शेक्सपिअरच्या नाटकांच्या मराठी रूपांतरांतील नायकांच्या भूमिका अजोडपणे वठवणारे गणपतराव जोशी. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १८६७ रोजी रत्नागिरी, राजापूर येथे झाला.
गणपतराव जोशी हे मराठी रंगभूमीवरील एक असामान्य नट. त्यांनी शाहूनगरवासी नाटक मंडळीची स्थापना १८८१ साली केली. तेव्हापासून ती मराठी रंगभूमीच्या गद्य शाखेतील अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाऊ लागली. शेक्सपिअरच्या नाटकांच्या मराठी रूपांतरांतील नायकांच्या भूमिका अजोडपणे वठवून गणपतरावांनी अतिशय लोकप्रियता संपादन केली. चंद्रसेन (हॅम्लेट), झुंझारराव (ऑथेल्लो), मानाजीराव (मॅक्बेथ) आणि प्रतापराव (टेमिंग ऑफ द श्रू ) या त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या. अत्यंत सुरेल व असाधारण तेजस्वी आवाज हे गणपतरावांच्या अभिनयाचे प्रमुख वैशिष्ट्य होते. एखाद्या अद्वितीय गायक नटाच्या आवाजासारखी, गद्य नाटकातून काम करणाऱ्या गणपतरावांच्या आवाजाची मोहिनी तत्कालीन प्रेक्षकांवर पडली होती. शेक्सपिअरच्या नाटकांतील नायकांच्या मनोजीवनाचे रहस्य समजावे या हेतूने महाविद्यालयीन विद्यार्थी त्यांच्या नाटकांना गर्दी करीत असत, तर इंग्रज प्रेक्षक केवळ अभियानाच्या आस्वादाचा आनंद घेऊन गणपतरावांच्या हॅम्लेाट (चंद्रसेन) सारख्या भूमिकेची मुक्तकंठाने प्रशंसा करीत असत. शेक्सपिअरच्या नाटकांतील नायकांच्या भूमिकांचे रहस्य व्यक्त करण्याचे शिक्षण गणपतरावांना वासुदेव बाळकृष्ण केळकर आणि गोविंद बल्लाळ देवल यांच्या कडून मिळाले होते.
राणा भीमदेव नाटकातील भीमदेव ह्या शूर योद्ध्याची भूमिका व तुकाराम व रामदास नाटकांतील अनुक्रमे तुकाराम वा रामदास यांसारख्या भगवद्भक्त संतांची भूमिका गणपतरावसारख्याच कौशल्याने वठवीत. इतकेच नव्हे, तर दातेकृत झोपी गेलेला जागा झाला (१९०९) ह्यासारख्या फार्समधील विनोदी भूमिकांतील त्यांची निपुणताही प्रेक्षकांना थक्क करणारी होती. मराठी रंगभूमीवरील स्त्रियांच्या भूमिका त्या काळात पुरुषच वठवीत असत.
गणपतरावांच्या कारकीर्दीच्या पुर्वार्धात त्यांना नायिकेच्या भूमिका करणारे बाळाभाऊ जोग यांची साथ लाभली होती. गणपतराव जोशी यांचे ७ मार्च १९२२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
पण तुम्ही संगीतकार रवीचा फोटो का दिलाय?