नवीन लेखन...

डॉ. रोनाल्ड रॉस यांच्या जीवनाची यशोगाथा – भाग ८

दरम्यानच्या काळात रॉसला इटालियन वैद्यक शास्त्रज्ञ गिओव्हानी बॅटिस्टा ग्रासी याच्या वागणुकीचा अत्यंत कटु, संतापजनक व अपमानास्पद अनुभव आला. रॉसने मलेरियावरील केलेले संपूर्ण संशोधन हे ग्रासीने स्वत:च्या नावावर एका वैद्यकीय मासिकात प्रसिद्ध केले. ही मौल्यवान शोधकार्याची चोरी झाल्याचे रॉसच्या लक्षात येताच त्याने पत्राद्वारे कडक शब्दात व अत्यंत शिवराळ भाषेत ग्रासीची निर्भत्सना केली. दोघांमध्ये झालेल्या पत्रव्यवहारासंबंधीचे पुस्तकच रॉसने स्वखर्चाने प्रसिद्ध केले. मलेरियासंबंधीत संशोधनाच्या वाटेवरील ही एक उद्वेगजनक व कलंक लावणारी घटना होती.

नोबेल पारितोषिक समितीला या सर्व पत्रव्यवहाराची, तसेच रॉस व त्याखेरीज इतर शास्त्रज्ञांनी मलेरिया परोपजीवांवरील केलेल्या संशोधनाचीही पूर्ण कल्पना होती त्यांनी या संपूर्ण संशोधनाचा खरा जनक डॉ. रोनॉल्ड रॉसच आहे याची खात्री करून १९०२ सालातील वैद्यकीय शास्त्राचे नोबेल पारितोषिक रॉसला बहाल केले. रॉसच्या जीवनातील सुवर्ण दिवस अखेरीस उजाडला.

मलेरियाच्या परोपजीवांचे मनुष्य व डास यामधील जीवनचक्राचे निसर्गाचे कोडे रॉसने सोडविले होते याबद्दल हे पारितोषिक नसून मलेरियाचा प्रसार कसा होतो, व तो रोखण्यासाठी कोणते उपाय योजावेत या रॉसच्या क्रांतीकारी योजनांच्या संदर्भात त्याने ते मिळविले होते. वस्तुत: रॉसचे हे संशोधन नोबेल पारितोषिकासाठी लावलेल्या निकषांच्या चौकटीत बसणारे नव्हते. त्याचे काम हे अपवादात्मक स्वरुपाचे होते आणि अपवादही नियमांच्या चौकटीत बसू शकतो हे रॉसच्या कामाने सिद्ध केले होते. मान्यताप्राप्त ठरले होते.

नोबेल पारितोषिकानंतर अनेक मानपत्रे व बक्षिसांचा रॉसवर पाऊसच पडला Fellow of Royal College of Surgeon And Fellow of Royal Society म्हणून निवड झाली. १९१३ मध्ये Royal College चे उपाध्यक्ष, इंग्लंडच्या राजाने Order of Bath, बेल्जियमच्या राजान Order of leopord II या व अशा अनेक बहुमानाच्या पदव्या त्याला दिल्या. संपूर्ण युरोपातील राष्ट्रे व अमेरिकेनेही त्याचा गौरव केला. १९१० साली स्विडनची राजधानी स्टॉकहोम येथील Karolinska Institute च्या १०० वर्षांच्या सुवर्णमहोत्सवाचे प्रसंगी रॉसला M.D. ही पदवी देण्यात आली.

हे सर्व मानसन्मान व पारितोषिके मिळून सुद्धा रॉस स्वतःच्या वैयक्तिक व्यवसायात अयशस्वी झाला. ना पैसा व ना मन:शान्ति अशी अवस्था होऊन रॉस दु:खी व निराश झाला. त्याच्या मोलाच्या संशोधनाकरिता सरकारने कोणत्याही स्वरूपात पैशाची मदत केली नाही हीच त्याच्या जीवनातील मुख्य खंत होती.

रॉस इंग्रजी वाङ्मयाचा गाढा उपासक व लेखक होता. The child of ocean, The spirit of storm, The Emigraots या सारख्या कादंबऱ्या, अनेक दर्जेदार कविता संग्रह, गणित व संख्याशास्त्र (Statistics) यावरील पाच पुस्तके व पुढे १९२३ साली ५४६ पानांचे स्वत:चे आत्मचरित्र रॉसने लिहीले. या आत्मवृत्तात ज्या दु:खद संकटातून त्याच्या संशोधनाची वाटचाल होत गेली त्याचे प्रदीर्घ वर्णन व स्वत:चे आत्मचिंतन प्रगट केले आहे.

“अॅनॉफेलीस डासाची मादी ही काही सहजपणे हार मानणारी कीटक नसून तिला नेस्तनाबूत करण्यासाठी अखंड परिश्रमाची गरज आहे” हेच वाक्य थडग्याशी पोहोचेपर्यंत रॉस वारंवार उच्चारित होता. या पृथ्वीतलावर एक ना एक दिवस नक्की उजाडेल ज्यावेळी अॅनॉफेलीस मादी नाहिशी झालेली आढळेल हीच त्याची एकमेव अंतिम इच्छा होती.

नोबेल पारितोषिक विजेता, महान किर्तीचा वैद्यकीय शास्रज्ञ, गणितकार, संसर्गजन्य रोग व सांडपाणी निर्मूलनाचा तज्ञ, संपादक, कवी, कांदबरीकार, संगीतप्रेमी, नाटककार अशा विविध गुणांनी संपन्न असलेला डॉ. रोनॉल्ड रॉस हे खरोखरीच एक अजोड़ व्यक्तिमत्त्व होते.

— डॉ. अविनाश वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..