डॉ. सॅम्युअल हनेमन हे होमिओपाथी या वैद्यकशास्त्राचे जनक होते. त्यांचा जन्म १७५५ साली झाला. त्या काळात वैद्यकीय उपचारांसाठी विविध पद्धती प्रचलित होत्या. अशावेळी डॉ. हनेमन यांनी वैद्यक हे शास्त्रोक्त पद्धतीच्या चौकटीत कसे बसवता येईल याचा शोध घेण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले.
वेगवेगळे सिद्धान्त सिद्ध होत होते. समाजात प्रचलित असलेल्या या अनेक पद्धती वापरताना त्यात शास्त्रीय दृष्टिकोन नव्हता. अशावेळी डॉ. हनेमन यांनी वैद्यकीय विषयातील डॉक्टरेट ही पदवी ग्रहण केली. वैद्यक व्यवसाय चालू केला. परंतु दोनच वर्षात आपल्या एका मित्राला पत्र लिहिले. त्यातील आशय हा असा होता. ‘‘विशेष तपशील उपलब्ध नसलेली औषधे आणि
प्रकृतीमानाचे मापन करण्यासाठी फारशा सुविधा उपलब्ध नसताना मोघमपणे औषधे देणे हे अपायकारक ठरू शकते.” आणि याच कारणासाठी डॉ. हनेमन यांनी आपला वैद्यकीय व्यवसाय बंद केला. परंतु त्याचवेळी मनुष्य हा डोळ्यासमोर केंद्रस्थानी ठेवून त्यांनी वैद्यक क्षेत्रात विशेष संशोधन करण्याचे ठरवले. त्या क्षेत्रात प्राविण्य मिळवण्याचा विडा त्यांनी उचलला.
रसायनशास्त्र, तत्त्वज्ञान, औषधशास्त्र या सर्व विषयांचा अभ्यास केला. त्यांच्या दृष्टीने प्रकृतीस्वास्थ्य नसलेल्या व्यक्तीला निरोगी आयुष्य मिळवून देणे हे महत्त्वाचे होते.
माणूस हा एक संपूर्ण घटक असून एखाद्या यंत्राचा भाग किंवा रसायनशास्त्राची फॅक्टरी नाही, अथवा अनेक इच्छांनी मनात उसळलेली प्रबळ उर्मी नव्हे. विचारमंथन, भावनाविवशता आणि प्रत्यक्ष कृती यांचा वेगवेगळा आविष्कार नव्हे. संपूर्णपणे एखाद्या व्यक्तीच्या शरीराकडे बघायला हवे. एखाद्या व्यक्तीच्या रोगांचे निदान करताना त्याचे संपूर्ण शरीर विचारात घ्यायलाच हवे असा त्यांचा दृष्टिकोन होता आणि यासाठी आपल्याकडे उपलब्ध असलेले सर्व ज्ञान वापरून निदान करणे योग्य होईल, अशी त्यांची धारणा होती. होमिओपॅथी या शास्त्राचा हाच मूळ पाया आहे.
डॉ. अपर्णा रणदिवे
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply