नवीन लेखन...

डॉ. रोनाल्ड रॉस यांच्या जीवनाची यशोगाथा – भाग ७

त्यासुमारास डॅनलेवस्की या शास्त्रज्ञाने पक्षांमधील मलेरियाच्या परोपजीवांचा अभ्यास केला होता. त्याच्या संशोधनाप्रमाणे काही जातीची कबुतरे मलेरिया पसरविण्यास कारणीभूत आहेत असा निष्कर्ष होता. परंतु अनेक पक्षीशास्त्रज्ञांनी असे सिद्ध केले होते की डास हे पक्षांना चावतच नाहीत तेव्हा रॉसने हे अनुमान पडताळून पहाण्याचा चंगच बांधला. त्याने कबुतरे, चिमण्या, कावळे यांच्या जीवनक्रमाचा अभ्यास सुरू केला. त्याला लक्षात आले की या पक्षांना इतर किटकांप्रमाणे डासही चावतात.

आता रॉसने मलेरियावरील संशोधन कलकत्ता येथील एका मोडकळीस आलेल्या प्रयोगशाळेत सुरू केले. या कामाकरिता रॉसने महंमद बक्श व पुरवाना असे दोन सहाय्यक निवडले. पुरवाना पहिल्याच दिवसाचा पगार घेऊन पळून गेला. महंमद बक्श मात्र कामामध्ये अतिशय दक्ष व मेहनती होता. त्याच्या पगाराचा खर्च रॉसने स्वत:च उचलला. शहरातील विविध गटारे, पाण्याची डबकी यामधून विविध जातीचे डास पकडून बक्शने रॉसपुढे हजर केले. त्या सुमारास प्लेगची जोरदार साथ असल्याने मलेरियाच्या प्रयोगाकरिता माणसे मिळेनाशी झाली व त्यामुळे रॉस पुन्हा पक्षांमधील मलेरियाच्या संशोधनाकडे वळला. यातून त्याने दोन महत्त्वाचे निष्कर्ष काढले. पहिला निष्कर्ष असा की पक्षांमध्ये Culex जातीच्या डासांमुळे मलेरिया होतो व दुसरे अनुमान असे की माणसांमध्ये Anopheles डासांमुळे मलेरिया होतो. असे असूनही परोपजीवी वाढण्याची पद्धत व त्यांचे जीवनचक्र हे पक्षी व मानवप्राणी ह्या दोघांमध्ये सारख्या तऱ्हेचे असते या रॉसच्या संशोधनाच्या अहवालाचे लंडन मधील Tropical Diseases of British Medical Association या संस्थेने जोरदार स्वागत केले व यातूनच रोनॉल्ड रॉस यांच्यासाठी नोबेल पारितोषिकाचा मार्ग सुकर झाला.

यानंतर मात्र सरकारी जाचामुळे वारंवार होणाऱ्या बदल्यांना कंटाळून तसेच कामामुळे आलेला अतिशय थकवा व जीवघेणा उकाडा या सर्व कारणास्तव कलकत्ता सोडून ऑगस्ट १८९८ मध्ये रॉस मायदेशी परतला.

रॉसच्या संशोधनाच्या कामाची मर्यादा मलेरिया कोणत्या डासामुळे व कशा रितीने माणसात पसरतो एवढीच नव्हती तर लक्षावधी डासांचे प्रजोत्पादन कसे होते व ते कसे थांबवावे या बाबींवरही रॉसने तितकाच प्रकाश टाकला होता मुख्यतः त्याने हे सिद्ध केले की ॲनॉफेलीस डास हे मनुष्यवस्तीच्या अवतीभोवती निचरा न होणाऱ्या पाण्याच्या डबक्यात, व साठवलेल्या पाण्याच्या टाक्यांतून वाढतात. या पाण्यातच डासांच्या लक्षावधी अळ्या जन्माला येतात. चिखल व दलदलीच्या प्रदेशातच फक्त मलेरियाचे डास निर्माण होतात हा पूर्वीचा समज चुकीचा आहे हे त्याने सिद्ध करून दाखविले. पावसाळ्यात अशी डबकी जास्त प्रमाणात होतात. त्याचबरोबर उघड्या गटारातून वाहणारे सांडपाणी हे सर्व या रोगाला कारणीभूत आहेत व त्यामुळेच पावसाळा हा मलेरिया फैलावणारा ऋतु आहे. प्राचीन संस्कृतीच्या काळात गावातील गटारे जमिनीखाली व्यवस्थित बांधलेली असल्याने डासांची पैदास होत नसे त्यामुळे त्यांचे निर्मूलन आपोआप होत असे. रॉसने त्यापुढील आपले जीवन सर्वस्वीपणे डास निर्मूलनाच्या कार्यासाठी वाहून घेतले होते. रॉस सतत या विषयावरील आपल्या उपयुक्त योजना मांडीत असे. रॉसची ‘सांडपाणी निचरा क्रांती’ ही पद्धती अमेरिकेच्या क्युबन युद्धाचे वेळी हॅवाना शहरात व सुएझ कालवा बांधणीच्या वेळी इस्माईल शहरात अवलंबिल्याने हजारो लोकांचा मलेरिया पासून बचाव झाला होता. रॉसने मलेरियावरील संशोधनाच्या बाबतीत माणूस, मलेरियाचे परोपजीवी व डास या तीन घटकांवर आधारित या रोगाचे प्रसारण कसे होते हे गणिती सूत्राने सिद्ध केले. हा गणिती सिद्धान्त Some a priori pathometric equations by Ronold Ross British Medical Journal (BMJ) 1915 March 27 मध्ये प्रसिद्ध झाला. नोबेल प्राईझ समितीने या सूत्राची दखल रॉसनाच नोबेल पारितोषिक देण्याचा निर्णय घेताना विचारात घेतली होती.

— डॉ. अविनाश वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..