मलेरियाच्या संशोधनातील महत्त्वाचे शास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते
मलेरिया विषयक संशोधनात रॉस खेरीज अनेक युरोपियन शास्त्रज्ञ आघाडीवर होते. किंबहुना काही संशोधकांनी मलेरियाच्या परोपजीवांचा सखोल अभ्यास डॉ. रॉस या क्षेत्रात पडण्यापूर्वीच सुरू केला होता. त्या सर्वांचा या संशोधन मार्गावरील इतिहास हाही तितकाच मनोरंजक आहे.
अल्फानॉस लॅव्हेरान
याचा जन्म फ्रान्समधील एका बुद्धिमान कुटुंबात झाला. वैद्यकीय शास्त्रामधील मेडिसीन व पॅथॉलॉजी ह्या दोन महत्त्वाच्या विषयांमध्ये तो निष्णात होता. कोणत्याही रोगाचा अभ्यास करताना या दोन्ही विभागांचा आधार घ्यावा लागतो. फ्रेंचांची वसाहत अल्जियर्स म्हणजे अफ्रिकेच्या उत्तर भागात होती. लॅव्हेरान याची या जागी युद्धातील एक प्रमुख वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. वॉने व कॉनस्टेंटाईन या दोन गावात १८८० ते १८८५ मध्ये फ्रेंच सेना लढत होती. त्या काळात तेथे तापाची साथ इतकी जबरदस्त होती की, युद्धभुमीवर जेवढे सैनिक लढताना मरत, त्यापेक्षा जास्त साथीच्या रोगाने मरत होते. लॅव्हेरान या तापाच्या रोगाने चक्रावून गेला होता.त्याने अनेक तापाने मेलेल्या सैनिकांचे शवविच्छेदन (Autopsy) केले, तेव्हा या सर्वांमध्ये आकाराने मोठी झालेली प्लीहा व यकृत (Enlarged Spleen & Liver) निरिक्षणात आढळले. त्यावर काळपट रंगाचे पट्टेही दिसून आले. हे पाहुन लॅव्हेरानला दाट शंका आली की हा कोणत्यातरी जंतूंचा परिणाम असून त्यामुळे रोगी दगावतात. हे लक्षात घेऊन त्याने मरणपंथाला लागलेल्या काही रुग्णांच्या रक्ताचे नमुने काचपट्टीवर घेऊन अतिशय प्राथमिक स्वरूपाच्या मायक्रोस्कोप खाली तपासणी सुरू केली सध्याच्या काळात काचपट्टीवरील रक्तातील सर्व तऱ्हेच्या पेशी व परोपजीवी यांच्यावर रंगीत द्रावाचा (staining procedure) प्रक्रिया केली जाते. त्यामुळे ते अधिक ठळकपणे ओळखण्यास सोपे जातात परंतु सुरवातीला लॅव्हेरानच्या काळात ह्या द्रावांचा शोध लागला नव्हता, ही त्याच्यासाठी मोठी अडचणच होती. असे असून सुद्धा रंगहीन तांबड्या पेशींवर लॅव्हेरानला काळपट रंगाचे बारीक कण दिसत होते. त्यांना Malariform leucocytes असे नाव देऊन तो या निष्कर्षाला आला की हेच मलेरियाचे जंतू असून तेच या तापाला कारणीभूत आहेत. एका सकाळी तो रुग्णाच्या रक्ताचे काचपट्टी वरील निरीक्षण करीत असताना एका तांबड्या रक्तपेशीजवळ वळवळ करणारा बारीक तंतूमय जीवाणू त्याला दिसला त्यावेळी त्याची बालंबाल खात्री पटली की हा मलेरियाच्या जंतूचा काहीतरी भाग आहे. खरे तर अशी वळवळणारी जीवाणूची स्थिती आजमितीलासुद्धा मायक्रोस्कोपखाली दिसणे फार दुर्मिळ असते.
त्या काळामध्ये साधारणत: मलेरियाबाबत असा प्रचलित प्रवाह होता की त्याचे जंतू बहुधा हवेतून शरीरात शिरतात परंतु लॅव्हेरान जसजसा खोलात जाऊन संशोधन करू लागला तेव्हा त्यांच्या असे लक्षात येऊ लागले की हे जंतू (Bacteria) नसून परोपजीवी म्हणजेच (Parasites) आहेत. एकदा तर त्याने अशीही शंका व्यक्त केली होती की हे परोपजीवी डासांच्या चावण्यातून माणसाच्या शरीरात शिरत असावेत. परंतु या त्याच्या विधानाला बाकीच्या वैद्यकीय शास्त्रज्ञांनी नुसते धुडकावलेच नाही तर त्याला वेड्यातही काढले. यामुळे तो हवालदील झाला पण तरीही आपण पाहिलेले रक्तातील परोपजीवी त्याने प्रसिद्ध फ्रेंच जंतू शास्त्रज्ञ लुई पाश्चर यांना मायक्रोस्कोप खाली दाखविले व पाश्चरचीही खात्री पटली की हे जंतू नसून परोपजीवी आहेत.
मलेरियाचे परोपजीवी शोधण्याचा पहिला मान लॅव्हेरानकडे जातो. त्याने पॅरेसायटॉलॉजी ही शाखा (परोपजीवांचे शास्त्र) मनुष्याच्या अनेक रोगांशी निगडीत आहे हे सिद्ध केले. दुर्दैवाने मलेरिया व डास यांचा निकटचा संबंध तो दाखवू शकला नाही. परंतु त्याच्या संशोधनाची व्याप्ती खरोखरच फार मोठी होती. लॅव्हेरानने आपले सर्व लक्ष Trypanosoma या अफ्रिकेतील रोगाकडे केंद्रित केले होते. हा रोग एका विशिष्ट गटाची माशी चावल्यामुळे होऊन त्यात माणूस अखंड झोप येऊन अखेर मरण पावतो (Sleeping Sickness). त्याने या रोगाचे परोपजीवी काचपट्टीवरील रक्तामध्ये दाखवले व त्याच सुमारास काचपट्टीवरील रक्ताचा नमुना रंगीत करण्याची ढोबळ पद्धत सुदैवाने अवगत झाली होती.
Leishmaniasis (kala Azar, Dum Dum Fever) हा रोग एका विशिष्ट माशीपासून होतो हेही लॅव्हेरानने सिद्ध केले होते. या रोगाचा प्रार्दुभाव बिहार बंगाल भागात जास्त प्रमाणात आढळतो परेसायटॉलॉजीचा जनक लॅव्हेरान त्याच्या संशोधनामुळे अजरामर ठरला होता.
पॅट्रीक मॅन्सन
इंग्लंड देशाचा अतिशय नावाजलेला M.D. Physician, ज्याने आपले उभे आयुष्य उष्ण कटिबंधातील (Tropical Medicine) रोगांवरील संशोधनात घालावले. आजमितीसही भारत व आजुबाजूच्या देशांमध्ये या रोगांचा तिढा तसाच कायम आहे किंबहुना Tropical Medicine चा मॅन्सन हा जनक असून त्याने आपल्या प्रत्यक्ष अनुभवांवरील लिहीलेले पुस्तक हे वैद्यकीय शास्त्रावरील अतिशय सन्मान मिळालेल्या पुस्तकाच्या यादीमधील एक असे समजले जाते. त्याने अंदाजे २० वर्षे फिलीपाईन्स व चीन या देशात इंग्लंडचा वैद्यकीय अधिकारी म्हणून बहुमोलाचे काम केले होते. Filariasis (हत्ती रोग) डास चावल्याने होतो याचा शोध व रक्तात दिसणारे परोपजीवी त्यानेच प्रथम दाखविले होते. डास व मलेरिया यांचा काहीतरी संबंध आहे हा सिद्धांत त्यानेही मांडला होता. यामधूनच डॉ. रॉसला संशोधनाचा सूर मिळाला व रॉसने आपले कार्य पूर्णत्वास नेले. मॅन्सनने त्या सिद्धांताचा पुढे पाठपुरावा केला नाही. त्या काळी तो लंडनमधील एक प्रतिष्ठित, उच्च दर्जाचा फिझिशियन म्हणून मानला जात असे. या व्यवसायातून त्याने भरपूर मान, कीर्ती व पैसा मिळवला.
केमिलो गॉल्गी
हा एक हुषार इटालियन डॉक्टर, प्रथम फिजिशियन, नंतर सायकॅट्रीस्ट पुढे पॅथॉलॉजी विभागात मेंदू व मज्जारज्जूचा मायक्रोस्कोप द्वारा अभ्यास करणारा गाढा अभ्यासक व मलेरिया परोपजीवांचा अभ्यास करणारा अशा प्रकारे विविध वैद्यकीय क्षेत्रात नैपुण्य मिळविणारा महान संशोधक होऊन गेला. मलेरिया परोपजीवांची तांबड्या रक्तपेशींत होणारी वाढ व बरोबर त्याच वेळी रुग्णांना येणारी प्रचंड हुडहुडी (Chills) व वाढत जाणारा ताप याचा संबंध प्रथम गॉल्गीने दाखवून दिला व त्याचबरोबर क्वींनिन या औषधाने परोपजीवी मरतात, त्यावेळी ताप पूर्णपणे उतरतो हे महत्त्वाचे अनुमान त्यानेच काढले. काचपट्टीवरील रक्ताच्या तांबड्या रक्तपेशीत दिसणाऱ्या मलेरियाच्या परोपजीवीचा फोटो प्रथमच त्याने दाखविला. पाव्हिया येथील इटालियन विद्यापीठाच्या म्युझियम मध्ये ही अनमोल रक्ताची काचपट्टी व फोटो आजही उपलब्ध आहे. याखेरीज मज्जातंतू मायक्रोस्कोपखाली पहताना रंगीत दिसावेत यासाठी त्याने विविध स्टेन (रंग द्रव्य) शोधून काढले. या मज्जातंतूंच्या पेशीमधील महत्त्वाचा भाग गॉल्गी टेंडन या नावाने प्रसिद्ध आहे.
मलेरिया व नोबेल पारितोषिक
नोबेल पारितोषिकांच्या गेल्या शंभर वर्षांच्या इतिहासात वैद्यकीय विभागामध्ये मलेरिया व त्यासंबंधीत महत्त्वाचे संशोधन यासाठी आजपर्यंत तीन वेळा पारितोषिके देण्यात आली आहेत. यावरून मलेरियाचे महत्त्व किती होते हे पटण्यासारखे आहे
१९०२ रोनॉल्ड रॉस-पूर्णपणे मलेरियावरील संशोधन
१९०६ केमिलो गॉल्गी-मज्जातंतूचा अभ्यास व मलेरियावरील संशोधन
१९०७ लॅव्हेरान -मलेरिया, ट्रिपॅनोसोमियासिस व काला आझार या रोगांवरील संशोधन
इटालियन डॉक्टर निओवनी ग्रासी
ग्रासीने प्लाझमोडियम गटाचा (मलेरियाच्या परोपजीवाचा) शोध अतिशय मेहनत घेऊन लावला होता. पुढे त्याची दिशा चुकली व तो रॉस बरोबरील भांडणाच्या गुंत्यात साफ अडकला. मॅन्सननेही डासांवरील संशोधनाचा पाठपुरावा शेवटपर्यत जाऊन केला नाही. त्यामुळे ग्रासी व मॅन्सन यांचे मलेरियावरील पारितोषिक हुकले परंतु तरीसुद्धा दोघांचे कार्य मोलाचे आहे ह्यात शंकाच नाही.
— डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply