचा स्वभाव चांगलाच परिचयाचा होता. ) राजेशनी त्या इसमाला तपासून आपलं मत मित्राला कळवलं. त्यांनी फी किती द्यायची हे विचारताच डॉक्टरना मित्राने सांगितलेली गोष्ट आठवली. त्यावेळी राजेश आठवड्याच्या औषधांचे तपासणीसह पंचवीस रुपये घ्यायचे. त्यामुळे विचार करून डॉक्टरांनी थोडी जास्त फी सांगितली. दुसऱ्या दिवशी राजेशच्या मित्राचा फोन आला. तो म्हणाला ‘ अरे मी तुला फी जरा जास्तच घे म्हटलं होतं ना ‘? तो पेशंट मला म्हणू लागला की डॉक्टरांनी फारच कमी फी घेतली. चांगले नाही वाटत हे डॉक्टर. म्हणजे फी च्या आकारमानावर डॉक्टरांना पारखणाऱ्या या लोकांना काय सांगणार.
दुसरा किस्सा वेगळा आहे.
माझ्या ऑफिस मधला एक happy-go-lucky स्वभावाचा माझा एक सहकारी अचानक खूप तणावात दिसू लागला. निरावानिरविची भाषा बोलू लागला. त्याचं वजनही तणाव आणि कमी आहारामुळे झपाट्याने घटू लागलं. काहीही खाल्ल्यावर त्याला पोटदुखी सुरू होत असे. आणि त्यामुळे त्याला खाण्याची इच्छा होऊनही धीर होत नसे. मी त्याला एकदा डॉ राजेशना सगळ्या रिपोर्ट्स सह भेटण्याचा सल्ला दिला. अर्थात तोपर्यंत त्यानेही एक नव्हे तर दोन ॲलोपॅथी डॉक्टरांना आपली केस दाखवली होती आणि उपचारही सुरू होते. परंतू नेमकं निदान होत नसल्यामुळे उपचारांना यश येत नव्हतं. तो ही अखेर खूप कंटाळून गेला होता. अखेर मी फारच पिच्छा पुरवल्यामुळे शेवटी तो डॉ राजेश कडे येण्यासाठी तयार झाला.
डॉक्टरांनी त्याला तपासून महिन्याभरात गुण येईल याची खात्री दिली. फक्त महिनाभर खाण्याची काही पथ्य पाळायला सांगितली. आणि खरोखर महिन्याभरातच माझा हा मित्र पुन्हा एकदा पहिल्यासारखा आनंदी दिसू लागला. आपल्याला या आजारातून सहिसलामत बाहेर काढणाऱ्या डॉ. राजेशना आजही तो खूप मानतो. अर्थात डॉक्टरांचं नेमकं निदान आणि योग्य औषधोपचार यामुळेच हे शक्य झालं.
आज डॉ. राजेश बर्वेंचं क्लिनिक पेशंटनी भरलेलं असतं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपल्या आजार इथे नक्की बरा होणार हा भाव असतो. आजही डॉक्टर प्रत्येक रुग्णाला व्यवस्थित तपासून त्याच्या मनातील रोगाविषयीचा गैरसमज दूर करून मगच औषध देतात. फक्त औषध बनवण्यासाठी आता त्यांच्याकडे कंपाऊंडर आहे . आजही आपल्या रोजच्या व्यस्त वेळापत्रकातून एक दिवस ते होमिओपॅथी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी आवर्जून राखून ठेवतात. आजही डॉक्टर राजेश बर्वे तसेच आहेत. गेल्या पंचवीस वर्षात मिळालेल्या प्रचंड यशाने त्यांच्या वागणुकीत , स्वभावात आणि रुग्णांना त्यांच्याकडून मिळणाऱ्या सेवेत कोणताही नकारात्मक बदल झालेला नाही.
अनेक संशोधन कार्यात त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सेमिनार मध्ये त्यांनी आपले संशोधनात्मक पेपर सादर केले आहेत.
डॉक्टरांच्या रुग्णसेवेत त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ.वृषाली यांची साथ खरोखर मोलाची आहे.
उथळ पाण्याला खळखळाट फार असतो ,परंतू सखोल सागर मात्र शांत असतो तसच डॉ.राजेश बर्वेंचं आहे. शांत ,प्रसन्न आणि आश्र्वस्त भाव चेहऱ्यावर ठेऊन ते आपल्या कामात मग्न असतात. आपल्या रूग्णसेवेबरोबरच वेळात वेळ काढून निसर्गसौंदर्य स्थळांना भेट देण्याची मनापासून आवड असलेले डॉक्टर राजेश बर्वे मानवी व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळाच पैलू दाखवून जातात.
माझ्या आयुष्याच्या वाटेवर मला जवळून भेटलेले आणि एक माणूस म्हणून भावलेले एक अविस्मरणीय व्यक्तिमत्व ,डॉक्टर राजेश सुरेश बर्वे.
प्रसाद कुळकर्णी.
kprasad1959@gmail.com
9769089412
Leave a Reply