डास व रॉस यांचे अजब नाते बंगलोर येथे जुळून आले. येथील वैद्यकीय सेवेत असताना त्याला राहण्यासाठी उत्तम बनला होता. परंतु असंख्य डासांच्या अखंड गुणगुणण्याने रॉसचे डोके भणभणू लागे. काही वेळा हा त्रास त्याला असह्य होत असे. रॉसच्या बंगल्याला लागून पाण्याचे एक छोटे तळे होते. आश्चर्याची गोष्ट अशी की आजूबाजूला इतर दूरवर असलेल्या बंगल्यांच्या तुलनेत त्याचा बंगला म्हणजे जणू डासांचे माहेरघर झाले होते. त्या तळ्यातील पाण्यात वळवळणाऱ्या अळ्या पाहून रॉसने ते तळे पूर्णपणे उपसून कोरडे केले. त्यानंतर डासांचे प्रमाण खूपच कमी झाल्याचे लक्षात आले. अशीच तळी स्वयंपाकघर व जेवणाच्या हॉलच्या बाजूला तयार झाली होती. ती तळी देखील उपसली जावी अशी रॉसने वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती केली, परंतु त्यांनी ती विनंती धुडकावून तर टाकलीच, शिवाय त्याला सल्ला दिला की हे सर्व निसर्ग नियमाने चालते तेव्हा आपण त्यात ढवळाढवळ करण्याची गरज नाही. अशा निराशेच्या क्षणी रोजचे कविमन उफाळून येत असे व तो लगेच कविता करत असे. मनात दुःखी असूनही त्याच वेळी रॉसचे दुसरे मन त्याला सांगे, भारतात दरवर्षी पाच लाख लोक मलेरियाने मरत असताना त्याबाबतीत स्वस्थ बसून कसे चालेल`?’
भारतीय वैद्यकीय सेवेतील नोकरी निरर्थक झाली असे वाटून कंटाळलेल्या व निराश मनस्थितीत तो लंडनला परत गेला. तिथे रॉसने पब्लिक हेल्थच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. तिथे पॅथॉलॉजी लॅबोरेटरीत काम करावे लागत असे. त्यामुळे रक्त तपासणी, मायक्रोस्कोप व इतर अनेक गोष्टी ररॉसला सरावाच्या झाल्या. इंग्लंडमध्ये लग्न करून तो काही काळानंतर परत भारतात कामावर रुजू झाला. मलेरियावरील संशोधनाचा भुंगा मात्र त्याच्या डोक्यात सतत गुणगुणत होता.
दरम्यानच्या काळात फ्रेंच लष्करी डॉक्टर लॅव्हेरान याने मलेरियाचे परोपजीवी मायक्रोस्कोपखाली काचपट्टीवर दाखवले होते व त्याबद्दलची आपली मते प्रसिद्धही केली होती. परोपजीवी यांच्या एका स्थितीला क्रिसेंट (crescent) म्हणजे विळ्याच्या आकाराची अवस्था असे म्हणतात. लॅव्हेरानने स्वतःकडील रक्ताच्या नमुन्यात हीच स्थिती दाखवली होती. रॉसने कडक शब्दात या मतांवर टीका तर केलीच परंतु हा ताप आतड्यांमध्ये विष पसरुन होतो असे स्वतःचे ठाम मत मांडले. रॉसने लॅव्हेरानची खिल्ली उडवली व `हे असे क्रिसेंट फक्त लॅव्हेरानच्या मायक्रोस्कोपवर प्रेम करीत असावेत असा वर्मी टोमणाही मारला.
(क्रमशः)
— डॉ. डॉक्टर अविनाश वैद्य
Leave a Reply