मराठी प्रायोगिक रंगभूमीचे जनक आणि बुजूर्ग नाट्य दिग्दर्शक दामू केंकरे यांचा जन्म ५ मे १९२८ रोजी झाला.
दामोदर काशिनाथ केंकरे उर्फ दामू केंकरे यांनी तब्बल सहा दशके रंगभूमीची सेवा केली. दामू केंकरे हे मुंबईतील जे.जे.स्कूल ऑफ आर्ट या कलाशिक्षण संस्थेत ते १९५७ सालापासून १९७८ सालापर्यंत कला शिकवीत होते. या दरम्यान त्यांची नाट्यकारकीर्द चालू होतीच. गोवा हिंदू असोसिएशन संस्थेकरता त्यांनी बरीच नाटके बसवली. चाकोरीबध्द रंगभूमीच्या बाहेर जाऊन विचार करणारा दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख होती. हॅल्मेट,कालचक्र, उद्याचा संसार, आपलं बुवा असं आहे, सूर्याची पिल्ले, अखेरचा सवाल, कालचक्र, कार्टी प्रेमात पडली अशा नाटकांचे दिग्दर्शन दामू केंकरे यांनी केले होते. त्यांनी हॅल्मेट या नाटकात हॅम्लेटची मुख्य भूमिकाही केली होती. वाजे पाऊल आपुले हे नाटक १९६७ साली दामू केंकरे यांच्या अभिनयाने गाजले होते.
अरविंद देशपांडे दिग्दर्शित तुघलक व बादल सरकार यांच्या सारी रात या नाटकाचे नेपथ्य दामू केंकरे यांनी केले होते. तुघलक व सारी रात या नाटकांच्या नेपथ्याबद्दल त्यांना अनेक पुरस्काभराने सन्मानित करण्यात आले होते. ‘सुर्याची पिले’ या गाजलेल्या नाटकाने त्यांनी मराठी रंगभूमीला समृध्द करण्यात मोठे योगदान दिले.
दामू केंकरे यांचा गोवा कला अकादमीच्या उभारणीत मोलाचा वाटा होता. दामू केंकरे यांनी डारेक्टर ऑफ कल्चरल अफेअर महाराष्ट्र राज्य म्हणून काही वेळ काम केले. त्यांना जीवनगौरव पुरस्कार, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार ही मिळाला होता. साहित्य संघाचे संस्थापक डॉ. अ. ना. भालेराव यांची जन्मशताब्दी २००२ मध्ये साजरी करण्यात आली. त्या वेळी हा नाटय़ोत्सव उपक्रम सुरू करण्यात आला. दामू केंकरे यांच्या निधनानंतर पासून हा महोत्सव दामू केंकरे यांच्या नावाने साजरा केला जातो.
दामू केंकरे स्मृती नाटय़ोत्सवाचे आयोजन दर वर्षी करण्यात येते. या नाटय़ोत्सवासाठी केंकरे कुटुंबीयातर्फे प्रायोगिक नाटय़संस्था किंवा व्यक्तीला प्रोत्साहन म्हणून नाटय़निर्मितीसाठी एक लाख रुपये देण्यात येतात. बालरंगभूमीसाठी आपलं सारं जीवन वेचणाऱ्या सुधाताई करमरकर व दामू केंकरे यांच्या पत्नी ललिता केंकरे या दोघी बहिणी. ललिता केंकरे यांनीही नाटकातून काम केले. मराठी रंगभूमीला निवडक पण चांगल्या नाटकांची पर्वणी देणारे दिग्दर्शक विजय केंकरे हे त्यांचे चिरंजीव. गोवा हिंदू असोसीएशनने दामू केंकरे यांच्या वर “३ अंकी गुरुकुल” या नावाने गौरवग्रंथ लिहिला आहे.
दामू केंकरे यांचे २८ सप्टेंबर २००८ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply