
एखाद्या व्यक्तीची प्रिय व्यक्ती (जीवलग माणूस) जेव्हा अडचणीत असेल त्यावेळी त्याचा सोबती किंवा जीवश्च-कंठश्च म्हणून त्याला वाचवण्याचे सर्वोतपरी प्रयत्न केले जातात. पण एवढं करुनही ज्यावेळी “ती व्यक्ती” कोणताच प्रतिसाद देत नाही तेव्हा तीचा जीवलग निराश, हाताश होऊन शेवटी हतबल होतो. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात ही घडणारे असे अनेक प्रसंग असतात.
या चित्रपटाला अशाच कथेचा बाज मिळाल्यामुळे व सामान्य माणसाची व्यथा मांडल्यामुळे “अनुमती” हा चित्रपट आपल्यातलाच वाटत राहतो. रत्नाकर (विक्रम गोखले), यांची पत्नी (नीना कुलकर्णी) ब्रेन हॅम्रेजमुळे (मृत्युशयेवर) पडून आहे. तीच्यावर उपचार करुन सुद्धा फारसं काही हाती लागणार नाही हे माहित असूनही तिला वाचवण्यासाठी हवा तो प्रयत्न करणार्या प्रसंगी घर, जमीन, गहाण ठेवून, विकून त्यातून जो काही पैसा मिळेल त्यामधून तिला वाचवण्यासाठी मार्ग असेल, हे सर्व अगदी उत्तम प्रकारे उभं करण्यात आलं आहे, आणि विशेष म्हणजे विक्रमजींनी ही भूमिका समजून घेऊन अगदी जीव ओतून अभिनय साकारला असून चित्रपट पाहताना “हृदयस्पर्शी” वाटत राहतो; अर्थात याचं श्रेय हे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे त्याचबरोबर चित्रपटात विक्रम गोखलें सोबत असलेले नीना कुलकर्णी, रीमा, सुबोध भावे, नेहा पेंडसे, किशोर कदम सारखे सहकलाकार यामुळे त्याच्या भूमिकेला सर्वांनी साथ दिल्याचं जाणवतं. आणि अरुण नलावडे, आनंद अभ्यंकरांच्या पाहुणे कलाकारांची भूमिका सुद्धा नोंद घेण्यासारखी आहे. विशेष म्हणजे सई ताम्हणकरची विक्रम गोखलेंची सून म्हणून असलेली भूमिका त्यातील साधेपणा व वावर अगदी उत्तमपणे रेखाटला आहे. काही निवडक प्रसंगापूर्ती आणि रत्नाकर यांच्या आखणीतील बायको म्हणून नीना कुलकर्णींनी तडीसतोड अभिनय केला आहे. त्यामुळे एका गृहिणीची छबी व स्वत:च्या पतीला जीवापाड पत्नीची त्यांची व्यक्तिरेखा पडद्यावर अधोरेखित होते. किशोर कदम यांचा “कोंकणी माणूस” तशी बोली व राहणीमान ही त्यांच्या व्यक्तिमत्वाला पूरक आहे. कुठेही अभिनयात हा चित्रपट कमी पडत नाही उलट कथा पाहताना तो आपल्याला एकाजागी खिळवून ठेवतो. कथेचा विषय, संवाद, पार्श्वसंगीत, छायाचित्रणाची बाजू, गीतं, गायक, या बाजू ठीकपणे पेलल्या आहेत.

आपल्या जीवलगावर प्रेमाची व्याख्या विस्तृत करण्यासोबतच वैद्यकीय, सामाजिक व्यवस्था, नातेसंबंध, आपली माणसं परकी होताना, आर्थिक अडचणीत सापडलेल्या सामान्य माणसाची कहाणी सांगणार्या तसंच उत्तम निर्मिती मूल्यांपैकी हा चित्रपट पाहण्याजोगा आहेच त्यासाठी दिग्दर्शक आणि विक्रम गोखले यांचं अभिनंदन हे केलंच पाहिजे. कारण बर्याच अवधी नंतर रुपेरी पडद्यावर काळजाला भिडणारी सशक्त कथा दाखल झाली आहे, तेव्हा प्रत्येकांनी किमान एकदा तरी हा चित्रपट सिनेमागृहामध्ये जाऊन पहायला पाहिजे असं “अनुमती” च्या निमित्ताने सांगावं लागेल.
— सागर मालाडकर
Leave a Reply